श्रम आणि रोजगार मंत्रालय
ब्रिक्स रोजगार कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीला आजपासून तिरुवनंतपुरम येथे प्रारंभ
सामाजिक संरक्षण, महिलांचा कार्यबलातील सहभाग आणि कौशल्य विकास यावर सहकार्यासाठी ब्रिक्स सदस्य देश आग्रही
Posted On:
06 MAY 2026 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2026
भारताच्या अध्यक्षतेखाली तिरुवनंतपुरम येथे ब्रिक्स रोजगार कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीला आजपासून प्रारंभ झाला.या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश - चीन, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या प्रतिनिधी मंडळांसोबतच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटना आणि संयुक्त राष्ट्र भारत हे ज्ञान भागीदार एकत्र आले होते. या बैठकीच्या पहिल्या दिवसाच्या कार्यसूचीनुसार, सामाजिक सुरक्षा आणि औपचारिकीकरण, महिलांचा कार्यबलातील सहभाग आणि कौशल्य विकास या तीन प्राधान्य क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार सचिव वंदना गुरनानी यांनी सामाजिक संरक्षण प्रणाली लवचिक बनवणे , महिलांचा सहभाग वाढवणे, कौशल्य प्रणाली अधिक प्रतिसादक्षम बनवणे आणि डिजिटल तंत्रज्ञान सर्वसमावेशकतेला चालना देणे, या गोष्टी सुनिश्चित करणे ही ब्रिक्स सदस्य राष्ट्रांची सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.
या चर्चेतून हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले की, ज्ञानाचे आदानप्रदान , सहध्यायी शिक्षण आणि कल्पना, आव्हाने व उपाय यांच्या परस्पर देवाणघेवाणीतून क्षमता निर्मिती करणे हे या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असेल.
कार्यबलामध्ये महिलांचा सहभाग आणि समावेश वाढवण्यासंबंधीच्या प्राधान्य क्षेत्र II संदर्भातील चर्चेत अधोरेखित करण्यात आले की ब्रिक्स राष्ट्रांनी महिलांचा कार्यबलातील सहभाग वाढवण्यात उल्लेखनीय प्रगती केली असली तरी, काही संरचनात्मक अडथळे कायम आहेत, ज्यासाठी सातत्यपूर्ण आणि समन्वित कृती आवश्यक आहे. ब्रिक्स सदस्य राष्ट्रांनी उच्च-वाढीच्या क्षेत्रांमध्ये आणि नेतृत्वाच्या मार्गांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मजबूत आणि सर्वसमावेशक धोरणात्मक चौकटींचे समर्थन केले. सदस्य देशांनी प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांचा आदर राखून, स्वेच्छेने सहकार्य आणि सर्वोत्तम पद्धतींच्या देवाणघेवाणीद्वारे , एका व्यावहारिक, पुराव्यावर आधारित दृष्टिकोनाचे आवाहन केले.
रोजगारक्षमता, कौशल्य मॅपिंग आणि विकास यांवरील प्राधान्य क्षेत्र III वरील विचारमंथनातून ब्रिक्स देशांमध्ये संरचित सहकार्याची गरज स्पष्टपणे अधोरेखित झाली. प्रस्तावित आराखडा कौशल्यविषयक माहिती सुधारणे, पात्रतेची तुलनात्मकता वाढवणे आणि डिजिटल, हरित व आरोग्य सेवा अर्थव्यवस्थेतील कौशल्यविषयक ज्ञान-देवाणघेवाणीला चालना देण्यावर केंद्रित असेल.
श्रम बाजारपेठेतील वेगवान बदलांच्या पार्श्वभूमीवर, सदस्य राष्ट्रांनी शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षणापासून वंचित (NEET) तरुणांचा दर कमी करण्याच्या उद्देशाने, शिकाऊ उमेदवारी, इंटर्नशिप, व्यावसायिक शिक्षण, उद्योजकता कार्यक्रमांचा विस्तार आणि लक्ष्यित उपक्रमांद्वारे युवकांची रोजगारक्षमता वाढवण्याच्या दिशेने काम करण्याचा प्रस्ताव मांडला .
चर्चेदरम्यान, सदस्य राष्ट्रांनी ज्ञान-सामायिकीकरणाच्या समृद्ध सत्रांमध्ये सहभाग घेतला आणि आपापल्या देशांचे अभिनव उपक्रम आणि सर्वोत्तम पद्धती सादर केल्या.
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2258538)
अभ्यागत कक्ष : 11