आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नवी दिल्लीत भारत मंडपम इथे झालेल्या भारत आणि जपान यांच्यातील आरोग्यसेवांसंबंधित संयुक्त समितीच्या तिसऱ्या बैठकीत दोन्ही देशांमधील आरोग्यसेवा सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2026 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2026
नवी दिल्लीत भारत मंडपम इथे आज भारत आणि जपान यांच्या आरोग्यसेवांसंबंधित संयुक्त समितीची तिसरी बैठक पार पडली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि जपानच्या आरोग्य धोरण प्रभारी मंत्री किमी ओनोडा यांच्या सह-अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
आरोग्य क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि नवीन भागीदारी वाढवण्यासाठी ही बैठक म्हणजे दोन्ही देशांच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे हे या प्रसंगी बोलताना नड्डा यांनी अधोरेखित केले. आरोग्यसेवेतील भारत-जपान सहकार्य हे आरोग्यसेवा आणि स्वास्थ्यसंबंधित सहकार्य सामंजस्य कराराने प्रेरित असून भारताच्या नागरिकांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आरोग्य व्यवस्था मजबूत करणे, उपलब्धता सुधारणे आणि नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी सामायिक दृष्टिकोनाद्वारे मार्गदर्शन केले जाते.


भारत आणि जपान यांच्यातील शतकाहून अधिक काळापासून विविध क्षेत्रांमध्ये रुजलेल्या दीर्घकालीन आणि बहुआयामी संबंधांवर नड्डा यांनी प्रकाश टाकला आणि “सबका साथ, सबका विकास” या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत सर्वसमावेशक विकासाप्रति भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. आरोग्यसेवा क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य पुढे नेण्यासाठी संयुक्त समितीची बैठक हे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बैठकीला संबोधित करताना, ओनोडा यांनी नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून आरोग्यसेवा सहकार्याला चालना देण्यासाठी जपानचा सातत्यपूर्ण सहभाग अधोरेखित केला, तसेच द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याची वचनबद्धता व्यक्त केली.
संयुक्त समितीच्या बैठकीदरम्यान, प्रमुख प्राधान्य क्षेत्रांवर सविस्तर सादरीकरणे आणि चर्चा झाली.
दोन्ही देशांमधील सहकार्य पुढे नेण्यासाठी या बैंठकींतील निर्णयांमुळे एक मजबूत आधार मिळेल, असे नड्डा यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात सांगितले. तसेच दोन्ही देशांच्या नागरिकांच्या सामायिक हेतूला अर्थपूर्ण फलश्रुती मिळण्यासाठी जपानसोबत काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

ओनोडा यांनी दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक पुढे नेण्याच्या जपानच्या वचनबद्धतेचा, तसेच आरोग्य क्षेत्रात भारत-जपान दरम्यान विशेष दीर्घकालीन आणि जागतिक स्तरावरील भागीदारी मजबूत करण्याच्या जपानच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला.

* * *
सुषमा काणे/उमा रायकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2258032)
आगंतुक पटल : 34