पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पश्चिम आशियातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रमुख क्षेत्रांशी संबंधित ताजी अद्ययावत माहिती
मार्शल आयलंडचा ध्वज असलेले आणि 46,313 मेट्रिक टन एलपीजी घेऊन आलेल्या एमटी सर्व शक्ती या जहाजाने काल सुरक्षितपणे हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. आता हे जहाज 13 मे 2026 रोजी विशाखापट्टणम इथे पोहोचेल अशी अपेक्षा आहे
संयुक्त अरब अमिरातीच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून त्यांच्या हवाई हद्दीतील सामान्य प्रवाशांसाठीची विमान वाहतूक सेवा पूर्णपणे पूर्ववत झाल्याची घोषणा, भारतीय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या विमान सेवा कंपन्यांद्वारे काल संयुक्त अरब अमिराती इथून भारतासाठी उड्डाणे
Posted On:
03 MAY 2026 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2026
पश्चिम आशियातील सातत्याने बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार समन्वित प्रतिसादात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून प्रमुख क्षेत्रांमधील सज्जता आणि सातत्यपूर्णता सुनिश्चित करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. ऊर्जा पुरवठा, सागरी क्षेत्राशी संबंधित कार्यान्वयन आणि संघर्षग्रस्त प्रदेशातील भारतीय नागरिकांना मदत पुरवण्यासंबंधी उचललेल्या पावलांबद्दलची माहिती खाली नमूद केली आहे :
ऊर्जा पुरवठा आणि इंधन उपलब्धता
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने इंधन पुरवठ्याशी संबंधित सद्यस्थितीची अद्ययावत माहिती दिली आहे. पश्चिम आशियातील सातत्याने बदलत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजी सुरुळीतपणे उपलब्ध राहील याची सुनिश्चित करण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती खाली दिली आहे:
अंमलबजावणी आणि देखरेख विषयक कार्यवाही
- देशभरात एलपीजीची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अंमलबजावणी कार्यवाही सुरूच आहे. या अंतर्गत काल देशभरात 1900 पेक्षा जास्त छापे टाकण्यात आले आहेत.
- सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी विना सूचना तपासण्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे. याअंतर्गत कालपर्यंत 349 एलपीजी वितरकांना दंड आकारण्यात आला आहे, तर 74 एलपीजी वितरकांना निलंबित करण्यात आले आहे.
एलपीजी पुरवठा
घरगुती वापराच्या एलपीजी पुरवठ्याची सद्यस्थिती:
- सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठा अजूनही बाधित आहे.
- घरगुती वापरासाठीच्या एलपीजी पुरवठ्याला प्राधान्यक्रमावर ठेवण्यात आले आहे.
- एलपीजी वितरकांकडील साठा संपला असल्याची कोणतीही नोंद झालेली नाही.
- काल उद्योगक्षेत्राअंतर्गत एलपीजी सिलेंडरच्या ऑनलाइन मागणीपर नोंदणींचे प्रमाण वाढून 99% पर्यंत पोहोचले आहे.
- इंधनाचा गैरवापर रोखण्यासाठी वितरण प्रमाणीकरण सांकेतांक आधारित वितरणाचे प्रमाण सुमारे 94% पर्यंत वाढले आहे. हा सांकेतांक ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो.
- दिनांक 02.05.2026 रोजी सुमारे 47.4 लाख इतक्या एलपीजी सिलेंडरची मागणी नोंदवण्यात आली होती. त्या तुलनेत सुमारे 47 लाख घरगुती एलपीजी सिलेंडर प्रत्यक्ष वितरीत करण्यात आले आहेत.
व्यावसायिक एलपीजी पुरवठा आणि वाटप उपाययोजना:
- एकूण व्यावसायिक एलजीपीचे वाटप संघर्षपूर्व काळातील पातळीच्या सुमारे 70% पर्यंत वाढवण्यात आले असून त्यामध्ये 10% सुधारित संलग्न वाटपाचाही समावेश आहे.
- एप्रिल 2026 या महिन्यापासून, 23.44 लाख -5 किलो क्षमतेच्या एफटीएल सिलेंडर्सची विक्री झाली.
- काल, 66,000- 5 किलो क्षमतेच्या एफटीएल सिलेंडरचे वितरण झाले.
- 3 एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी (पीएसयू ओएमसी) 5 किलो एफटीएल सिलेंडर्सविषयी जनजागृती करण्यासाठी 10,100 हून अधिक शिबिरांचे आयोजन केले आहे, त्यामध्ये 5 किलो एफटीएलच्या जवळपास 1,75,000 सिलेंडर्सची विक्री करण्यात आली.
- काल, 5 किलो क्षमतेच्या 3778 सिलेंडर्सची 130 हून अधिक शिबिरांमधून विक्री.
- 02.05.2026 रोजी जवळपास (4.33 लाख-19 किलो क्षमतेच्या सिलेंडरच्या समतुल्य) 8220 मेट्रीक टन व्यावसायिक एलपीजीची विक्री झाली.
- एप्रिल 2026 पासून, सार्वजनिक क्षेत्रातील तेल वितरण कंपन्यांनी 11082 मेट्रीक टन ऑटो एलपीजीची विक्री केली आहे.
नैसर्गिक वायू पुरवठा आणि पीएनजी विस्तारीकरण उपक्रम
- मार्च 2026 पासून एकंदर 6.04 लाख पीएनजी जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आणि अतिरिक्त 2.68 लाख जोडण्यांसाठी पायभूत सुविधा विकसित कऱण्यात आल्या, त्यामुळे एकंदर जोडण्यांची संख्या 8.72 लाख पर्यंत पोहोचली आहे. त्याच बरोबर सुमारे 6.73 लाख ग्राहकांनी नवीन जोडणीसाठी नोंदणी केली आहे.
- 02.05.2026 पर्यंत 43,630 पीएनजी ग्राहकांनी मायएनजीडी.आयएन (MYPNGD.in)या संकेतस्थळाद्वारे त्यांच्या एलपीजी जोडण्या परत केल्या आहेत.
कच्च्या तेलाची स्थिती आणि शुद्धीकरण कार्यचालन
- सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प पुरेश्या कच्च्या तेलाच्या साठ्यासह पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, त्याचवेळी पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठाही राखला जात आहे.
- देशांतर्गत वापराला पूरक म्हणून, तेलशुद्धीकरण प्रकल्पांतून होणारे देशांतर्गत एलपीजी उत्पादनामध्ये वाढ करण्यात आली आहे.
किरकोळ इंधनाची उपलब्धता आणि किंमत निर्धारण उपाय
- देशभरातली सर्व किरकोळ विक्री केंद्रांचे कामकाज सुरळीत सुरू आहे.
सागरी सुरक्षा आणि जहाज वाहतूक कार्यचालन
बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय जहाजांच्या आणि खुलाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना लागू केल्या आहेत. मंत्रालयाने नमूद केले आहे की,
- जहाज वाहतूक अद्ययावत माहितीः मार्शल आयलंडचा ध्वज असलेले, 46,313 मेट्रीक टन एलपीजी (भारतीय माल)वाहक एमटी सर्व शक्ती (आयएमए नं- 9350599) जहाज, त्यावरील 18 भारतीयांसह एकूण 20 जहाज कर्मचाऱ्यांसह 02.05.2026 रोजी होमूर्झच्या सामुद्रधुनी ओलांडून सुरक्षितपणे पुढे गेले आहे आणि हे जहाज 13 मे 2026 पर्यंत विशाखापट्टणम् येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे.
- या क्षेत्रातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि भारतीय ध्वजधारी कोणत्याही जहाजाशी संबंधित काही घटना घडल्याचे गेल्या 24 तासांत कोणतेही वृत्त नाही.
परिसरातील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत
परराष्ट्र मंत्रालय आखाती देश आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सतत लक्ष ठेवून आहे. या भागातील भारतीय समुदायाची सुरक्षा आणि त्यांच्या हितासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या संदर्भात खालील माहिती देण्यात आली आहे:
- माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित संपर्कात आहेत.
- भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास मदतीसाठी 24 तास हेल्पलाईन चालवत आहेत. ते आपल्या नागरिकांना सक्रियपणे मदत करत असून तेथील स्थानिक प्रशासनाच्याही संपर्कात आहेत.
- 2 मे रोजी, संयुक्त अरब अमिरातीच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने विमान वाहतूक पुन्हा पूर्णपणे सुरू झाल्याची घोषणा केली. तेथील तात्पुरते निर्बंधही आता उठवण्यात आले आहेत. भारतीय आणि संयुक्त अरब अमिरातीच्या विमान कंपन्या तिथून भारताच्या विविध शहरांसाठी उड्डाणे चालवत आहेत.
- सौदी अरेबिया आणि ओमानमधील विविध विमानतळांवरून भारतासाठी विमान सेवा सुरू आहे.
- कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि कतार एअरवेज कतारहून भारतासाठी विमान सेवा चालवत आहेत.
- कुवेतचे हवाई क्षेत्र खुले आहे. जझीरा एअरवेज आणि कुवेत एअरवेज कुवेत ते भारत अशी उड्डाणे चालवत आहेत.
- बहरीनचे हवाई क्षेत्र खुले आहे. एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि गल्फ एअर बहरीनहून भारताच्या विविध शहरांसाठी विमान सेवा पुरवत आहेत.
- इराकचे हवाई क्षेत्र खुले असून तिथून मर्यादित विमान सेवा सुरू आहे. या सेवांचा वापर करून नागरिक भारताकडे प्रवास करू शकतात.
- इराणचे हवाई क्षेत्र मालवाहू आणि चार्टर्ड विमानांसाठी अंशतः खुले आहे. आम्ही भारतीय नागरिकांना इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला असून, जे भारतीय तिथे आहेत, त्यांना दूतावासाच्या मदतीने रस्ते मार्गांनी बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत, तेहरानमधील भारतीय दूतावासाने 2,504 भारतीय नागरिकांना रस्ते मार्गांनी सुखरूप बाहेर काढले आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/विजयालक्ष्मी साळवी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257672)
अभ्यागत कक्ष : 24