दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
विनाविलंब इशारा यंत्रणा; भारतात सार्वजनिक सुरक्षेसाठी सेल ब्रॉडकास्ट सेवेची सुरुवात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या या स्वदेशी बनावटीच्या सेल ब्रॉडकास्ट प्रणालीचा केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते शुभारंभ
Posted On:
02 MAY 2026 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2026
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते आज 'सेल ब्रॉडकास्ट सिस्टीम' (CBS) या स्वदेशी तंत्रज्ञानाचे लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, दूरसंचार विभागाच्या (DoT) अंतर्गत असलेल्या 'सी-डॉट'ने (C-DOT), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि गृह मंत्रालयासोबत (MHA) मिळून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतातील आपत्कालीन दळणवळण यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या आणि सार्वजनिक सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय, NDMA आणि C-DoT यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल बोलताना केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी, सेल ब्रॉडकास्ट सिस्टीमचे लोकार्पण हा भारताच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातील एक क्रांतिकारी टप्पा असल्याचे नमूद केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'घटनेनंतर प्रतिसाद' देण्याऐवजी 'पूर्वसिद्धता' बाळगण्याच्या आमच्या बदलत्या दृष्टिकोनाचे हे प्रतिबिंब असल्याचे ते म्हणाले. प्रगत दूरसंचार तंत्रज्ञानाचा वापर करून, ही यंत्रणा लाखो लोकांपर्यंत भौगोलिक स्थानानुसार तत्काळ आणि अचूक इशारे पोहोचवते, ज्यामुळे एकही व्यक्ती माहितीपासून वंचित राहणार नाही. ही स्वदेशी आणि जागतिक दर्जाची प्रणाली आपली सज्जता वाढवते, प्रतिसाद देण्याची क्षमता सुधारते आणि सुरक्षित व लवचिक भारत घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळकट करते, असेही सिंधिया यांनी सांगितले.
या कार्यक्रमादरम्यान, गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनुज शर्मा यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोर आपत्ती निवारणाची सज्जता आणि 'एनडीएमए'द्वारे (NDMA) राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.

'सेल ब्रॉडकास्ट सोल्यूशन' (CBS) ही दूरसंचार क्षेत्रावर आधारित एक सार्वजनिक इशारा प्रणाली आहे, ज्याद्वारे प्रशासन एका ठराविक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांवर एकाच वेळी भौगोलिक-लक्ष्यित (geo-targeted) इशारे प्रसारित करू शकते. 'सचेत' (SACHET) या 'कॅप' (CAP) आधारित व्यासपीठाशी जोडल्या गेल्यामुळे, याद्वारे अत्यंत जलद आणि प्रमाणित पद्धतीने सूचना देणे शक्य झाले आहे. पारंपारिक एसएमएस (SMS) आधारित यंत्रणेच्या मर्यादांवर मात करत, ही प्रणाली लक्ष्यित क्षेत्रातील मोठ्या लोकसंख्येपर्यंत अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे महत्त्वाची माहिती पोहोचवण्यात मदत करते.
या उपक्रमाचा भाग म्हणून, या प्रणालीची आज देशव्यापी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या चाचणी दरम्यान, देशातील मोबाईल फोनवर आपत्कालीन सतर्कतेचे संदेश एका विशिष्ट ध्वनीसह प्रसारित करण्यात आले. आपत्ती आणि आणीबाणीच्या काळात वेळेवर माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीने हे प्रात्यक्षिक एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.
देशाच्या आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी दिलेले अमूल्य योगदान आणि निःस्वार्थ सेवेची दखल घेत, सिंधिया यांनी व्यक्ती आणि संस्थांना सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार प्रदान केले. याप्रसंगी आपत्ती व्यवस्थापनावरील मार्गदर्शक तत्त्वे आणि पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

सीबीएस अचूक भू-लक्ष्यीकरण क्षमता प्रदान करते, त्यामुळे वैयक्तिक मोबाईल टॉवर किंवा सामूहिक स्तरावर सतर्कतेचे संदेश प्रसारित करणे शक्य होते, तसेच मोठ्या भौगोलिक क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याची सुविधाही यात आहे. हे संदेश तात्काळ पोहोचवले जातात, त्यामुळे कोणत्याही विलंबाशिवाय माहिती वापरकर्त्यांपर्यंत पोहोचते. उच्च विश्वासार्हतेसाठी रचना केलेली ही प्रणाली नेटवर्कमधील गर्दीमुळे प्रभावित होत नाही, त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत विनाविलंब संवाद सुनिश्चित होतो. लक्ष्यित क्षेत्रातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत याची पोहोच असून, रोमिंगवर असलेल्या वापरकर्त्यांचाही यात समावेश आहे तसेच हे इशारे वापरकर्त्यांना स्वतःहून बंद करता येत नाहीत. याव्यतिरिक्त, हे संदेश प्राधान्यक्रमाने माहिती म्हणून दिले जातात, जे एका विशिष्ट मोठ्या ध्वनीसह पॉप-अप मेसेजच्या रूपात दिसतात.
ही प्रणाली त्वरित आणि बहुभाषिक सतर्कतेचे संदेश पाठवण्यास सक्षम आहे. यामुळे अचानक येणारे पूर आणि वायू गळतीसारख्या आपत्तींच्या वेळी बचावात्मक पावले उचलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा वेळ मिळतो. 2जी ते 5जी अशा सर्व नेटवर्कवर ही सुविधा उपलब्ध असल्याने, शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत, अगदी शेवटच्या घटकापर्यंत आणि रोमिंग क्षेत्रात असलेल्या नागरिकांपर्यंत याची व्याप्ती सुनिश्चित होते. थेट आणि अधिकृत संवादाच्या सुविधेमुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक बळकट होते, प्रतिसाद वेगवान होतो, भीतीचे वातावरण कमी होते आणि सार्वजनिक विश्वास तसेच नियमांचे पालन करण्याची वृत्ती वाढते.
Follow DoT Handles for more: -
X - https://x.com/DoT_India
Insta- https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==
Fb - https://www.facebook.com/DoTIndia
Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa
* * *
शैलेश पाटील/वैभवी जोशी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2257547)
अभ्यागत कक्ष : 21