आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

6,000 हून अधिक लोकांनी एकाच ठिकाणी भुजंगासन करून नोंदवला आशियायी विक्रम; योग महोत्सवातून आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 साठी 50 दिवसांची उलटगणना सुरू


योग महोत्सवाला जागतिक प्रतिसाद; 20 पेक्षा अधिक देशांचा आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 साठीच्या 50 दिवसांच्या उलटगणनेत सहभाग

“योग – 2027 पर्यंत सुदृढ आणि शिस्तबद्ध ‘विकसित भारत’ घडवण्याची गुरुकिल्ली”: केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी

"हैदराबाद हे योग आणि स्वास्थ्यासाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास यावे": रेड्डी

"योग भारताची 'आरोग्य आणि वैद्यकीय सेवेचे जागतिक केंद्र' म्हणून असलेली ओळख अधिक बळकट करतो": केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

“‘योग 365’ अभियान नागरिकांना योगाचा दैनंदिन सराव करण्यास प्रोत्साहित करते”: प्रतापराव जाधव

Posted On: 02 MAY 2026 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2026

 

'मोत्यांचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हैदराबादमध्ये 'योग महोत्सवाचा' मोठा थाट पाहायला मिळाला. 2026 च्या 'आंतरराष्ट्रीय योग दिनाला' आता केवळ 50 दिवस उरले असून, त्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हजारो योगप्रेमी उत्साहाने सहभागी झाले होते. आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या 'मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेद्वारे' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 'कान्हा शांती वनम' या निसर्गरम्य आध्यात्मिक केंद्रावर हा योग सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.

कान्हा शांती वनम येथे 6,000 हून अधिक साधकांनी एकाच वेळी 'भुजंगासन' सादर करून एक नवा इतिहास रचला. इतक्या मोठ्या संख्येने एकत्रितपणे हे आसन केल्यामुळे या कार्यक्रमाची नोंद 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झाली असून, हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ही कामगिरी योगसाधनेच्या माध्यमातून जोपासली जाणारी सामूहिक सहभागाची भावना आणि सर्वांगीण कल्याणाचे प्रतीक आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री  जी. किशन रेड्डी उपस्थित होते. “योग हा केवळ भारताचा प्राचीन वारसा नसून संपूर्ण मानवजातीला मिळालेली एक अनमोल देणगी आहे. आज जगभरातील दिग्गज नेते, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक आणि सामान्य जनता योगाभ्यास करत असून त्यातून लाभ मिळवत असल्याचे रेड्डी यावेळी म्हणाले.

   

देशाच्या जडणघडणीत योगसाधनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना रेड्डी यांनी, “2047 पर्यंत भारताला 'विकसित भारत' बनवण्यासाठी आपण एक सुदृढ, शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध समाज घडवणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तणाव, बदललेली जीवनशैली, आणि प्रदूषण यांसारख्या आधुनिक काळातील आव्हानांवर योगसाधना हा एक व्यावहारिक आणि विनामूल्य उपाय आहे, असे ते म्हणाले. जागतिक स्तरावर कल्पकता आणि तंत्रज्ञानासाठी ओळखले जाणारे हैदराबाद शहर आता योग आणि स्वास्थ्यासाठी जागतिक केंद्र म्हणूनही उदयास यायला हवे, अशी अपेक्षा मंत्री रेड्डी यांनी यावेळी व्यक्त केली. 

आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी बोलताना, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी लाभलेल्या नेतृत्वाखाली, योगसाधना ही आता संपूर्ण जगासाठी 'सर्वांगीण कल्याणाची' एक चळवळ बनली असल्याचे नमूद केले.  शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तसेच भावनिक संतुलन राखण्यासाठी ही चळवळ मोलाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले. आरोग्य आणि आरोग्य पर्यटनाच्या (हेल्थ टुरिझम) क्षेत्रात भारताच्या वाढत्या प्रभावावर भर देताना जाधव यांनी, योगसाधनेमुळे भारताची 'आरोग्य आणि वैद्यकीय सेवेचे जागतिक केंद्र' म्हणून असलेली ओळख अधिक बळकट झाली असल्याचे सांगितले.

नव्याने सुरू करण्यात आलेल्या योगा 365 या उपक्रमावर प्रकाश टाकताना ते म्हणाले, योगा 365 मोहिमेद्वारे, आयुष मंत्रालय, हॅबिल्ड आणि एमडीएनआयवाय यांच्या सहकार्याने योग नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. 21 जून पर्यंत 100 दिवसांचा विनामूल्य योग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून, लाखांपेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातील सहभागींना योग मित्र प्रमाणपत्र दिले जात आहे.

   

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची 25 दिवसांची उलटगणती साजरी करणारा पुढील योग महोत्सव मध्यप्रदेशातील खजुराहो येथे आयोजित केला जाईल, असेही  त्यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमातून देशाचा सांस्कृतिक वारसा, वास्तुकला आणि आरोग्य परंपरांचा संगम दिसून येईल. जपानच्या ओसाका येथील वर्ल्ड एक्स्पो 2025 दरम्यान सहा महिने योग सत्रे आयोजित केल्याबद्दल मंत्री महोदयांनी हार्टफुलनेस संस्था आणि योग प्रमाणन मंडळाच्या प्रयत्नांचेही यावेळी कौतुक केले.

याप्रसंगी, आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मोनालिसा दास यांनी हार्टफुलनेस संस्थेच्या योगदानाची दखल घेतली. त्या म्हणाल्या की, कान्हा शांती वनम हे त्या शांतता आणि संतुलनाचे प्रतिबिंब आहे जे योग विकसित करण्याचा प्रयत्न करते. या मेळाव्याचा उद्देश आरोग्य आणि एकतेच्या दिशेने देशव्यापी चळवळ सुरू करणे हा आहे.

या कार्यक्रमाला हार्टफुलनेसचे अध्यक्ष कमलेश डी. पटेल , लोकसभा खासदार डी. के. अरुणा, आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, तसेच आयुष मंत्रालय, राज्य प्रशासन आणि आघाडीच्या योग संस्थांमधील इतर मान्यवर उपस्थित होते.

योग महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे सामान्य योग शिष्टाचाराचे झालेले सामूहिक सादरीकरण होते, एमडीएनआयवायचे संचालक प्रा. काशिनाथ समगंडी आणि एमडीएनआयवायच्या योग प्रशिक्षकांनी या सत्राचे नेतृत्व  केले. योगसाधनेनंतर, कमलेश पटेल दाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हार्टफुलनेस ध्यान सत्र पार पडले. हा कार्यक्रम 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या देशव्यापी तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कार्यक्रमाच्या इतर आकर्षणांमध्ये नाट्ययोग सादरीकरण आणि कोरियन संघाने सादर केलेल्या योग फ्युजनचा समावेश होता.

   

कझाकस्तान, लेसोथो, बल्गेरिया, क्युबा, नामिबिया, युनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह 20 पेक्षा जास्त देशांतील दूतावास, वाणिज्य दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे मान्यवर आणि प्रतिनिधी या 50 दिवसांच्या उलटगणती कार्यक्रमात सहभागी झाले, यातून योगसाधनेचा वाढता जागतिक प्रभाव दिसून आला. कान्हा शांती वनम येथे आयोजित योग महोत्सव हा आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पूर्वतयारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. योगाद्वारे सर्वांगीण आरोग्य, सुदृढता आणि शाश्वत जीवनशैलीला चालना देण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257512) अभ्यागत कक्ष : 13