रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जम्मू प्रथमच पॅसेंजर रेल्वेगाडीने थेट काश्मीरशी जोडले गेले


जम्मू येथील एकाच इंटरचेंजमुळे आता तुम्ही भारतातून कुठूनही काश्मीर खोऱ्यात पोहोचू शकता सुलभपणे

थेट रेल्वे जोडणीमुळे सर्व ऋतूंमध्ये काश्मीरला भेट देणे शक्य, ज्यामुळे मिळेल समृद्ध प्रवासाचा अनुभव

जम्मू-तावी श्रीनगर वंदे भारत एक्स्प्रेस अखंडित दळणवळण उपलब्ध करून क्षेत्रातील पर्यटनाला चालना देईल

स्थानिक अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वे काश्मीर खोऱ्यात वाढवत आहे रेल्वेमार्गांची क्षमता

Posted On: 30 APR 2026 9:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2026

 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू तावी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित श्रीनगर–श्री माता वैष्णो देवी कटरा वंदे भारत एक्सप्रेस सेवेला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर प्रथमच थेट पॅसेंजर रेल्वेने थेट जोडले गेले आहेत. आता एकाच रेल्वेमार्गाने या प्रदेशातील दोन सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांना जोडले असून त्यामुळे केवळ प्रवासच जलद होणार नसून या नयनरम्य प्रदेशातून वाहणारा लोकांचा, व्यापाराचा आणि पर्यटनाचा प्रवाह प्रदेशाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकेल. श्रीनगर-कटरा  दरम्यानची सेवा विस्तारून  आता जम्मू तावीपर्यंत करण्यात आल्यामुळे देशभरातील प्रवाशांसाठी श्री माता वैष्णो देवी आणि श्री अमरनाथ यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ होईल.

 

मुख्य रेल्वे प्रवेशद्वार म्हणून जम्मू तावीचा उदय

जम्मू तावी हे उत्तर भारतातील सर्वात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून ते या केंद्रशासित प्रदेशाला उर्वरित देशाशी जोडणारे महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार आहे. कन्याकुमारी, हावडा, मुंबई आणि इतर महानगरीय केंद्रांसारख्या प्रमुख ठिकाणांशी असलेल्या विस्तृत रेल्वे जोडणीमुळे हे स्थानक विविध प्रदेशांमध्ये अखंडित वाहतूक सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

या उद्घाटन कार्यक्रमातील आपल्या भाषणात वैष्णव यांनी या घडामोडीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे जोडणीच्या विस्तारामुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

 

वाढती मागणी आणि प्रवासाचा अधिक चांगला अनुभव

रेल्वेमंत्र्यांनी अधोरेखित केले की वंदे भारत सेवा सुरू झाल्यापासून ती पूर्ण क्षमतेने धावत आहे, प्रवाशांमध्ये तिची वाढती लोकप्रियता दिसून येत आहे, यामुळे जम्मू-काश्मीर तसेच उर्वरित देशासाठी जीवनरेखा म्हणून तिचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आज जम्मू आणि श्रीनगर दरम्यान 20 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेस सेवेचा प्रारंभ करण्यात आला, यामुळे या महत्वाच्या मार्गावरील प्रवासी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 6 जून रोजी जम्मू-श्रीनगर रेल्वे लिंकचे उद्घाटन केले होते. त्यामुळे या प्रदेशात अखंड रेल्वे जोडणीचा पाया रचला गेला, आणि त्यानंतर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत हा विकास झाल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नमूद केले. विस्तारित वंदे भारत सेवेच्या प्रारंभाने या ऐतिहासिक कॉरिडॉरला अधिक बळकटी मिळाली आहे, यामुळे प्रवास अधिक आरामदायक होईल, प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण होईल, तसेच जम्मू आणि श्रीनगर दरम्यानची सर्व प्रकारच्या हवामानातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. त्यांनी यावर भर दिला की, ही गाडी विशेषतः या प्रदेशातील शून्य अंशाहून कमी तापमानासारख्या आव्हानात्मक हवामानाच्या परिस्थितीत चालवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये विशेष प्रणालींसह ऑनबोर्ड उपकरणांची अखंडित कार्यक्षमता सुनिश्चित करण्यात आली आहे.

 

वैष्णव यांनी अधोरेखित केले की, या गाडीमध्ये प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि उच्च-दर्जाच्या सेमीकंडक्टर-आधारित प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे, यामुळे ती वाहतुकीचे एक अत्यंत आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक साधन ठरते.

रेल्वे पायाभूत सुविधा वाढल्यामुळे स्थानिक उत्पादनांची सुलभ वाहतूक शक्य होत असून यामुळे  आर्थिक विकासाला देखील चालना मिळत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.  जम्मू आणि काश्मीर हे दर्जेदार सुका मेवा, उत्कृष्ट पश्मिना शाल, सफरचंद आणि पारंपरिक हाताने विणलेले गालिचे (कालीन) यासाठी ओळखले जाते आणि या उत्पादनांना संपूर्ण भारतात मागणी आहे. सुधारित रेल्वे जोडणीमुळे, या मालाची देशभरातील बाजारपेठांपर्यंत होणारी वाहतूक अधिक वेगवान आणि कार्यक्षम बनत आहे, परिणामी, स्थानिक उपजीविकेला आधार मिळत असून व्यापाराच्या संधींचा विस्तार होत आहे.

व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना चालना

इतक्या उंचीवर रेल्वे गाडी चालवण्याचा भारताचा हा पहिलाच अनुभव आहे आणि यामधून मिळालेला अनुभव भविष्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मार्गदर्शक ठरेल, असे वैष्णव यांनी नमूद केले.

रेल्वेमुळे या भागातील मालवाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाली असून त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होण्याबरोबरच खते आणि दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अधिक सुरळीत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. चेरीसह इतर कृषी उत्पादनांची वाहतूक देखील पार्सल सेवांद्वारे केली जात आहे, त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेत प्रवेशास आणखी वाव मिळत आहे.

रेल्वे नेटवर्कमुळे वाहतूक व्यवस्था सुलभ झाली आहे तसेच या प्रदेशातील आर्थिक उलाढालींमध्येही त्याचे योगदान असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. भविष्यात, या हिमालयीन प्रदेशात सुरक्षित आणि विश्वसनीय वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी देखभाल प्रणाली बळकट करण्यासोबतच पूल आणि बोगद्यांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाईल.

काश्मीर खोऱ्यातील रेल्वे मालवाहतुकीचे एकात्मीकरण आणि आर्थिक दुवा 

उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे काश्मीर खोरे भारताच्या उर्वरित भागातील रेल्वे जाळ्याशी एकसंधपणे जोडले गेले आहे. याचा केवळ प्रवाशांनाच फायदा झाला नसून या भागातील व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींनाही त्यामुळे चालना मिळाली आहे. जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूल आणि अंजी खड्ढ  पूल यांसारख्या अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या सुविधांमुळे या प्रदेशात विनाव्यत्यय, सर्व-हवामानात रेल्वे वाहतूक करणे शक्य झाले आहे. रेल्वेमंत्र्यांनी जम्मू-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसमधून जम्मूपासून कटरापर्यंत प्रवास केला. त्यानंतर वैष्णव यांनी अंजी  खड्ढ   पूल आणि चिनाब रेल्वे पुलाची पाहणी केली.

 

श्रीनगर-कटरा वंदे भारत एक्सप्रेसचा जम्मू तावीपर्यंतचा विस्तार हे या भागाला राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी अधिक जवळून जोडण्याच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे, यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, व्यापाराला गती मिळेल तसेच एकूणच संपर्क व्यवस्थेत वाढ होईल.  जम्मू  भारतातील सर्व दिशांना असलेल्या सर्व प्रमुख केंद्रांशी चांगल्या प्रकारे जोडलेले असल्याने जम्मूसारख्या सोयीच्या ठिकाणी जंक्शन उपलब्ध झाल्यामुळे, देशभरातील प्रवाशांना आता काश्मीर खोऱ्यात विनासायास पोहोचता येऊ शकेल. या विकासामुळे लोकांमधील संपर्क अधिक दृढ होण्याचा आणि काश्मीर देशाच्या उर्वरित भागातील अर्थकारणाशी आणखी जोडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

* * *

सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/राजश्री आगाशे/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2257154) अभ्यागत कक्ष : 15