इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक उत्पादनाच्या क्षेत्रात, भारत जगासाठी एक प्रमुख आणि विश्वासार्ह मूल्य साखळी तसेच पुरवठा साखळी भागीदार म्हणून उदयाला येईल: केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव


विशाखापट्टणम येथे गुगल क्लाऊड इंडिया एआय हबच्या भूमीपूजन समारंभाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची उपस्थिती

Posted On: 28 APR 2026 1:55PM by PIB Mumbai

विशाखापट्टणम/नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2026

 

मजबूत धोरणात्मक पाठबळ आणि दूरदर्शी नेतृत्वामुळे, भारत इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रात जगासाठी एक विश्वासार्ह मूल्य साखळी आणि पुरवठा साखळीचा भागीदार म्हणून उदयास येण्यासाठी सज्ज असल्याचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

ते विशाखापट्टणम येथे गुगल क्लाऊड इंडिया एआय हबच्या भूमीपूजन समारंभानंतर उपस्थितांना संबोधित करत होते.

इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादन क्षेत्रात भारताचा उदय:

अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले की, भारत आयटी सेवांच्या क्षेत्रात यापूर्वीच एक अग्रेसर देश म्हणून उदयाला आला असून, आता इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रातही वेगाने प्रगती करत आहे. सेमीकंडक्टर्स, क्वांटम, अंतराळ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या प्रमुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये भारताला जागतिक केंद्र म्हणून उदयाला येण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, आणि पंतप्रधानांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली.

भारताने मोबाईल उत्पादनात लक्षणीय प्रगती केली असून मोबाईल फोन हा देशातील सर्वाधिक निर्यात होणाऱ्या वस्तूंपैकी एक बनला आहे, असे त्यांनी नमूद केले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या देशांतर्गत मागणीपैकी जवळजवळ 50% मागणी आता स्थानिक उत्पादनाद्वारे पूर्ण केली जात आहे. तसेच सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत भारतात व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत एक विश्वासू भागीदार बनत आहे, यावर त्यांनी भर दिला आणि गुगलसह जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांचे सर्व्हर, जीपीयू आणि चिप्स देशातच तयार करण्याचे आवाहन केले.

विशाखापट्टणम कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र म्हणून उदयाला येत आहे:

हा प्रकल्प परिवर्तनकारक असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री म्हणाले की, अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि जागतिक गुंतवणुकीमुळे विशाखापट्टणम एआय पट्टणम (एआय सिटी) म्हणून विकसित होईल.

उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी गुगल क्लाऊड ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चरचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले. एआय हब हे विकसित भारत 2047 चा पाया घालेल आणि भारताच्या डिजिटल परिवर्तन आणि जागतिक एआय अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावेल असे उपाध्यक्ष बिकाश कोले यांनी सांगितले.

अदानी समूहाचे अध्यक्ष जीत अदानी म्हणाले की, 1 गिगावॅट हायपरस्केल एआय डेटा सेंटर, भारताच्या एआय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि विशाखापट्टणमला भारताचे एक नवीन डिजिटल प्रवेशद्वार म्हणून स्थापित करेल.

 

* * *

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256788) अभ्यागत कक्ष : 9