सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारतातील महिला आणि पुरुष 2025:निवडक निदर्शक आणि आकडेवारी” चे प्रकाशन

Posted On: 29 APR 2026 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2026

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने “ भारतातील महिला आणि पुरुष 2025 : निवडक निदर्शक आणि आकडेवारी” या शीर्षकाच्या आपल्या अहवालाच्या 27 व्या आवृत्तीचे प्रकाशन आज (29 एप्रिल 2026) ओदिशाच्या भुवनेश्वर इथे, ‘डेटा विकास” या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र परिषदेत केले.

या प्रकाशनात, भारतातील स्त्रिया आणि पुरुषांच्या सद्यस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन महत्वाची क्षेत्रे, जसे की लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, वित्तीय सहभाग, निर्णयप्रक्रिया,  महिलांवर होणारी हिंसा आणि इतर लिंग आधारित प्रश्न अशा महत्वाच्या क्षेत्रातील माहितीच्या निदर्शकांचे संकलन त्यात करण्यात आले आहे. यासाठीची माहिती आणि आकडेवारी, अनेक मंत्रालये , विभाग आणि संस्थांकडून घेण्यात आली. त्याशिवाय, या प्रकाशनात सादर केलेल्या आकडेवारीमागील संकल्पना, व्याख्या, स्रोत आणि इतर पद्धतशास्त्रीय बाबी अधिक स्पष्टपणे समजावून सांगण्यासाठी 50 प्रमुख निर्देशकांसाठीचा मेटाडेटाही समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामुळे स्पष्टता वाढेल आणि माहितीचे अधिक सखोल आकलन होण्यास मदत होईल.

अधिकृत सांख्यिकी आकडेवारीच्या आधारावर केलेल्या या  प्रकाशनाचा उद्देश, अनेकविध संकल्पनांवरील, लिंग वर्गीकृत डेटा सादर करणे हा आहे. यात ग्रामीण-शहरी वर्गीकरण, राज्ये- केंद्रशासित प्रदेश आणि जिथे शक्य असेल तिथे, काळानुसार डेटाही देण्यात आला आहे. यामुळे, लैंगिक विषमतेविषयीची बदलत जाणारी परिस्थिती आणि देशभरातील विकासाचे बदलते स्वरूप याचीही माहिती मिळण्यास मदत होते आहे.

महत्वाच्या सामाजिक- आर्थिक निर्देशकांचे विश्लेषण सादर करून, तसेच नव्याने बदलत असणारे कल स्पष्ट करून, ह्या प्रकाशनाने,  धोरणकर्ते, संशोधक आणि इतर हितसंबंधियांना अत्यंत महत्वाचे पुरावे उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामुळे त्यांना लिंग-आधारित प्रतिसदात्मक धोरणे आणि कार्यक्रमांची आखणी करता येईल, ज्यातून,  सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधता येईल.

“भारतातील महिला आणि पुरुष 2025 : निवडक निदर्शक आणि आकडेवारी” हे प्रकाशन, मंत्रालयाचे संकेतस्थळ, (https://mospi.gov.in/).वर  उपलब्ध आहे.

या प्रकाशनाची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:

1. जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर संपूर्ण भारतात वाढले आहे. यातून, मुलींचा जन्मदर सुधारला असल्याचे दिसत असून, 2017 मध्ये 904 असलेला हा दर 2021 -23 मध्ये 917 पर्यंत पोहोचला आहे.

2. मुलगा-मुलगी अशा दोन्ही अर्भकांच्या, बालमृत्यूदरात 2008 ते 2023 या काळात, अत्यंत लक्षणीय आणि सातत्यपूर्ण घट नोंदवली गेली आहे.  

3. शालेय शिक्षण -अगदी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व पातळ्यांवर, लैंगिक समानता साध्य करण्यात आली आहे. 

4. उच्च शिक्षणातील सकल नोंदणी गुणोत्तर 2021-22 ते 2022-23 या कालावधीत महिलांसाठी 28.5 वरून 30.2 पर्यंत, तर पुरुषांसाठी 28.3 वरून 28.9 पर्यंत सुधारले आहे.

5. 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील पुरुष आणि महिला दोघांसाठीही श्रमशक्ती सहभाग दर (LFPR) मध्ये वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण महिलांमध्ये या दरात सर्वाधिक वाढ नोंदली गेली असून, 2022 ते 2025 या कालावधीत तो 37.5 टक्क्यांवरून 45.9 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

6. 2017 ते 2025 या कालावधीत व्यवस्थापकीय पदांवर कार्यरत पुरुषांची संख्या 73.80 टक्क्यांनी वाढली आहे, तर त्याच कालावधीत व्यवस्थापकीय पदांवर कार्यरत महिलांची संख्या 102.54 टक्क्यांनी वाढली आहे.

हे प्रकाशन, मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, खाली दिलेल्या QR कोडवर क्लिक केल्यासही ते बघता येईल.

 

* * *

शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2256688) अभ्यागत कक्ष : 16