पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई इथे, 594 किमी लांबीच्या प्रवेश-नियंत्रित ग्रीनफील्ड गंगा द्रुतगती मार्गाचे केले उद्घाटन
हा परिवर्तनकारी पायाभूत प्रकल्प संपर्कव्यवस्था मजबूत करेल आणि संपूर्ण उत्तरप्रदेशाच्या विकासाला चालना देईल- पंतप्रधान
जशी गंगामाता हजारो वर्षांपासूनउत्तरप्रदेश आणि देशाची जीवनवाहिनी आहे, त्याचप्रमाणे आधुनिक प्रगतीच्या या काळात, तिच्या जवळून जाणारा हा द्रुतगती मार्ग उत्तरप्रदेशाच्या विकासाची नवी जीवनवाहिनी बनेल: पंतप्रधान
अलीकडेच, मला दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्गाचे राष्ट्रार्पण करण्याचीही संधी मिळाली- पंतप्रधान
हे नवे द्रुतगती मार्ग विकसनशील भारताचे भविष्य घडवणाऱ्या जीवनवाहिन्या ठरतील, असे मी म्हटले होते; आणि हे आधुनिक मार्ग आज भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवे दिशादर्शक ठरत आहेत: पंतप्रधान
गंगा द्रुतगती मार्ग केवळ, उत्तरप्रदेशाच्या दोन टोकांना परस्परांशी जोडत नाही, तर एनसीआर ला जवळ आणून, अपार संधींचे मार्ग खुले करत आहे: पंतप्रधान मोदी
Posted On:
29 APR 2026 5:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील हरदोई इथे 594 किमी लांबीच्या प्रवेश नियंत्रित ग्रीनफिल्ड गंगा द्रुतगती मार्गाचे उद्घाटन केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी, भगवान नरसिंह यांच्या पवित्र भूमीला वंदन करून आणि जवळच वाहणाऱ्या गंगामातेच्या दैवी उपस्थितीचा उल्लेख करून केली. संपूर्ण उत्तरप्रदेश, गंगा नदीच्या आध्यात्मिक आणि पालनपोषण करणाऱ्या कृपेने पवित्र झालेले तीर्थक्षेत्र असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “उत्तर प्रदेशाला लाभलेले द्रुतगती मार्ग स्वतः गंगामातेचे आशीर्वाद आहेत,” असे मोदी म्हणाले. या द्रुतगती मार्गामुळे पवित्र स्थळांपर्यंतचा प्रवास काही तासांत शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
गंगामातेचे शाश्वत स्थान आणि महत्त्व यांच्याशी आधुनिक पायाभूत सुविधांची सांगड घालत, पंतप्रधानांनी या द्रुतगती मार्गाची, राज्याच्या विकास-प्रवासातील परिवर्तनकारी भूमिका स्पष्ट केली. नव्याने उभारण्यात आलेले हे महामार्ग, विकसित होत असलेल्या भारताच्या जीवनवाहिन्या असल्याचे नमूद करत पंतप्रधान म्हणाले, “या आधुनिक जीवनवाहिन्या आज भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा संदेश देत आहेत.” त्यांच्या अलीकडील आध्यात्मिक भेटींवर भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की 24 एप्रिल रोजी बंगाल पासून ते अगदी काल काशी पर्यंत आणि आज पुन्हा एकदा असा गेल्या काही दिवसांमधील त्यांना लाभलेला गंगा मातेचा सहवास, श्रद्धा आणि पायाभूत सुविधा यांचा एक अद्भुत संगम आहे. या द्रुतगती महामार्गाला गंगा मातेचे नाव देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आनंद व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की यातून आपली विकासाची दूरदृष्टी प्रतिबिंबित होते आणि आपल्या वारशाची झलक पहायला मिळते.
पायाभूत सेवासुविधांच्या निर्मितीमधील केंद्र सरकारच्या वेगवान गतीला अधोरेखित करताना पाच वर्षांहून कमी कालावधीत पूर्ण केलेल्या देशातील सर्वात मोठा हरित कॉरिडॉर द्रुतगती महामार्ग अर्थात गंगा द्रुतगती महामार्गाचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले. अत्यंत गतीने आधुनिकीकरणाला कवेत घेण्यासाठीचे आपले विचार मांडताना पंतप्रधान म्हणाले की हा सध्याच्या सरकारचा वेग आहे! हा मार्ग विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीचा आहे! द्रुतगती महामार्गाच्या सामरिक महत्त्वावर अधिक प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी या मार्गाच्या 600किलोमीटरच्या विस्ताराची रूपरेषा मांडली. हा मार्ग पश्चिम उत्तर प्रदेशातील व्यापारी केंद्रांना, मध्य उत्तर प्रदेशातील कृषीप्रधान भागामार्गे पूर्व उत्तर प्रदेशातील सांस्कृतिक स्थळांशी जोडतो आणि त्याचा बारा जिल्ह्यांमधील कोट्यवधी नागरिकांवर थेट परिणाम होतो. गंगा द्रुतगती महामार्ग हा केवळ जलद गती मार्ग नव्हे. तर हा नव्या संधींचा, नव्या स्वप्नांचा आणि नवीन शक्यतांचा मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले.
कृषी समुदायासमोर असलेल्या दीर्घकालीन आव्हानांविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की या सुपीक प्रदेशातील शेतकऱ्यांना अगदी ऐतिहासिक काळापासून दळणवळणाच्या सोयीसुविधांच्या अभावी मोठ्या बाजारपेठांचा आणि शीतगृहांचा लाभ घेता आलेला नाही. या सुधारित दळणवळणीय जोडणीमध्ये असलेली परिवर्तन क्षमता अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. द्रुतगती महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीमुळे मिळणाऱ्या लाभांविषयी ते म्हणाले की हा मार्ग उत्तरप्रदेशच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी जोडत असतानाच त्यावर वाहने धावू लागल्याने त्याच्या कडेला नवीन औद्योगिक संधी निर्माण होतील आणि त्यामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या अफाट शक्यताही अधिक जवळ येतील.
द्रुतगती मार्गालगत निर्माण होत असलेल्या औद्योगिक संधींसंदर्भात पंतप्रधान म्हणाले की भविष्यात औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, हातमाग, चामड्याच्या वस्तू आणि हस्तकला यांसारख्या उत्पादन क्लस्टर्सना आकर्षित करण्यासाठी आणि या भागातील युवकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी हरदोई सारख्या जिल्ह्यांमध्ये औद्योगिक कॉरिडॉर्स धोरणात्मकदृष्ट्या विचार करुन विकसित केले जात आहेत. राज्याच्या युवकांच्या उद्योजकतेच्या भावनेचे कौतुक करत, मुद्रा योजना आणि ओडीओपी (एक जिल्हा एक उत्पादन) सारख्या योजनांमुळे त्यांना मिळालेल्या सक्षमीकरणाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. लघुउद्योग आणि एमएसएमईंना चालना मिळत आहे आणि सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे त्यांच्यासाठी नवे मार्ग खुले होत आहेत, असे ते म्हणाले.
या सर्व गोष्टी मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचतील. यामुळे लाखो कुटुंबांचे उत्पन्न वाढेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उत्तर प्रदेशमधील उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळाची आठवण करून दिली. एकेकाळी मागास आणि बीमारू म्हणून ओळखले जाणारे हे राज्य आज 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या प्रचंड मोठ्या ध्येयासाठी तितकीच प्रचंड सज्जता केली जात आहे. यासाठी उत्तर प्रदेशकडे अपार क्षमता आहे. देशात मोठ्या प्रमाणात असलेल्या युवा लोकसंख्येची क्षमता उत्तर प्रदेशाकडे आहे. लोकसंख्याशास्त्रीय लाभाचा उपयोग करून घेण्याच्या धोरणाची रूपरेषा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मांडली. या क्षमतेचा उपयोग उत्तर प्रदेशला वस्तुनिर्माण केंद्र बनवण्यासाठी केला जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. येथे नवे उद्योग व कारखाने स्थापित केले जातील, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल, आर्थिक प्रगतीला चालना मिळेल आणि युवांसाठी रोजगार संधी निर्माण होतील. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल निर्माता असून यातील अर्ध्याहून अधिक निर्मिती उत्तर प्रदेशात होते, या कामगिरीकडे त्यांनी लक्ष वेधले. ''यात उत्तर प्रदेशने लक्षणीय योगदान दिले आहे," असे ते म्हणाले.
अद्ययावत तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याची उदयोन्मुख भूमिका अधोरेखित करत पंतप्रधानांनी नोएडा येथे पायाभरणी झाल्यानंतर सेमीकंडक्टर क्षेत्रात झालेल्या उत्तर प्रदेशची प्रगती नमूद केली. "भविष्यात उत्तर प्रदेशच्या लोकांसाठी अपार संधी असलेली प्रचंड मोठी क्षेत्रे खुली होत आहेत. "एआय चालित अर्थव्यवस्थांमध्ये अग्रणी होण्यासाठी उत्तर प्रदेशची वाटचाल सुरू आहे," ते म्हणाले.
उत्तर प्रदेशचा औद्योगिक विकास राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे सांगून देशाच्या दोन संरक्षण कॉरिडॉरपैकी एक याच राज्यात कार्यरत असून प्रमुख संरक्षण निर्मात्यांनी येथे आपले परिचालन सुरू केले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्तर प्रदेशमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रणालींचे उत्पादन होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. "आज उत्तर प्रदेशचा औद्योगिक विकास देशासाठी सामरिक शक्ती बनत आहे," असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशच्या दळणवळण पायाभूत सुविधांच्या व्यापक आधुनिकीरणावर भर देत पंतप्रधानांनी विमानतळांच्या वाढत्या संख्येविषयी सांगितले. एकेकाळी किमान विमानतळ असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये 5 आंतरराष्ट्रीय सुविधांसह 21 विमानतळ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नव्याने उद्घाटन झालेला नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ गंगा एक्सप्रेसवे कॉरिडॉरपासून केवळ काही तासांच्या अंतरावर असल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी, उत्तर प्रदेशच्या सध्याच्या स्थितीची आणि भूतकाळातील त्रासदायक स्थितीची तुलना केली. पूर्वी हे राज्य गुन्हेगारी आणि अराजकतेसाठी ओळखले जात होते आणि आज इथली कायदा व सुव्यवस्था अनुकरणीय ठरली आहे. "आता उत्तर प्रदेशच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण देशभरात दिले जाते," असे पंतप्रधानांनी सांगितले.
उत्तर प्रदेशाच्या विकासाला भारताच्या व्यापक सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्वाकांक्षांच्या संदर्भात मांडताना पंतप्रधानांनी सांगितले की, राज्यातील परिवर्तन हे राष्ट्राच्या मूलभूत संकल्पाचे प्रतीक आहे. "आज संपूर्ण देश एकाच संकल्पाने पुढे जात आहे, तो म्हणजे 'विकसित भारता'चा संकल्प! हा संकल्प पूर्ण करण्यात उत्तर प्रदेशाची मोठी भूमिका आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
जागतिक अस्थिरता आणि भारताच्या प्रगतीला विरोध करणाऱ्या बाह्य शक्तींचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी बाह्य आव्हाने असूनही देश विकासाच्या मार्गावर आगेकूच करत असल्याचा पुनरुच्चार केला. "आपण केवळ सुरक्षितच नाही, तर विकासाचे नवे टप्पेही गाठत आहोत. आपण आत्मनिर्भर भारत अभियान पुढे नेत आहोत. आपण सर्वात आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करत आहोत," असे पंतप्रधानांनी सांगितले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी गंगा द्रुतगती मार्गाचा उल्लेख व्यापक विकास प्रतिमानाचे प्रतीक असा केला. उत्तर प्रदेशातील जनता निर्माण होणाऱ्या संधींचे मूर्त समृद्धीमध्ये रूपांतर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "मला विश्वास आहे की उत्तर प्रदेशाचे लोक गंगा द्रुतगती मार्गामुळे निर्माण होणाऱ्या संधीचे त्यांच्या कठोर परिश्रमातून आणि प्रतिभेतून प्रत्यक्षात साकारतील," असे पंतप्रधान म्हणाले.
* * *
शैलेश पाटील/राधिका अघोर/भक्ती सोनटक्के/सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2256668)
अभ्यागत कक्ष : 11