गृह मंत्रालय
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आज कुख्यात अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीयेमधून परत आणण्यात मोठे यश मिळवले
नार्को सिंडिकेटविरोधात शून्य सहनशीलता
फरार सलीम डोलाला करण्यात आलेली अटक, सर्व फरार अमली पदार्थ तस्कर आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा मोदी सरकारचा दृढ निश्चय दर्शवते
आता ते कुठेही लपले तरी, ड्रग माफियांसाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही
अमली पदार्थ विरोधात काम करणाऱ्या आपल्या संस्थांनी एका मजबूत जाळ्याच्या माध्यमातून सीमेपलीकडेही आपली पकड विस्तारली आहे
Posted On:
28 APR 2026 4:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 एप्रिल 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, नार्को सिंडिकेटविरोधात मोदी सरकारच्या शून्य सहिष्णुता धोरणानुसार, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आज कुख्यात अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कियेमधून परत आणण्यात मोठे यश मिळवले आहे.
एक्स प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, “नार्को सिंडिकेटविरोधात शून्य सहिष्णुता . एनसीबीने आज कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद सलीम डोला याला तुर्कीयेमधून परत आणण्यात मोठे यश मिळवले आहे. ड्रग कार्टेल्सना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याच्या मोदी सरकारच्या मोहिमेअंतर्गत, आपल्या अंमली पदार्थ विरोधी यंत्रणांनी जागतिक एजन्सींच्या मजबूत नेटवर्कच्या माध्यमातून सीमेपलिकडेही आपली पकड विस्तारली आहे. आता ते कुठेही लपले तरी, ड्रग माफियांसाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम डोलाला परत आणण्याची यशस्वी कारवाई, सर्व फरार अमली पदार्थ तस्कर आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांना जगभरातून शोधून काढून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा सरकारचा दृढ निर्धार दर्शवते.
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय गुप्तचर संस्थांशी जवळून समन्वय साधत, ‘ऑपरेशन ग्लोबल-हंट’ अंतर्गत तुर्कीयेमधून अमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलीम डोला याची परत आणण्यात यश मिळवले आहे. आज पहाटे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होताच एनसीबीने त्याला ताब्यात घेतले.
सलीम डोला (वय (59, रा. मुंबई), विरुद्ध मार्च 2024 मध्ये भारताच्या विनंतीनुसार इंटरपोल रेड नोटीस जारी करण्यात आली होती. भारतातील अनेक अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी तो हवा होता आणि भारतीय कायदे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांच्या तावडीत सापडत नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये डोलाने मध्य पूर्व, आफ्रिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये अमली पदार्थ तस्करीचे एक मोठे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट स्थापन केले होते. दोन दशकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या डोलाचा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हेरॉईन, चरस, मेफेड्रोन, मँड्रॅक्स आणि मेथाम्फेटामाइनच्या मोठ्या प्रमाणात जप्तीशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये थेट सहभाग होता. भारतातील वितरण नेटवर्कला घाऊक पुरवठा करण्यात डोलाची भूमिका सातत्याने समोर आली आहे. याशिवाय, गुजरात एटीएस आणि मुंबई पोलिसही त्याच्या शोधात होते. यापूर्वी, त्याचा मुलगा ताहिल सलीम डोला आणि इतर साथीदारांना 2025 मध्ये संयुक्त अरब अमिरातीमधून प्रत्यार्पणानंतर मुंबई पोलिसांनी अटक केली होती. हे प्रयत्न तुर्कीयेतील अधिकारी, इंटरपोल आणि भारतीय यंत्रणा यांच्यातील सहकार्य आणि समन्वित कारवाईचे उत्तम उदाहरण आहे.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2256263)
अभ्यागत कक्ष : 16