रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय रेल्वेची शाश्वततेच्या दिशेने वाटचाल, 2025-26 या कालावधीत आपल्या विविध विभागांतर्गत केले 81 लाख 59 हजार इतके वृक्षारोपण

Posted On: 22 APR 2026 11:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 एप्रिल 2026

 

यंदाचा जागतिक पृथ्वी दिन संपूर्ण जगभरात आपली शक्ती, आपली पृथ्वी (Our Power, Our Planet) या संकल्पनेअंतर्गत साजरा केला जात आहे. याला जोडूनच भारतीय रेल्वेनेही आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाप्रती असलेली आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. भारतीय रेल्वे सेवा ही देशाच्या विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण भौगोलिक प्रदेशामध्ये विस्तारलेली असून, या सेवेअंतर्गत दररोज 2 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांना वाहतूक सेवा पुरवली जात आहे. भारतीय रेल्वे ही एका अर्थाने केवळ वाहतुकीचे साधन राहिलेले नसून, ही सेवा भारताला हरित भविष्याच्या दिशने नेण्यासाठी आवश्यक असलेली व्याप्ती, संपर्क आणि इच्छाशक्तीची जोड असलेली एक महत्वाची संस्थात्मक यंत्रणा ठरली आहे.

गेल्या दशकभराच्या काळात भारतीय रेल्वेने आपल्या कामकाज आणि कार्यान्वयनात सुनियोजित बदल घडवून आणले आहेत. याअंतर्गत भारतीय रेल्वेने आपल्या सेवेला पायाभूत सुविधांचे नियोजन, स्थानक व्यवस्थापन, रेल्वे इंजिन आणि डबे (Rolling Stock) आणि जमिनीचा वापरासारख्या महत्वाच्या बाबींना  पर्यावरणीय उत्तरदायित्वाची जोड दिली आहे. त्यामुळेच आज भारतीय रेल्वेने शाश्वत वाहतूक क्षेत्राअंतर्गतचा जगातील सर्वात प्रभावी कारक घटक म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

हरित वृद्धी, सुरक्षित सेवा : भारतीय रेल्वेच्या वृक्षारोपण मोहिमेमुळे रेल्वे मार्गांना मिळू लागला आहे नवा आयाम

भारतीय रेल्वेच्या वतीने रेल्वे सेवेच्या सर्व विभागांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे. पर्यावरणीय शाश्वततेच्या अनुषंगाने देशपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांमधला भारतीय रेल्वेचा हा एक समन्वियत प्रयत्न आहे. 2025-26 या वर्षात भारतीय रेल्वे सेवेच्या सर्व विभागांमध्ये मिळून एकूण 81.59 लाख इतके वृक्षारोपण केले गेले. याअंतर्गत ईशान्य सीमा रेल्वे (9.3 लाख वृक्ष), दक्षिण मध्य रेल्वे (9 लाख वृक्ष), ईशान्य रेल्वे (8.7 लाख वृक्ष) आणि उत्तर रेल्वे (8.5 लाख वृक्ष) या विभागांचे योगदान लक्षणीय राहिले आहे. या उपक्रमाअंतर्गत रेल्वे मार्गिकांलगतची जागा, स्थानक परिसर आणि रेल्वेच्या अखत्यारितील उपलब्ध जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले गेले आहे. यामुळे विविध प्रदेशांमधील हरित क्षेत्रांचे प्रमाणही वाढू लागले आहे. या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे, जैवविविधतेलाही पाठबळ मिळू लागले आहे, त्याचवेळी पर्यावरणीय परिस्थितीतही सुधारणा घडून येऊ लागली आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे  प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक हरित आणि आरोग्यदायी अनुभव देणारा ठरू लागला आहे.

रेल्वेच्या वतीने इतक्या व्यापक प्रमाणावर केल्या गेलेल्या वृक्षारोपणाचे क्षेत्र नैसर्गिकपणे कार्बन शोषून घेणारे क्षेत्र (Carbon sink) म्हणून कामी येऊ लागले आहे. यामुळे हवामान बदलाचा सामना करण्याची क्षमता आणि लवचिकतेलाही बळकटी मिळू लागली आहे. यासोबतच ध्वनी आणि धूळीच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याच्या बाबतीतही हे वृक्षारोपण उपयुक्त ठरू लागले आहे. इतकेच नाही हरित क्षेत्राअंतर्गतचा परिसर वाढू लागल्यामुळे रेल्वे स्थानके आणि रेल्वे मार्गांलगतच्या परिसरामध्ये उत्तम गुणवत्तेच्या हवामानाचे क्षेत्र (Microclimatic) तयार होऊ लागले असून, त्यामुळे प्रवाशांना आल्हाददायी आमि दिलासादायी प्रवासाचा अनुभव येऊ लागला आहे.

यासोबतच रेल्वे मार्गिकांलगत केलेले वृक्षारोपण, या मार्गिकांलगतच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाची भूमिका बजाणारा घटक ठरू लागला आहे. झाडांची मुळे माती धरून ठेवण्यात मदतीची ठरतात, परिणामी जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे विशेषतः डोंगराळ आणि अतिवृष्टीप्रवण भागात दरडी कोसळण्यासारख्या घटनांनाही प्रतिबंध होतो. या हरित आच्छादनामुळे भूपृष्ठभागावरील पाण्याचा प्रवाहावरही नैसर्गिकपणे नियंत्रण राखले जाते, जमिनीची पाणी जिरवण्याची क्षमताही वाढते, आणि यामुळे रेल्वे रुळ अस्थिर अथवा सैल पडण्याचा धोकाही कमी होतो. अशा प्रकारच्या निसर्गाधारीत उपाययोजनेमुळे रेल्वेच्या मालमत्तांचे रक्षण तर होतच आहे, त्यासोबतच प्रवाशांच्यादृष्टीनेही अधिक सुरक्षित आणि आल्हाददायी प्रवासासाची सुनिश्चितीही होऊ लागली आहे.

पाणी : साठवणूक, पुनर्वापर, लेखापरीक्षण आणि संवर्धन

या शतकातली सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे पाण्याची टंचाई. भारतीय रेल्वेसेवेच्या सोयीसुविधा आणि कामकाजाअंतर्गत शेकडो वॉशिंग लाईन्स, देखभालीचे आगार, खानपानाच्या सुविधा आणि प्रवाशांशी सुविधा येतात, आणि त्यासाठी दररोज लाखो लिटर पाण्याचा वापर करावा लागतो. अशावेळी एक जबाबदार संस्थात्मक यंत्रणा म्हणून सर्व विभागांमध्ये पाण्याचा वापर कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे जाणीवेच्या भावनेतून तसेच मूल्यमापन करता येण्याजोगे उपक्रम हाती घेतेले आहेत. यासाठी रेल्वे व्यवस्थापनाच्या वतीने पावसाचे पाणी वाहून जाण्यापूर्वी त्याची साठवणूक करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी पुनर्वापर करणे, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी पाण्याचे लेखापरीक्षण करणे आणि रेल्वेच्या अखत्यारितील दूरावस्थेतले पाण्याचे स्त्रोत पुनरुज्जीवित करणे अशा प्रकारचा एक सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबला आहे.

छतावरून वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवणूक  : पाणी जिथे पडते आहे त्याच ठिकाणी ते अडवून त्याची साठवणूक करणे 

2016 - 17 या वर्षापासून, भारतीय रेल्वेने आपल्या सर्व रेल्वे विभागांमध्ये मिळून एकूण 8,313 इतक्या छतावरून वाहून जाणार्या पावसाच्या पाण्याची साठवणूक करणाऱ्या सुविधा स्थापित केल्या आहेत. याअंतर्गत केवळ गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतच 2,915 इतका नवीन सुविधा बसवल्या गेल्या आहेत. यात 2024-25 या वर्षात जल संचय जन भागीदारी (JSJB) मोहिमेअंतर्गत, नव्या बांधकांच्या ठिकाणी बसवलेल्या 1,215 सुविधांचाही समावेश आहे. यातून आपला स्वतःचा उपक्रम राबवतांना त्याला राष्ट्रीय जलसंधारण मोहिमांशी जोडून घेण्याबाबतचा भारतीय रेल्वेचा सक्रिय समन्वयीत दृष्टीकोनच अधोरेखित होतो. या उपक्रमाअंतर्गत दक्षिण मध्य रेल्वेने सर्वाधिक 3,128 जलसंचयन सुविधा स्थापित करून, या उपक्रमात आघाडी घेतली आहे.

भारतीय रेल्वेच्या वतीने स्थापित केलेली ही पर्जन्य जलसंचयन पायाभूत सुविधा, विशेषतः प्रतिकूल हवामान विषयक परिस्थितीत  दुहेरी उद्देशपूर्तीसाठी कामी येत आहे.  या सुविधेअंतर्गत रेल्वे स्थानके आणि यार्डांमध्ये बसवलेल्या छतावरील जलसंचयन सुविधांद्वारे पावसाचे पाणी संकलित केकरू ते वाहून नेले जाते. यामुळे फलाट आणि फलाटा लगतच्या रुळांवर पाणी साचण्याला प्रतिबंध होतो, तर त्याचवेळी भूगर्भातील पाणीची पातळी वाढवण्यातही मोठी मदत होते. यामुळेच तर राजस्थानमधील पाणी टंचाई असलेल्या भागात, तसेच दख्खनेकडच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशांमध्ये ही सुविधा रेल्वेच्या सुरळीत कार्यान्वयनाच्या दृष्टीने जीवनवाहिनीच ठरू लागली आहे. साठवलेले हे पाणी स्वच्छतागृहे, साफसफाई आणि बागकाम यांसारख्या स्थानकपरिसरातील विविध कामे आणि सुविधांसाठी वापरात आणले जाते. यामुळे टँकरद्वारे पाणी आणावे लागण्यावरचे तसेच महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यावरचे अवलंबित्वही कमी होऊ लागले आहे. महत्वाचे म्हणजे या सुविधांचा अनेक दुर्गम भागात अभाव असल्याने या सुविधा उपयुक्त ठरू लागल्या आहेत.

जल पुनर्वापर प्रकल्प (WRP)

भारतीय रेल्वेने आपल्या सर्व विभागांअंतर्गत एकूण 185 जल पुनर्वापर प्रकल्प स्थापित करून ते प्रत्यक्षात कार्यान्वित केले आहेत. 2015-16 या वर्षापूर्वी असे केवळ 21 प्रकल्पच अस्तित्वात होते. तिथून सुरु झालेला हा प्रवास सातत्याने पुढेच गेला आहे. त्याच अनुषंगाने गेल्या आर्थिक वर्षात असे सर्वाधिक 26 नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या बाबतीत उत्तर रेल्वे (27 प्रकल्प) विभागाने सर्व विभागांवर आघाडी मिळवली असून, त्यापाठोपाठ मध्य रेल्वे (21) आणि दक्षिण रेल्वेचा (20) क्रमांक लागतो. या प्रकल्पाअंतर्गत रेल्वे डब्यांची साफसफाई आणि यार्डच्या कामकाजातून निघालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते, आणि मग शुद्ध केलेले हे पाणी स्थानकाची साफसफाई, बागकाम आणि औद्योगिक प्रक्रियांसारख्या पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कामांसाठी वापरले जाते. स्वाभाविकपणे यामुळे आधीच कमरतेच्या गर्तेत सापडलेल्या जलस्रोतांवरचा  तसेच महानगरपालिकेद्वारा केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावरचा भारही कमी होण्यास मदत होते.

2019 मध्ये चेन्नईत तीव्र पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. स्वाभाविकपणे लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या रेल्वे स्थानकांनाही पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागले होते. अशा संकटाच्या काळात रेल्वेच बेसिन ब्रिज आणि एगमोर इथले दक्षिण रेल्वेचे जलपुनर्वापर  प्रकल्प महत्त्वाचे ठरले. या प्रकल्पांमुळे एकीकडे पाण्याचा नागरी पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाही डब्यांची साफसफाई आणि फलाटांची स्वच्छता कायम राखणे शक्य झाले. या घटनेने दिलेली शिकवण म्हणजे, जल पुनर्वापर  प्रकल्प ही केवळ पर्यावरणविषयक उपाययोजना नाही, तर ती कार्यान्वयीन लवचिकता निर्माण करणारी एक महत्वाची पायाभूत सुविधा आहेत.

जल लेखापरीक्षण (Water Audits)

2015-16 या वर्षापासून भारतीय रेल्वेने आपल्या सर्व रेल्वे विभागांमध्ये एकूण 1,944 जल लेखापरीक्षणे पूर्म केली आहेत. केवळ 2025-26 या एका वर्षाच्या कालावधीतच आतापर्यंत 310 लेखापरीक्षणे केली गेली आहेत. ही आजवरची कोणत्याही एका वर्षात केलेली सर्वाधिक लेखापरीणे ठरली आहेत. याबाबतीत दक्षिण मध्य रेल्वे 442 लेखापरीक्षणांसह आघाडीवर असून, त्यानंतर उत्तर रेल्वे (323) आणि पश्चिम रेल्वेचा (216) क्रमांक लागतो. ही लेखापरीक्षणे म्हणजे पाण्याचा अतिवापर होणारी ठिकाणे, जल वाहिन्यांमधील गळती आणि यंत्रणेतील उणिवा ओळण्यात मदतीची ठरतात. यामुळे जलसंवर्धन आणि वापराबाबतची जागरुकता निर्माण होण्यासोबतच लक्ष्यित उपाययोजनाही करता येणे शक्य झाले आहे. याअंतर्गत मूल्यमापनाबद्दलचा शिस्तबद्धपणा हा अर्थपूर्ण जलसंवर्धनाचा पाया ठरू लागला आहे.

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन: निसर्गाला परतफेड

अंतर्गत कामकाजाच्या पलीकडे जाऊन, भारतीय रेल्वेने रेल्वे जमिनीच्या आत किंवा लगत असलेले 109 जलाशय पुनरुज्जीवित केले आहेत. यामध्ये तलाव, कुंड आणि पाणथळ (wetlands) जागांचा समावेश आहे, जे पूर्वी वापराविना पडून होते, ज्यावर अतिक्रमणे झाली होती किंवा ज्यांची दुरवस्था झाली होती. या मोहिमेत दक्षिण मध्य रेल्वे (34), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (44) आणि पश्चिम रेल्वे (11) यांचं महत्वाचं योगदान आहे. पुनरुज्जीवित केलेले हे जलाशय स्थानिक भूजल पातळी वाढवतात (recharge local aquifers), जैवविविधतेसाठी अधिवास निर्माण करतात आणि पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मदत करतात. याचा फायदा रेल्वेच्या हद्दीबाहेर राहणाऱ्या आसपासच्या समुदायांना मोठ्या प्रमाणात होतो. जलाशयांच्या या पुनरुज्जीवनामुळे रिकाम्या पडलेल्या किंवा खराब झालेल्या जमिनीचे रूपांतर 'पर्यावरणीय मालमत्तेत' झाले आहे. हे जलाशय नैसर्गिक पर्जन्य जल रोधक म्हणून काम करतात, ज्यामुळे शेजारील वस्त्या पूर आणि दुष्काळ अशा दोन्ही परिस्थितींना तोंड देण्यासाठी अधिक सक्षम बनतात.

भारतातील पहिला 'वॉटर-न्यूट्रल' रेल्वे डेपो

अहमदाबादमधील पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या कांकरिया कोचिंग डेपोने एक अशी कामगिरी केली आहे, ज्याचा दावा भारतातील फार कमी औद्योगिक संस्था करू शकतात: कांकरिया कोचिंग डेपोने पूर्णपणे 'वॉटर न्युट्रॅलिटी' साध्य केली आहे. हा डेपो कोच धुताना आणि त्यांच्या देखभालीदरम्यान निर्माण होणाऱ्या जवळपास सर्वच सांडपाण्यावर प्रक्रिया करतो आणि त्याचा पुनर्वापर करतो, ज्यामुळे बाह्य गोड्या पाण्याच्या स्रोतांवरील अवलंबित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे.

एक निर्णायक पाऊल: मिशन इलेक्ट्रिफिकेशन (विद्युतीकरण मोहीम)

जर एखाद्या प्रक्रियेने भारतीय रेल्वेच्या पर्यावरणीय स्वरूपात मूलभूत बदल घडवून आणला असेल, तर ती म्हणजे ब्रॉडगेज नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात केलेले विद्युतीकरण होय. भारतीय रेल्वेने आपल्या ब्रॉडगेज नेटवर्कचे 99.6 % विद्युतीकरण पूर्ण केले आहे, हे परिवर्तन गेल्या दशकात 'मिशन मोड' मध्ये साध्य करण्यात आले आहे. मार्च 2026 पर्यंत, 69,873 मार्ग किलोमीटर क्षेत्राचे विद्युतीकरण झाले आहे, जे 2014 मधील केवळ 21,801 मार्ग किलोमीटरच्या तुलनेत एक मोठी झेप आहे. आता सर्व नवीन मार्ग आणि बहुमार्गिका प्रकल्प विद्युतीकरणासह बांधले जात आहेत.

2016-17 च्या तुलनेत भारतीय रेल्वेने 2024-25 मध्ये 178 कोटी लिटर डिझेलची बचत केली आहे, जी 62 % इतकी आहे; ज्यामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी झाले आहे. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, आयात केलेल्या कच्च्या तेलावरील देशाचे अवलंबित्व देखील यामुळे कमी झाले. डिझेलकडून देशांतर्गत उत्पादित वीजेकडे मार्गक्रमण करताना नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा वाटा वाढत आहे. त्यामुळे रेल्वेने स्वतःला जागतिक तेल बाजारातील चढ-उतारांपासून प्रभावीपणे वेगळे केले आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्शन (विद्युत ओढशक्ती) हे बायोडीझेलसारख्या पर्यायांपेक्षा कितीतरी अधिक किफायतशीर आणि पर्यावरणास अनुकूल असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे हा केवळ पर्यावरणापूरकच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही जबाबदार निर्णय ठरला आहे

बायो-टॉयलेट्स: रेल्वे मार्गावरील पर्यावरणपूरक स्वच्छता व्यवस्था

भारतीय रेल्वेने मोठ्या प्रमाणावर बायो-टॉयलेट्स बसवून पर्यावरणीय शाश्वतता आणि प्रवाशांच्या स्वच्छतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 2014 पासून प्रवासी डब्यांमध्ये 3.66 लाखांहून अधिक बायो-टॉयलेट्स बसवण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे रेल्वे रुळांवर मानवी विष्ठेचा थेट निचरा होणे प्रभावीपणे थांबले आहे, ज्यामुळे स्थानके अधिक स्वच्छ झाली, गाड्यांमधील स्वच्छता सुधारली आणि लाखो प्रवाशांना अधिक आरोग्यदायी प्रवासाचा अनुभव मिळत आहे. बायो-टॉयलेट प्रणालीमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जे सूक्ष्मजीव प्रक्रियेवर आधारित आहे. हे तंत्रज्ञान मानवी विष्ठेचे पाणी आणि वायूंमध्ये विघटन करते, ज्यामुळे दुर्गंधी आणि पर्यावरणीय प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होते आणि स्वच्छता राखली जाते. माती आणि रुळांचे प्रदूषण रोखून, रेल्वे मालमत्तेची गंजण्याची  प्रक्रिया कमी करून आणि पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापनाला चालना देऊन हा उपक्रम पर्यावरणाचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. थेट उत्सर्जन शून्यावर आणण्याचे सुनिश्चित करून आणि शाश्वत स्वच्छता पद्धतींना पाठबळ देऊन, भारतीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर करत आहे आणि त्याच वेळी स्वच्छ परिसंस्था व हरित भविष्यासाठी योगदान देत आहे.

नवीकरणीय ऊर्जा: भविष्यात सूर्य आणि वाऱ्यापासून ऊर्जानिर्मिती

भारतीय रेल्वेने नूतनीकरणक्षम ऊर्जेला आपल्या दीर्घकालीन परिचालन धोरणाचा आधारस्तंभ बनवले आहे. डिसेंबर 2025 पर्यंत, संपूर्ण रेल्वे नेटवर्कमध्ये अंदाजे 909 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प आणि 103 मेगावॅट क्षमतेचे पवन ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन, रेल्वेने राजस्थान, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील विकासकांसोबत सौर, पवन आणि संकरित 'राऊंड-द-क्लॉक'  व्यवस्था अंतर्भूत असलेल्या अतिरिक्त 3,300 मेगावॅट नूतनीकरणक्षम क्षमतेचा करार केला आहे. यामुळे दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेला पाठबळ देण्यासाठी स्वच्छ ऊर्जेचा निरंतर पुरवठा सुनिश्चित होणार आहे. हे दीर्घकालीन आणि किमतीत स्थिरता असलेल्या 'हरित खरेदी'च्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.

एलईडी प्रकाशयोजना: कार्यक्षमतेने उजळलेले जाळे

भारतीय रेल्वेने आपली कार्यालये, रेल्वे स्थानके, सेवा इमारती आणि निवासी वसाहतींमध्ये 100 % एलईडी प्रकाशयोजना साध्य केली आहे. देशातील दुर्गम वाटेवरील स्थानकांपासून ते सर्वात मोठ्या जंक्शनपर्यंत हजारो ठिकाणांवर एलईडी लाईटचे हे नेटवर्क पसरले आहे. पारंपारिक प्रकाशयोजनेकडून एलईडीकडे वळल्यामुळे दोन प्रकारचे फायदे झाले आहेत: एक म्हणजे विजेच्या वापरात लक्षणीय घट आणि दुसरे, प्रकाश गुणवत्तेत झालेली सुधारणा. प्रवाशांसाठी याचा अर्थ अधिक चांगल्या प्रकारे प्रकाशमान प्रतीक्षा कक्ष, प्लॅटफॉर्म आणि भुयारी मार्ग असा आहे. तर पर्यावरणासाठी याचा अर्थ, एखादे स्थानक 24 तास सुरू ठेवताना निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनात मोजता येईल इतकी घट, असा आहे.

ऊर्जा संवर्धन: राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ओळख

ऊर्जा कार्यक्षमतेबाबतची भारतीय रेल्वेची वचनबद्धता केवळ वैयक्तिक उपायांपुरती मर्यादित नसून, ती तिच्या कामकाजात रुजलेल्या संवर्धनाच्या प्रणालीगत संस्कृतीपर्यंत विस्तारलेली आहे. BEE 5-स्टार मानांकित उपकरणे, BLDC पंखे, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्हस् आणि ऊर्जा-कार्यक्षम मोटर्स व पंपांच्या खरेदीमुळे रेल्वे इमारती, डेपो आणि यार्ड्सची ऊर्जा तीव्रता सातत्याने कमी झाली आहे. या वचनबद्धतेला सर्वोच्च स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली आहे. भारतीय रेल्वेने 2025 मध्ये 3 श्रेणींमध्ये एकूण 7 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार पटकावले आहेत. हे पुरस्कार केवळ प्रतीकात्मक नाहीत; ते भारताच्या व्यापक ऊर्जा कार्यक्षमता क्षेत्रात रेल्वेला एक मानक संस्था म्हणून अधोरेखित करतात, आणि असे निकष प्रस्थापित करतात ज्यांच्या आधारावर आता इतर मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचे मूल्यमापन केले जात आहे.

निष्कर्ष

भारतीय रेल्वे, ही एक अशी संस्था आहे जी भारताच्या कोनाकोपऱ्यात जाते आणि प्रत्येक वर्गाची सेवा करते; त्यामुळे नेतृत्व करण्याची शक्ती आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी ही संस्था हाताळते. विद्युतीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण, स्वच्छता आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांत साध्य केलेली प्रगती हाच या संस्थेच्या प्रगतीचा पाया आहे. लावलेले प्रत्येक झाड, साठवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, सूर्यापासून निर्माण केलेली वीज, आणि वॉटर न्यूट्रल बनवलेला प्रत्येक डेपो हा हे प्रगतीच्या मार्गावरील प्रत्येक पाऊल आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/वैभवी जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255234) अभ्यागत कक्ष : 9