इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या पहिल्या आधुनिक थ्रीडी सेमीकंडक्टर पॅकेजिंग प्रकल्पाचे ओदिशात भूमीपूजन. कृत्रिम बुद्धिमत्ता, फाईव्ह जी आणि संरक्षण तंत्रज्ञानाला मिळणार चालना
पंतप्रधान मोदी यांच्या भारताला सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनवण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पासाठी ओदिशा सज्ज - मुख्यमंत्री मोहन चरण मांझी
ओदिशा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि आयटी तसेच सेमीकंडक्टर निर्मितीचे केंद्र होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव.
Posted On:
19 APR 2026 5:02PM by PIB Mumbai
भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी आणि ओदिशा भविष्यासाठी तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयाला येण्याच्या दृष्टीने आज भुवनेश्वर येथील इन्फो व्हॅली मध्ये देशातील पहिल्या प्रगत थ्रीडी चिप पॅकेजिंग युनिटचे भूमीपूजन करण्यात आले. हा प्रकल्प भारताची देशांतर्गत सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेने, तसेच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भारत ची संकल्पना पुढे नेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.



थ्रीडी ग्लास सोल्युशन्स द्वारे हाती घेण्यात आलेल्या विविध भागांची एकत्रित बांधणी करणाऱ्या या प्रकल्पाची कोनशिला आज ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, केंद्रीय रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान, तसेच माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बसवण्यात आली. या प्रकल्पामुळे ओदिशा हे जगातील सर्वात प्रगत चिप पॅकेजिंग' तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याच्या दिशेने सज्ज झाले आहे.

या कार्यक्रमात बोलताना, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी हा प्रकल्प ओदिशा आणि राष्ट्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भारतात प्रथमच एक प्रगत थ्रीडी ग्लास सोल्युशन्स सेमीकंडक्टर प्रकल्प उभारला जात आहे, याचा राज्याला प्रचंड अभिमान वाटतो. इंटेल, लॉकहीड मार्टिन आणि अप्लाइड मटेरियल्स यांसारख्या जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्या अत्याधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत आणि ओदिशामधील त्यांचे स्वारस्य राज्याच्या वाढत्या औद्योगिक सामर्थ्याचे द्योतक आहे.
राज्यात उत्पादित होणारी उत्पादने कृत्रिम बुद्धिमत्ता, उच्च-कार्यक्षमता कम्प्युटिंग, संरक्षण क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि प्रगत डिजिटल प्रणाली यांसारख्या भावी पिढीतील क्षेत्रांना पूरक ठरतील, असेही ते म्हणाले. सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेची पूर्तता करण्यात, ओदिशा एक महत्त्वाची भूमिका बजावण्यास सज्ज आहे.

मांझी पुढे म्हणाले की, या प्रकल्पात संबंधित कंपनी सुमारे 2000 कोटींची गुंतवणूक करत असून यात प्रतिवर्षी काचेचे 70,000 पॅनेल्स, 50 दशलक्ष (5 कोटी) असेंब्ल्ड युनिट्स आणि सुमारे 13,000 प्रगत थ्री डीएचआय मॉड्यूल्सचे उत्पादन अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे देशातील पहिले कंपाउंड सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट आणि पहिली थ्रीडी ग्लास सबस्ट्रेट पॅकेजिंग सुविधा अशा दोन्ही सुविधा ओदिशात उभारल्या जात असून अशा सुविधा उभारणारे ओदिशा हे एकमेव राज्य म्हणून पुढे आलेले आहे. ते पुढे म्हणाले की, ओदिशामध्ये विस्तारणारी सेमीकंडक्टर परिसंस्था अभियांत्रिकी पदवीधर, पदविकाधारक आणि आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. ज्यामुळे राज्याचे साधनसंपत्ती आधारित अर्थव्यवस्थेतून तंत्रज्ञान-आधारित विकास केंद्रामध्ये रूपांतर होण्यास मदत होईल.
उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबद्दल ओदिशाच्या जनतेचे अभिनंदन केले आणि राज्य सरकारने दिलेल्या सहकार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली भारताचे सेमीकंडक्टर क्षेत्र वेगाने प्रगती करत असून ओदिशा यातील महत्त्वाचे योगदान देणारे राज्य म्हणून पुढे येत आहे.
वैष्णव म्हणाले की, पारंपारिकपणे खनिजे, धातू आणि ऊर्जा या क्षेत्रांमधील आपल्या सामर्थ्यासाठी ओळखले जाणारे ओदिशा राज्य, आता इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आयटी आणि सेमीकंडक्टर्स यांसारख्या प्रगत क्षेत्रांमध्येही आपले स्थान सातत्याने मजबूत करत आहे. हा प्रकल्प या प्रकारचा सर्वात आधुनिक प्रकल्प आहे. यामुळे भारताची सेमीकंडक्टर मूल्य साखळी लक्षणीयरीत्या बळकट होईल.
***
शैलेश पाटील/राजेश शिरभाटे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2253598)
अभ्यागत कक्ष : 14