भारतीय निवडणूक आयोग
सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026
मतदानाच्या दिवशी वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना प्राधिकार पत्रे जारी करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे
Posted On:
18 APR 2026 6:07PM by PIB Mumbai
1. भारतीय निवडणूक आयोगाने पुन्हा स्पष्ट केले आहे की निवडणूक प्रक्रियेचे वार्तांकन करण्यासाठी मतदान केंद्रांमध्ये माध्यम प्रतिनिधींचा प्रवेश 'निवडणूक संचालन अधिनियम, 1961' च्या नियम 32 च्या तरतुदींनुसार मतदान केंद्राच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून काटेकोरपणे नियंत्रित केला जाईल.
2. त्यानुसार, प्रत्येक सार्वत्रिक, पोटनिवडणूक किंवा द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर, नामनिर्दिष्ट प्रायोजक प्राधिकरणांना माध्यम प्रतिनिधींकडून प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या प्राधिकरण पत्रांसाठी अर्ज गोळा करून पुढे पाठवण्याच्या सूचना दिल्या जातात. या प्रायोजक प्राधिकरणांमध्ये पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), तसेच राज्य माहिती आणि जनसंपर्क संचालनालयांमार्फत मुख्य निवडणूक अधिकारी यांचा समावेश आहे.
3. पीआयबी कडून मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधींच्या बाबतीत, प्राधिकरण पत्रे पीआयबी कडे दिली जातात आणि पीआयबी स्वतःच्या स्तरावर त्यांची छाननी करून ती जारी करते. त्यानंतर, मंजूर केलेल्या माध्यम प्रतिनिधींची यादी पीआयबी निवडणूक आयोगाकडे सादर करते, त्यामुळे प्रक्रियेतली पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाते.
4. राज्य माहिती आणि जनसंपर्क संचालनालयांमार्फत अर्ज करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या बाबतीत, अर्जांची प्राथमिक छाननी राज्य माहिती आणि जनसंपर्क संचालनालयांकडून केली जाते आणि त्यानंतर त्या शिफारशी संबंधित मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातात. यादीची योग्य छाननी करण्यात आली आहे, अर्जदार खरे माध्यम प्रतिनिधी आहेत आणि ते निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र आहेत, असे, राज्य माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रमाणित करतात.
5. त्यानंतर शिफारस केलेल्या माध्यम प्रतिनिधींची एकत्रित यादी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवली जाते. मुख्य निवडणूक अधिकारी/जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा अधिकृत अधिकाऱ्यांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्यानंतरच प्राधिकरण पत्र जारी केले जाते. या प्रक्रियेत प्रामाणिकता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रतिकृती किंवा रबर स्टॅम्प वापरायला आयोगाने मनाई केली आहे.
6. प्राधिकार पत्रांच्या कोणत्याही प्रकारच्या गैरवापराला सक्त मनाई आहे. मतदानाची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी मतदान कक्षामध्ये छायाचित्रण किंवा व्हिडिओ चित्रण करायला सक्त मनाई करण्यात आली आहे.
7. ही संरचित आणि बहुस्तरीय छाननी प्रक्रिया केवळ पडताळणी झालेल्या आणि अधिकृत माध्यम प्रतिनिधींनाच मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रांमध्ये प्रवेश देण्यासाठी आहे, असे आयोगाने अधोरेखित केले आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेची शुचिता, सुरक्षितता आणि शिस्तबद्धता कायम राहील.
8. मतदानाच्या दिवशी वार्तांकनासाठी अधिकृत केलेले माध्यम प्रतिनिधी ‘अत्यावश्यक सेवा’ श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत आणि त्यांना टपाल मतदान केंद्रामार्फत टपाल मतदानाची सुविधा देण्यात आली आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
***
माधुरी पांगे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2253404)
अभ्यागत कक्ष : 16