कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य: शिवराजसिंह चौहान


फसवणुकीबाबत शून्य सहिष्णुता: निकृष्ट दर्जाची बियाणी प्रकरणी शिवराज सिंह चौहान यांचे कारवाईचे आदेश, एफआयआर दाखल

Posted On: 17 APR 2026 4:05PM by PIB Mumbai

 

मध्य प्रदेशातील धार आणि खारगाव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आणि कारल्याच्या लागवडीसाठी निकृष्ट दर्जाची बियाणी आणि रोपे वापरल्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची त्यांना माहिती दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौहान यांनी, हा शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर थेट हल्ला असल्याचे सांगत, बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना संबंधित कंपनीविरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मंत्र्यांच्या निर्देशानुसार, त्वरित प्रशासकीय कारवाई सुरु करण्यात आली.

शेतकऱ्यांप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, शेतकऱ्यांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे शिवराज सिंह चौहान म्हणाले. निकृष्ट दर्जाचे कारल्याचे बियाणे आणि रोपांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याबाबत धार आणि खारगाव येथील शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठीची प्रक्रिया जलद गतीने करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. या प्रकरणात दोषी आढळलेल्या कंपनी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

नवी दिल्लीत या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर चौहान म्हणाले की, हा मुद्दा केवळ पीक नुकसानीचा नाही, तर शेतकऱ्यांचा विश्वास, मेहनत आणि गुंतवणूकीला बाधा पोहोचवणारा आहे.

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, निष्काळजीपणा किंवा फसवणूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असा संदेश शिवराज सिंह चौहान यांनी दिला.

चौहान यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण, निकृष्ट दर्जाची आणि बनावट बियाणी आणि कृषी-साधने या विरोधात कठोर कारवाई करण्यावर आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यावर सातत्याने भर दिला आहे. बियाणे आणि कृषी-साधने याच्या गुणवत्तेशी तडजोड करून, पर्यायाने शेतकऱ्यांची मेहनत, पीक आणि भविष्य धोक्यात आणणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, हे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.

***

निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2253115) अभ्यागत कक्ष : 11