आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना स्वयंचलित निर्णय प्रक्रिया हॅकाथॉन 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून नवोन्मेषकांना आवाहन
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना स्वयंचलित निर्णय प्रक्रिया हॅकाथॉन विद्यमान प्रणालींशी सुसंगत असणारी नाविन्यपूर्ण डिजिटल उपाययोजनांचा शोध घेत असून, मानवी हस्तक्षेप कमी करणे, दाव्यांच्या निपटारा वेगवान करणे आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम कार्यप्रणाली तयार करण्याचे उद्दिष्ट
हॅकाथॉनसाठी आतापर्यंत 2,600 पेक्षा जास्त स्पर्धकांची नोंदणी; नोंदणीची अंतिम तारीख 13 एप्रिल, मास्टरक्लास मालिकेला 13 एप्रिलपासून सुरुवात
Posted On:
13 APR 2026 1:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 एप्रिल 2026
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेली 'आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' ही देशातील आरोग्य विमा क्षेत्रातील एक पथदर्शी योजना आहे. ही योजना भारतातील डिजिटल आरोग्य परिवर्तनाला गती देत असून, याद्वारे 1,900 पेक्षा अधिक उपचार पॅकेजसाठी दररोज सुमारे 50,000 दाव्यांवर प्रक्रिया केली जाते. या मोठ्या प्रमाणावरील कामासाठी दाव्यांच्या मंजुरीमध्ये वेग, अचूकता आणि नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या 15-20 टक्के दावे स्वयंचलित पद्धतीने निकाली काढले जात असले तरी, सर्व पॅकेजेससाठी लागू होईल, अशा सक्षम प्रणालीची मोठी गरज आहे.
दाव्यांची वाढती संख्या आणि त्यातील गुंतागुंत लक्षात घेता, विविध उपचार आणि कागदपत्रांचे स्वरूप हाताळू शकणाऱ्या प्रगत स्वयंचलित निर्णय प्रणालीची आवश्यकता आहे. स्वयंचलन, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधारित फसवणूक ओळखणारी यंत्रणा, कागदपत्रांचे प्रमाणीकरण आणि प्रत्यक्ष वेळ पडताळणीचा वापर केल्यास दावा प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल होऊ शकतो, यामुळे जलद, सुसंगत आणि पारदर्शक निकाल मिळण्यास मदत होईल.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना स्वयंचलित निर्णय प्रक्रिया हॅकाथॉनचे उद्दिष्ट अशा नाविन्यपूर्ण डिजिटल उपाययोजनांना प्रोत्साहन देणे आहे, ज्या विद्यमान पायाभूत सुविधांशी सहज जोडल्या जातील. यामुळे मानवी श्रम कमी होतील, प्रक्रिया जलद होईल आणि संपूर्ण व्यवस्थेसाठी भविष्यातील गरजा लक्षात घेऊन एक सक्षम आराखडा तयार होईल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाला या हॅकाथॉनसाठी देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत 2,600 पेक्षा जास्त स्पर्धकांनी आपली नोंदणी केली आहे.
नोंदणीची अंतिम तारीख: 13 एप्रिल 2026
या स्पर्धेसाठी इच्छूक असलेले विद्यार्थी, संशोधक, विकासक, व्यावसायिक, स्टार्टअप्स आणि नाविन्यपूर्ण संशोधन करणारे नागरिक 13 एप्रिल 2026 पर्यंत अधिकृत पोर्टलवर नोंदणी करू शकतात: https://nha.gov.in/hackathon

तीन सत्रांची मास्टरक्लास मालिका 13 एप्रिल 2026 पासून सुरू
स्पर्धकांना या आव्हानांमधील तांत्रिक बाबी समजून घेता याव्यात आणि उपायांचे मार्ग शोधता यावेत यासाठी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण 13 एप्रिल 2026 पासून एक विशेष तीन-भागांची मास्टरक्लास मालिका आयोजित करणार आहे. ही सत्रे दाव्यांच्या मंजुरीची कार्यप्रणाली, हॅकाथॉनकडून असलेल्या मुख्य अपेक्षा आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संधींबाबत बहुमोल माहिती देतील.
मास्टरक्लास मालिकेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
सत्र 1: 13 एप्रिल 2026 | दुपारी 2:00 ते 4:00
सत्र 2: 15 एप्रिल 2026 | दुपारी 2:00 ते 4:00
सत्र 3: 16 एप्रिल 2026 | दुपारी 2:00 ते 4:00
ही सर्व सत्रे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर (@AyushmanNHA) थेट प्रसारित केली जातील.

भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू येथे रंगणार महाअंतिम फेरी
या हॅकाथॉनचा समारोप 8-9 मे 2026 रोजी बंगळुरू येथील प्रतिष्ठित भारतीय विज्ञान संस्था येथे दोन दिवसांच्या 'ऑफलाईन' महाअंतिम फेरीने होईल. याठिकाणी निवडलेले संघ आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या ज्युरींसमोर आपले उपाय सादर करतील. विजेत्या संघांना प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी अनुक्रमे 5 लाख, 3 लाख आणि 2 लाख अशी आकर्षक रोख बक्षिसे दिली जातील. तसेच त्यांना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणासोबत काम करण्याची संधी देखील मिळू शकते.
डिजिटल आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण भविष्याकडे वाटचाल
या हॅकाथॉनच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि पारदर्शकता बळकट करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवत आहे. लाभार्थी आणि आरोग्य सेवा देणारे या दोघांसाठीही आरोग्य सेवा वितरण प्रणाली सुधारण्यासाठी आणि भविष्य सज्ज डिजिटल आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
अधिक माहिती आणि नोंदणीसाठी येथे भेट द्या: https://nha.gov.in/hackathon
* * *
नितीन फुल्लुके/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251483)
अभ्यागत कक्ष : 20