पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमधील गांधीनगर येथील सम्राट सम्प्रती संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 31 MAR 2026 2:06PM by PIB Mumbai

जय जिनेंद्र !

जय जिनेंद्र ! !

आचार्य भगवंतश्री पद्मसागर सूरीश्‍वर जी, महाराज साहेब, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, राज्याचे उप-मुख्‍यमंत्री हर्ष संघवी, परमपूज्य आचार्य भगवंत, पूज्य साधु भगवंत, साध्‍वीजी भगवंत, या पवित्र कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आचार्यगण आणि मुनी भगवंत दानवीर विद्वान, महिला आणि सज्जन हो,  

आज, भगवान महावीर जयंतीच्या शुभप्रसंगी, मला या पवित्र जैन तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे सद्भाग्य लाभले आहे. सर्वप्रथम, मी भगवान महावीरांच्या चरणी नतमस्तक होतो. कोबातीर्थाहून, मी माझ्या सर्व देशबांधवांना भगवान महावीर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. 

मित्रांनो,

आज, मी परमपूज्य आचार्य श्री कैलास सागर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या स्मृतीसही वंदन करतो. त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामुळे, त्यांच्या दूरदृष्टीमुळे  कोबाच्या या भूमीवर ज्ञान आणि भक्तीचे हे महान केंद्र स्थापित झाले.  कोबातीर्थ हे  स्थान आध्यात्मिक शांतीने भारलेले आहे. अशा अलौकिक ऊर्जेने युक्त असलेले, अनेक जैन साधू आणि संतांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या  ठिकाणी, सर्जनशीलता आणि सेवा नैसर्गिकरित्या बहरतात आणि वाढतात. कोबातीर्थामध्‍ये  अभ्यास, साधना  आणि संयमाची अखंड परंपरा कशी टिकून आहे, हे मी वर्षानुवर्षे पाहिले आहे. इथे मूल्यांचे जतन केले जाते, संस्कार दृढ केले जातात आणि ज्ञानाचे संगोपन केले जाते. ही त्रिवेणी भारतीय संस्कृतीचा पाया आहे. ही त्रिवेणी अखंड, निरंतर चालू ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.

मित्रांनो,

मला अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या संतांनी हजारो वर्षांचा भारतीय वारसा, जैन धर्माचे कालातीत ज्ञान, आपला वारसा आणि त्यातून मिळणारी प्रेरणा यांना अमर करण्यासाठी, तसेच ते पुढील पिढीपर्यंत एका नवीन आणि आधुनिक स्वरूपात पोहोचवण्यासाठी या जैन वारसा संग्रहालयाची संकल्पना मांडली. आज, ती संकल्पना इतक्या भव्य स्वरूपामध्‍ये साकार होत आहे. हे सम्राट संप्रती संग्रहालय, जैन तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि आपल्या प्राचीन वारशाचे एक पवित्र केंद्र बनले आहे. या अद्वितीय प्रयत्नाबद्दल मी आपल्या सर्व जैन साधू आणि संतांचे अभिनंदन करतो. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच, या कार्यात प्रचंड योगदान देणाऱ्या हजारो समर्पित लोकांचेही मी कौतुक करतो.

बंधू आणि भगिनींनो,

ज्यावेळी आपण नवनवीन कल्पना आणतो आणि कालातीत ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनिर्मिती करतो, त्यावेळी  आपला वारसा समृद्ध होतो आणि भविष्याला अर्थात येणा-या काळालाही प्रेरणा मिळते. सम्राट संप्रती संग्रहालय हा भारतातील कोट्यवधी लोकांचा वारसा आहे, भारताच्या गौरवशाली भूतकाळाचा एक महान ठेवा आहे. याबद्दल मी माझ्या सर्व देशबांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो, 

सम्राट संप्रती हे केवळ एका ऐतिहासिक राजाचे नाव नाही. सम्राट संप्रती हा भारताचे तत्त्वज्ञान आणि आचरण यांना जोडणारा एक सेतू  आहे. ज्यावेळी  आपण इतिहासात डोकावतो, त्यावेळी  आपल्याला दिसून येते  की, जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये महान विचारवंत आणि तत्त्वज्ञ जन्माला आले, होवून गेले.  मानवतेचा  आदर्श कसा असतो, याच्याचही  वेगवेगळ्या व्याख्या  मांडल्या  गेल्या. परंतु , ज्यावेळी  सत्ता आणि अधिकाराचा प्रश्न निर्माण झाला,  त्यावेळी  अनेक शासकांनी हे सगळे आदर्श आणि मूल्ये बाजूला सारली. यामुळे विचार आणि आचरण, विचार आणि व्यवस्था यांच्यामध्‍ये  एक दरी निर्माण झाली. मात्र, भारताला सम्राट संप्रती यांच्यासारखे शासक लाभले. त्यांनी सत्तेला सेवेचे आणि आध्यात्मिक साधनेचे एक स्वरूप मानले. काही शासकांनी हिंसेचा शस्त्र म्हणून वापर करून राज्य केले, तर सम्राट संप्रतीने आपल्या सिंहासनावरून अहिंसेचा पुरस्कार केला. त्यांनी सत्य, अस्तेयता आणि अपरिग्रह यांचा प्रसार केला. अशा वैराग्याने, अशा निःस्वार्थ भावनेने जीवन जगणे, शासनाला सेवेचे साधन मानणे, हा धडा आपण केवळ भारताच्या भूतकाळाकडूनच शिकू शकतो. आम्ही हा भूतकाळ या संग्रहालयाच्या माध्‍यमातून  जतन करत आहोत.

मित्रांनो,

या संग्रहालयाची रचना अशा प्रकारे केली आहे, हे मी बारकाईने पहात आलो आहे.  इथल्या  प्रत्येक पायरीवर  एका भव्य भारताची ओळख प्रतिबिंबित होते. यामध्‍ये  सात दालने आहेत.  त्यातील प्रत्येक दालन, भारताची विविधता आणि सांस्कृतिक समृद्धी यांचे दर्शन घडवते. पहिल्या दालनात आपल्याला नऊ अवस्थांचे दर्शन होते.  या नऊ अवस्था म्हणजे अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू. सम्यक तत्त्वज्ञान, सम्यक ज्ञान, सम्यक आचरण आणि सम्यक तपश्चर्या, म्हणजेच, ज्यांनी वैयक्तिकरित्या कठोर तपश्चर्येद्वारे जीवनावर प्रभुत्व मिळवले आहे, त्यांच्याकडून आपण शिकले पाहिजे आणि आपल्याला मिळणारे ज्ञान सम्यक असावे! आपले चारित्र्य सम्यक असावे! कारण ज्यावेळी  ज्ञान सम्यक असते, त्याचवेळी  ते समानता आणि सेवेचा आधार बनते.

मित्रांनो,

तिसऱ्या दालनात आपल्या तीर्थंकरांचे जीवन, त्यांनी दिलेले उपदेश, त्यांची  शिकवण आणि घटना कलात्मक माध्यमातून जिवंत करण्यात आल्या आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

या  संग्रहालयातून  भारताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य,  देशाची सर्वात मोठी शक्ती दर्शवते.  याआधी मी सांगितल्याप्रमाणे, ही शक्ती भारताच्या विविधतेमध्ये आणि विविधतेतील एकतेमध्ये आहे. जगाने नेहमीच पंथ, धर्म आणि श्रद्धा यांच्या नावाखाली होणारे संघर्ष पाहिले आहेत, परंतु हे संग्रहालय भारतातील इतर सर्व धर्मांची गौरवशाली रूपे देखील दर्शवते. केवळ भारतातच वैदिक आणि बौद्ध परंपरा, वेद, पुराणे, आयुर्वेद, योग, तत्त्वज्ञान आणि विविध परंपरांचे सर्व रंग इंद्रधनुष्याप्रमाणे एकत्र नांदू शकतात.

मित्रांनो,

जागतिक सद्यस्थिती पाहता, ज्या पध्‍दतीने  जग अस्थिरता आणि अशांततेच्या आगीत होरपळत आहे, त्या परिस्थितीत या संग्रहालयाचा वारसा, त्याचा संदेश केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जगभरातून येथे येणाऱ्या साधक, विद्यार्थी आणि संशोधकांची संख्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जे येथे येतात, त्यांनी भारताची आणि जैन धर्माची शिकवण जगाच्या कोनाकोपऱ्यात पसरवावी.

मित्रांनो,

भारतामध्‍ये  ज्ञानाचा प्रवाह नेहमीच मुक्तपणे प्रवाहीत होत आला आहे. प्रत्येक युगात तीर्थंकर, ऋषीमुनी आणि तत्त्वज्ञ अवतरले. ज्ञानाचा संचय सतत वाढत गेला आणि काळानुसार त्यात अनेक नवीन गोष्टींची भर पडली. कल्पना करा, एके काळी आपली तक्षशिला आणि नालंदासारखी विद्यापीठे लाखो ग्रंथ आणि हस्तलिखितांनी भरलेली होती. तथापि, परकीय आक्रमकांनी त्यांच्या धार्मिक संकुचितपणामुळे ज्ञानाला आपला शत्रू मानून ते जाळून टाकले आणि मानवतेचा इतका मौल्यवान वारसा नष्ट केला. त्या कठीण काळात, लोकांनी पिढ्यानपिढ्या वाचलेल्या हस्तलिखितांचे जतन आणि संरक्षण केले. स्वातंत्र्यानंतर, ती शोधून त्यांचे जतन करणे ही देशाची जबाबदारी असायला हवी होती, परंतु दुर्दैवाने, गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे याकडे लक्ष दिले गेले नाही.

आचार्य भगवंत श्री पद्मसागर सूरीश्वरजी महाराज साहेब यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी आणि संतांनी त्याचे महत्त्व ओळखले आणि आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी समर्पित केले. त्यांनी 60 वर्षे गावागावात, शहराशहरात, देशाच्या कानाकोपऱ्यात हस्तलिखितांचा शोध घेतला. असे शेकडो वर्षांचे ज्ञान, ताडपत्रांवर आणि भूर्जपत्रावर कोरलेली अशी तीन लाखांहून अधिक हस्तलिखिते आज कोबा येथे जतन आणि संकलित करण्यात आली आहेत. ही भारताच्या भूतकाळाची, वर्तमानाची आणि आपल्या भविष्याची एक महान सेवा आहे.

मित्रांनो,

पूर्वीच्या सरकारांनी हस्तलिखितांची उपेक्षा करून केलेल्या चुका आज आम्ही सुधारत आहोत. यासाठी आम्ही 'ज्ञान भारतम मिशन' सुरू केले आहे. या प्रयत्नात आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. या मिशनअंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने जतन केले जात आहे. स्कॅनिंग, रासायनिक प्रक्रिया आणि डिजिटल संग्रहण या सर्व गोष्टी हाती घेण्यात आल्या आहेत. या दिशेने एक सर्वेक्षण कसे सुरू करण्यात आले आहे, याची सविस्तर माहिती मी या रविवारी 'मन की बात'मध्ये दिली आहे. देशभरातील लोक त्यांच्याकडील हस्तलिखिते अपलोड करत आहेत. देशभरात विखुरलेली हस्तलिखिते गोळा करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची भूमिका बजावेल.

मित्रांनो, 

शासकीय स्तरावर 'ज्ञान भारतम मिशन' आणि 'कोबातीर्थ' यांचे असाधारण योगदान तसेच समाज आणि सरकारचे हे संयुक्त प्रयत्न भारताच्या नव्या सांस्कृतिक उदयाचे प्रतीकही आहेत.

मित्रांनो,

आज देशाचा सांस्कृतिक वारसा जतन करून तो जगासमोर मांडण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. हस्तलिखिते आणि ज्ञानाचे जतन केले जात आहेच. परंतु त्यासोबतच प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, तीर्थक्षेत्रांचा विकास, ऐतिहासिक स्थळांचा विकास आणि आयुर्वेद व योगाचा प्रचार-प्रसार अशा प्रत्येक स्तरावर काम सुरू आहे. येथे गुजरातमध्येच, येथून 70-80 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोथलमध्ये एक भव्य सागरी संग्रहालय बांधले जात आहे, जे जगातील सर्वात मोठे सागरी संग्रहालय बनणार आहे. तिकडे वडनगरमध्ये एक मोठे संग्रहालय बांधण्यात आले आहे, ज्याने जगातील सर्वोत्तम संग्रहालयांमध्ये आपले स्थान मिळवले आहे. दिल्लीत 'युग-युगीन भारत' संग्रहालय उभारण्याची तयारीही सुरू आहे. आज स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास संपूर्णपणे सादर करण्यासाठी पहिल्यांदाच अर्थपूर्ण काम केले गेले आहे. तुम्हाला आठवत असेल की, पूर्वी हे प्रयत्न राजकीय दृष्टिकोनातून केले जात होते; सर्व काही एका राजकीय घराण्यासाठी कथानक कसे तयार करायचे आणि मतपेढ्यांना अनुकूल असे कसे बोलायचे याभोवती फिरत होते. आम्ही ही मानसिकता संपवली आहे. आम्ही 'सबका साथ, सबका विकास' या मंत्रासह पुढे वाटचाल करत आहोत. हा मंत्र विकसित भारताच्या संकल्पनेचा आत्मा आहे.

मित्रांनो,

तुम्ही सर्व संतगण भारताचा वारसा जपण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करत आहात. जेव्हा आपण वैयक्तिक आकांक्षांच्या पलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्राच्या ध्येयांसाठी काम करतो, तेव्हा देशाच्या विकासाला अधिक गती मिळते. याच भावनेने मी दिल्लीत नवकार महामंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही सहभागी झालो होतो. या कार्यक्रमासाठी चारही पंथ एकत्र आले होते. त्या ऐतिहासिक प्रसंगी मी नऊ आवाहने केली होती, नऊ संकल्पांबाबत बोललो होतो ज्यांचा उल्लेख आपले मुख्यमंत्री भूपेंद्र भाई यांनीही आत्ता केला. मी प्रत्येक वेळी तुमच्यासमोर ते नऊ संकल्प पुन्हा सांगतो. आज पुन्हा एकदा त्यांचा पुनरुच्चार करण्याचे औचित्य आहे. पहिला संकल्प: पाणी वाचवा. दुसरा संकल्प: एक पेड़ माँ के नाम. तिसरा संकल्प: स्वच्छता मोहीम. चौथा संकल्प: स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन. पाचवा संकल्प: देश दर्शन. सहावा संकल्प: नैसर्गिक शेतीचा अवलंब. सातवा संकल्प: निरोगी जीवनशैलीचा अवलंब. आठवा संकल्प: आपल्या जीवनात योग आणि खेळांचा समावेश आणि नववा संकल्प: गरिबांना मदत करण्याचा आणि दहावा संकल्प तुम्ही सर्वांनी स्वतः केलेला - भारताचा वारसा जतन करण्याचा. आजचा कार्यक्रम याचेच प्रतिबिंब आहे.

मित्रांनो,

येत्या काळात आपल्यासमोर मोठी ध्येये आहेत, आपल्याला मोठे संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपली एकता, आपली सांस्कृतिक शक्ती यासाठी आपल्याला सामर्थ्य देईल. मला विश्वास वाटतो की सम्राट संप्रती संग्रहालय भविष्यात या दिशेने एक महत्त्वाची भूमिका बजावेल. ते ज्ञान, साधना आणि संस्कृतीचे एक असे केंद्र बनेल, जिथून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि समाजाला एक नवी ऊर्जा प्राप्त होईल. याच विश्वासाने, मी या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो.

यासोबतच मी सर्वांना हेही आवाहन करतो की, महाराज साहेबांनी तर हे सर्व केले आहे, पण जर आपण ते पाहण्यासाठी वेळच काढला नाही, तर ते कसे चालेल? अधिकाधिक लोकांनी इथे येऊन, पाहून निघून जावे असे नाही, तर त्यांनी ते शिकण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करावा; हा एक अनमोल खजिना आहे. आणि माझी इच्छा आहे की, गुजरातमधील सर्व पिढ्यांमधील लोकांनी आपल्या कुटुंबासोबत इथे यावे, मनसोक्तपणे हे पाहावे आणि येथील ज्ञानाचा व महान वारशाचा अभिमान बाळगावा. आणि माझ्यासाठी, आजची ही महावीर जयंती अनेक अर्थांनी शुभ आहे, कारण गांधीनगरमध्ये पोहोचताच, गुजरातच्या भूमीवर पाऊल ठेवताच, पहिला कार्यक्रम मुळांशी जोडला जाण्याचा आहे. आणि येथून मी साणंदला जाईन, जिथे जगाशी जोडले जाण्याचा दुसरा कार्यक्रम आहे. येथे मी महान सांस्कृतिक परंपरा आणि गौरवशाली भूतकाळाचे आचमन केले आणि साणंदमध्ये जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाच्या चिप्सच्या निर्मितीचे उद्घाटन होत आहे, सेमीकंडक्टरचे उद्घाटन होत आहे. इथे मुळांशी जोडले जाणे आहे आणि तेथून जगाला जोडायचे आहे. आणि हे सर्व गुजरातच्या भूमीवर घडत आहे, भारताच्या भूमीवर घडत आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

जय जिनेन्द्र !

जय जिनेन्द्र !

जय जिनेन्द्र !

अस्वीकरण: पंतप्रधानांच्या भाषणातील काही भाग गुजराती भाषेतही आहे, ज्याचा भावानुवाद येथे करण्यात आला आहे.

***

NehaKulkarni / SuvarnaBedekar / NandiniMathure

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2250690) अभ्यागत कक्ष : 8