गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जनगणना 2027: घरांची यादी आणि घरांच्या गणनेसह जगातील सर्वात मोठ्या जनगणना  प्रक्रियेला सुरुवात



पहिलेवहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वप्रथम स्व-गणना पूर्ण करत केले  देशाचे नेतृत्व

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह आणि  सहकार मंत्री अमित शाह यांनीही ऑनलाइन स्व-गणना केली

Posted On: 01 APR 2026 8:45PM by PIB Mumbai


जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने आजपासून जनगणना  2027चा पहिला टप्पा - घरांची यादी  आणि घरांची गणना  सुरू केला आहे, जो देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकी मोहिमेचा प्रारंभ आहे. ही भारताची पूर्णपणे डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधा असलेली पहिलीच जनगणना आहे.

देशाच्या  प्रथम नागरिकापासून राष्ट्रीय गणनेला सुरुवात करण्याच्या गौरवशाली परंपरेनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्व-गणनेचा पर्याय निवडून राष्ट्रीय गणना मोहिमेला सुरुवात केली.

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवन येथे जनगणना 2027 साठी ऑनलाइन स्व-गणना अर्ज भरला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली स्व-गणना पूर्ण केली. पंतप्रधानांनी भारतातील नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या कुटुंबाचा तपशील स्वतः  नोंदवून जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह यांनीही स्व-गणना पोर्टलद्वारे आपली गणना पूर्ण करून, या राष्ट्रीय प्रक्रियेतील  लोकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आजपासून आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये -ज्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोरम, ओडिशा, सिक्कीम, तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नवी दिल्ली महानगरपालिका परिषद परिसर आणि दिल्ली छावणी मंडळ यांचा समावेश आहे, 'स्व-गणना' प्रक्रिया सुरू झाली आहे. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 55,000 कुटुंबांनी पहिल्याच दिवशी या स्व-गणना सुविधेचा लाभ घेतला. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'घरयादी आणि गृहगणनाप्रक्रिया 16 एप्रिल 2026 पासून सुरू होईल आणि 15 मे 2026 पर्यंत चालेल.

'स्व-गणना' (Self-Enumeration) ही एक सुरक्षित आणि वेब-आधारित सुविधा असून, ती 16 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रथमच, गणनाकाराच्या भेटीपूर्वीच आणि तेही आपल्या सोयीनुसार, प्रतिसादकर्ते आपली माहिती ऑनलाइन भरू शकतात.

मागील जनगणनेप्रमाणेच, गणनाकार त्यांना नेमून दिलेल्या सर्व घरांच्या यादी-गटांमधील घरोघरी जाऊन भेटी देतील.  'स्व-गणनाही एक पूरक सुविधा म्हणून उपलब्ध असेल. स्व-गणनेमध्ये सहभागी होण्यासाठी, प्रतिसादकर्ते आपला मोबाईल क्रमांक आणि मूलभूत तपशीलांचा वापर करून se.census.gov.in या पोर्टलवर लॉग-इन करू शकतात. माहिती यशस्वीरित्या सादर केल्यानंतर, एकमेव विशेष  'स्व-गणना ओळख क्रमांक' (SE ID) तयार होतो; पडताळणीसाठी, त्यानंतरच्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान हा क्रमांक गणनाकारासोबत सामायिक केला जाईल.

'घरनोंदणी आणि गृहगणनाटप्प्यादरम्यान, घरांची स्थिती, घरातील सोयीसुविधा आणि कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेविषयीची सविस्तर माहिती संकलित केली जाईल. हे महत्त्वपूर्ण निर्देशक नोंदवून घेण्यासाठी जे पुरावा-आधारित नियोजन, धोरण-निर्मिती आणि लक्ष्यित कल्याणकारी उपक्रमांचा पाया ठरतात. पहिल्या टप्प्यासाठी एकूण 33 प्रश्न जानेवारी 2026 मध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत.

जनगणने अंतर्गत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधी दरम्यान संपूर्ण देशभरात गृहसूची आणि गृहगणनेचा (HLO - Houselisting and Housing Census) टप्पा पार पाडला जाणार आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिथल्या तिथल्या सरकारद्वारे अधिसूचित केल्यानुसार सलग 30 दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन (Field operation) ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यंदा पहिल्यांदाच घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणापूर्वी, स्व गणनेसाठी (Self-Enumeration) 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.  या सुविधेअंतर्गत नागरिकांना गणणेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या (Enumerator) भेटीपूर्वीच, आपापल्या घरांमधूनच स्वतःची माहितीची डिजिटल पद्धतीने नोंदवण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे.

जनगणना हे प्रशासनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे साधन असून, या गणनेतून भारताच्या पुढच्या दशकातील विकासाच्या नियोजनाचा पाया रचला जातो. जनगणना कायदा, 1948 अंतर्गत संकलीत केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असते. जनगणने अंतर्गत संकलीत केल्या जाणाऱ्या माहितीची सर्वोच्च मानांकीत सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 साठी मजबूत एनक्रीप्शन सुविधेने तसेच बहुघटकीय प्रमाणीकरण सुविधांनी सज्ज असलेली साधनेच वापरली जात आहे. नागरिकांनी स्व गणनेच्या माध्यमातून अथवा गणणेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या (Enumerator)  भेटीदरम्यान त्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि या जनगणना प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले जात आहे.

***

जयदेवी पुजारी स्वामी/शैलेश पाटील/नेहा कुलकर्णी/सुषमा काने/नंदिनी माथुरे/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2248076) अभ्यागत कक्ष : 12