रेल्वे मंत्रालय
रेल्वे प्रवास गर्दीच्या वेळीही अधिक आरामदायक आणि सुरक्षित व्हावा, यासाठी, थांबण्याच्या मोकळ्या जागांसह, देशभरातील 76 स्थानकांवर सर्व अत्याधुनिक सुविधांमधे वाढ – अश्विनी वैष्णव
सर्व विभाग आणि यंत्रणा, एकाच स्थानक संचालकांच्या हाताखाली काम करणार, संचालकांना रेल्वेस्थानक आणि रेल्वे क्षमतेनुसार तिकीटांची विक्री करण्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिल्याने प्रभावी व्यवस्थापन होणार शक्य
Posted On:
28 MAR 2026 6:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2026
भारतीय रेल्वेगाड्यांमध्ये, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी, काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ते पुढीलप्रमाणे: -
1. प्रवाशांच्या गर्दीसाठी व्यवस्थित जागा असेल, अशा कायमस्वरूपी मोकळ्या जागांची व्यवस्था, निश्चित करण्यात आलेल्या 76 स्थानकांवर केली जात आहे:
निवडक, 76 रेल्वेस्थानकांवर कायम असणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रवासी थांबू शकतील, अशा मोकळ्या जागांची व्यवस्था करण्याचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. ही जागा आरामदायक, सुनियोजित असेल, तसेच, तिथे बसण्याची, पाणी पिण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, तिकीट काढण्याची व्यवस्था, माहिती फलक आणि सुरक्षा व्यवस्था, अशा सर्व सुविधा असतील, ज्यामुळे प्रचंड गर्दीच्या वेळांमध्येही नीट व्यवस्थापन होऊ शकेल.
नवी दिल्ली स्थानकावर अशी मोकळी बसण्याची जागा निर्माण करण्यात आली आहे, ज्यामुळे गर्दीचा त्रास कमी झाला असून, प्रवाशांना, अतिरिक्त तिकीट खिडक्या, एटीव्हीएम्स, पीएएस, इलेक्ट्रॉनिक ट्रेन माहिती बोर्ड, सीसीटीव्ही, सामान तपासणी व्यवस्था, डीएफएमडी, अखंड वीजपुरवठा, सुधारित दिवेव्यवस्था, एचव्हीएलएस पंखे, अग्निशमन व्यवस्था आणि वीज संरक्षक प्रणाली, आरओ पेयजल तसेच स्त्री-पुरुष- दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, अशी सगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर स्थानकांवरही अशाच प्रकारची कामे सुरू असून, ती कुठे नियोजन आराखडा तर कुठे अंमलबजावणीच्या स्तरावर आहेत. ही सर्व कामे, नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
2. प्रवाशांच्या सहज प्रवेशावर नियंत्रण:
ज्या प्रवाशांकडे, कन्फर्म आरक्षण आहे, त्यांना स्थानकावर सहज प्रवेश मिळून थेट फलाटापर्यंत जाता येईल, असे नियोजन केले जात आहे, जेणेकरून, सर्व प्रवाशांना सहज प्रवेश मिळू शकेल. तर ज्यांच्याकडे तिकीट नाही, किंवा प्रतीक्षा यादीत नावे आहेत, अशा प्रवाशांना, बाहेर ठराविक प्रतीक्षा कक्षात सामावून घेतले जाईल. सहज प्रवेश नियंत्रण सुविधा देऊन, आरक्षण असलेले प्रवासी आणि विनातिकीट अथवा प्रतीक्षा यादीतले प्रवासी अशा दोघांचीही व्यवस्था वेगवेगळी केली जाईल.
3. रुंद पादचारी पूल (FOB)
रेल्वेच्या पादचारी पुलांसाठी 12 मीटर (40 फूट) आणि 6 मीटर (20 फूट) अशा दोन, प्रमाणित मानकांनुसारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. हे असे पादचारी पूल सर्व रेल्वेस्थानकांवर बांधले जाणार आहेत.
4. सीसीटीव्ही कॅमेरे
एआय- क्षमता असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सर्व रेल्वे स्थानकांवर आणि आसपासच्या परिसरात लावले जात आहेत. ज्याद्वारे, गर्दीवर देखरेख ठेवता येईल तसेच, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करता येईल.
5. वॉर रूम
महत्वाच्या स्थानकांवर वॉर रूम्स स्थापन केल्या जात आहेत, जिथे सर्व विभागाचे अधिकारी परस्पर समन्वय ठेवून काम करतील आणि गर्दीच्या वेळी अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन होऊ शकेल.
6. अत्याधुनिक संपर्क-संवाद उपकरणे
अत्याधुनिक डिझाईनची डिजिटल संवाद उपकरणे- जसे की वॉकी-टॉकीज, उद्घोषणा प्रणाली देखील अत्युच्च गर्दीच्या स्थानकांवर लावल्या जातील.
7. नव्या रचनेची ओळखपत्रे
रेल्वेचे सर्व कर्मचारी आणि सेवा कामगारांना क्यू आर कोड आधारित नवी ओळखपत्रे दिली जातील, जेणेकरून, त्यांना रेल्वे स्थानकांवर कुठेही सहज प्रवेश मिळू शकेल.
8. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी नवे गणवेश
सर्व कर्मचाऱ्यांना, नव्या रचनेचे गणवेश दिले जातील, ज्यामुळे कोणतेही संकट अथवा महत्वाच्या वेळी, त्यांची ओळख सहज पटू शकेल.
9. स्थानक संचालक पद उन्नत करणे
सर्व महत्वाच्या स्थानकांवर, एका वरिष्ठ अधिकाऱ्याची स्थानक संचालक म्हणून नेमणूक केली जाईल. त्यांच्याकडे, स्थानक सुधारणेसाठी, तत्क्षणी निर्णय घेण्याचे वित्तीय आणि इतर अधिकार असतील. तसेच, सर्व इतर विभाग या स्थानक संचालकांना रिपोर्ट करतील. ज्यामुळे, स्थानकावर एकसूत्री अधिकार आणि प्रभावी व्यवस्थापन शक्य होईल.
10. तिकीटांची क्षमतेनुसार विक्री
स्थानक संचालकांना, स्थानकांची क्षमता आणि उपलब्ध गाड्या लक्षात घेऊन, तिकीट विक्री क्षमतेचे नियंत्रण करण्याचा अधिकार असेल.
ही माहिती, रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक आणि माहीती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.
* * *
शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2246512)
अभ्यागत कक्ष : 20