पंतप्रधान कार्यालय
उत्तरप्रदेशात नोएडा इथे, सुमारे 11,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून विकसित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन उत्तरप्रदेशाच्या विकासाची गाथा आणि भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल – पंतप्रधान
उत्तरप्रदेश आता, भारतातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक म्हणून उदयास आले- पंतप्रधान
कोणत्याही देशात, विमानतळ म्हणजे केवळ एक सुविधा नाही, तर ती प्रगतीला पंख देणारी ठरतात- पंतप्रधान मोदी.
विकसित भारताच्या उभारणीसाठी, आमचे सरकार आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे- पंतप्रधान
Posted On:
28 MAR 2026 4:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशात जेवर इथे, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या प्रगतीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करत, हा सोहळा, विकसित उत्तरप्रदेश आणि विकसित भारताच्या गाथेत एक नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतातील सर्वात मोठे राज्य आता, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या राज्यांपैकी एक ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आज दुहेरी आनंदाचा प्रसंग आहे. पहिले कारण म्हणजे, आपणच या विमानतळाच्या कामाची पायाभरणी केली होती, आणि आज आपल्यालाच त्याचे उद्घाटनही करण्याची संधी मिळाली आहे. तर दुसरे आनंदाचे कारण या भव्य विमानतळाच्या नावाचा उत्तरप्रदेशशी जवळचा संबंध आहे. “या प्रदेशाचा खासदार म्हणून, हे राज्य माझ्या विशेष जवळचे राज्य आहे, आणि आता या शहराची ओळखच या भव्य विमानतळाशी जोडलेली असेल.” असे सांगत, पंतप्रधानांनी या क्षेत्रातील लोकांचे अभिनंदन केले.
या नव्या विमानतळाचे अनेक दूरगामी परिणामही त्यांनी विशद केले. हे नोएडा विमानतळ, आग्रा, मथुरा , अलिगढ, गाझियाबाद, मेरठ, इटवाह, भुवनेश्वर आणि फरीदाबाद अशा सर्व ठिकाणंना या विमानतळाचा लाभ मिळेल, असे ते पुढे म्हणाले. हा विमानतळ, शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी तसेच उत्तरप्रदेशच्या युवकांसाठी अनेक नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरच, “इथून एक विमान जगासाठी रवाना होईल, हे विमान, विकसित उत्तर भारताचे प्रतीक बनेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विमानतळासाठी त्यांनी उत्तरप्रदेशच्या विशेषत: पश्चिम उत्तरप्रदेशच्या लोकांचे अभिनंदन केले.
जागतिक परिस्थितीविषयी बोलताना ते म्हणाले, की आज संपूर्ण जग अत्यंत चिंतेत आहे. पश्चिम आशियात गेले महिनाभर सुरू असलेल्या युद्धामुळे, अनेक देशात, अन्नधान्य, पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. भारतही या संघर्षग्रस्त भागातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि गॅसची आयात करतो, असे त्यांनी सांगितले. “या संकटाचा भार सर्वसामान्य कुटुंबे आणि शेतकऱ्यांवर पडू नये, म्हणून सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे,” असे त्यांनी आश्वस्त केले.
सध्याच्या जागतिक संकटाच्या काळातही भारताच्या वेगवान विकासाचा वेग कायम राखला असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागातच गेल्या काही आठवड्यांत उद्घाटन वा पायाभरणी झालेला हा चौथा मोठा प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात नोएडामध्ये एका मोठ्या सेमीकंडक्टर कारखान्याची पायाभरणी झाली, देशातील पहिल्या दिल्ली मेरठ नमो भारत ट्रेनला गती मिळाली, मेरठ मेट्रो रेल्वेचा विस्तार केला गेला आणि आज नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. उत्तर प्रदेशच्या विकासातील या उल्लेखनीय यशाचे श्रेय विद्यमान सरकारचे असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सेमीकंडक्टर कारखान्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर बनू लागला आहे, मेरठ मेट्रो रेल्वे आणि नमो भारत रेल्वेमुळे जलदगतीची आणि स्मार्ट संपर्क जोडणी उपलब्ध झाली आहे, तर जेवर विमानतळामुळे संपूर्ण उत्तर भारत जगाशी जोडला गेला आहे असे त्यांनी सांगितले. विद्यमान सरकारच्या काळात नोएडा हे उत्तर प्रदेशच्या विकासाचे एक शक्तिशाली इंजिन बनू लागले असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आपल्या संबोधनातून पंतप्रधानांनी विमानतळ प्रकल्पाचा इतिहासाही सांगितला. अटलजींनी जेवर विमानतळाला 2003 मध्येच मंजुरी दिली होती याचे स्मरण त्यांनी करून दिले. विद्यमान सरकार स्थापन होताच विमानतळाच्या कामाची पायाभरणी झाली, बांधकाम झाले आणि आता हे विमानतळ प्रत्यक्षात कार्यान्वित झाले असल्याचे ते म्हणाले. हे क्षेत्र व्यावसायिक मालवाहतूक आणि रसद पुरवठा व्यवस्थापन केंद्र (लॉजिस्टिक हब) म्हणून महत्वाची भूमिका बजावू लागले असल्याचे त्यांनी सांगितले. हे क्षेत्र दोन मोठ्या फ्रेट कॉरिडॉरचे, विशेष रेल्वे मार्गांचे केंद्र बनू लागले आहे. यामुळे उत्तर भारताची बंगाल आणि गुजरातच्या समुद्रासोबतची संपर्क जोडणी अधिक मजबूत झाली आहे असे त्यांनी सांगितले. धोरणात्मकदृष्ट्या दादरी इथे हे दोन्ही कॉरिडॉर एकत्र येतात. या सोयीमुळे आता इथले शेतकरी जे काही पिकवतात आणि उद्योगांद्वारे जी उत्पादने तयार केली जातात, ती जमीन आणि हवाई मार्गाने जगाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पोहोचू शकते असे ते म्हणाले. अशा प्रकारची बहु पर्यायी संपर्क जोडणी उपलब्ध असल्यामुळे उत्तर प्रदेश हे जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षून घेणारे ठिकाण बनू लागले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
या क्षेत्राची प्रतिमाही आता बदलली आहे, आज नोएडा संपूर्ण जगाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. हे संपूर्ण क्षेत्र आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला अधिक दृढता देणारे क्षेत्र ठरले आहे असे पंतप्रधान म्हणाले. हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेती आणि कृषी क्षेत्राशी संबंधित कामे महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. आता आधुनिक संपर्क जोडणी सुविधांचा विस्तार झाल्यामुळे उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागातील अन्न प्रक्रिया उद्योगांच्या भविष्यातील प्रगतीला अधिकाधिक चालना मिळेल, इथला शेतमाल आता जागतिक बाजारपेठेत अधिक कार्यक्षमतेने पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारताचे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेत, पंतप्रधानांनी उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या यामधील महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, जर इथेनॉलचे उत्पादन वाढले नसते आणि त्याचे पेट्रोलमध्ये मिश्रण केले गेले नसते, तर भारताला दरवर्षी अतिरिक्त साडेचार कोटी पिंप म्हणजेच सुमारे 700 कोटी लिटर कच्चे तेल आयात करावे लागले असते. ते पुढे म्हणाले की, "आपल्या शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टामुळे, देशाला संकटकाळात हा खूप मोठा दिलासा मिळाला आहे."
पंतप्रधानांनी अधिक सविस्तर माहिती देत सांगितले की, इथेनॉलमुळे केवळ देशाचाच नव्हे तर शेतकऱ्यांचाही मोठा फायदा झाला असून सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांसाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागणाऱ्या त्या जुन्या दिवसांची, त्यांनी आठवण करून दिली. "आज, वर्तमान सरकारच्या प्रयत्नांमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे," असे मोदी यांनी ठासून सांगितले.
विमानतळ ही केवळ सुविधा नसून प्रगतीचा वेग वाढवणारी माध्यमं आहेत असे सांगत, पंतप्रधानांनी भारताच्या नागरी विमान वाहतूक पायाभूत सुविधांच्या उल्लेखनीय विस्ताराकडे लक्ष वेधले. आज देशात 160 पेक्षा जास्त विमानतळ असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हवाई वाहतूक आता केवळ महानगरांपुरती मर्यादित नसून ती छोट्या शहरांसाठीही उपलब्ध आहे. "विद्यमान सरकारने हवाई प्रवास सामान्य भारतीयांच्या आवाक्यात आणला आहे," असे नमूद करत त्यांनी उत्तर प्रदेशातील विमानतळांची संख्या आता सतरा पर्यंत वाढली असल्याचे सांगितले.
'उडान' (यू डी ए एन) योजनेच्या प्रभावाबद्दल भाष्य करताना पंतप्रधान म्हणाले की, विमानतळ बांधले जात असतानाच, विमान प्रवास सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्यात राहील, याची खात्री करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. 'उडान' योजनेअंतर्गत स्वस्त दरात तिकीट आरक्षण करून आतापर्यंत 1 कोटी 60 लाखांहून अधिक नागरिकांनी हवाई प्रवास केला आहे, असे नमूद करून मोदी म्हणाले की, " केंद्र सरकारने सुमारे 29,000 कोटी रुपयांच्या मंजुरीसह उडान योजनेचा नुकताच आणखी विस्तार केला आहे. या अंतर्गत येणाऱ्या काळात छोट्या शहरांमध्ये 100 नवीन विमानतळ आणि 200 नवीन हेलितळ (हेलिपॅड्स) बांधले जातील. याचा उत्तर प्रदेशलाही मोठा फायदा होईल."
भारताच्या वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्राबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, जसे नवीन विमानतळ बांधले जात आहेत, तशीच नवीन विमानांची मागणीही वाढत आहे. विविध विमान कंपन्यांनी शेकडो नवीन विमानांच्या मागण्या (ऑर्डर) नोंदवल्या आहेत. यामुळे पायलट, विमानांतर्गत सेवेकरी (केबिन क्रू) आणि देखभाल दुरुस्ती क्षेत्रातील व्यावसायिकांसह तरुणाईसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत, असे निरीक्षणही मोदी यांनी नोंदवले. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी "आमचे सरकार विमान वाहतूक क्षेत्रातील प्रशिक्षण सुविधांचाही विस्तार करत आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या विमानवाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाची उणीव अधोरेखित करताना पंतप्रधानांनी देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी क्षेत्राकडे लक्ष वेधले. सध्या भारतातील सुमारे 85 टक्के विमानांना एमआरओ सेवांसाठी परदेशात जावे लागते, असे त्यांनी नमूद केले. भारताला या क्षेत्रातही आत्मनिर्भर करण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आणि जेवर येथे एमआरओ सुविधा उभारण्यासाठी आज पायाभरणी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही सुविधा पूर्ण झाल्यानंतर ती भारतासह परदेशातील विमानांना सेवा देईल, त्यामुळे देशाला महसूल मिळेल, पैसा देशातच राहील आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असे मोदी यांनी सांगितले.
नागरिकांची सोय वाढवणे तसेच त्यांचा वेळ आणि पैसा वाचवणे ही सरकारची प्राधान्याची बाब असल्याचे अधोरेखित करत पंतप्रधानांनी मेट्रो आणि वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वे सेवांच्या विस्ताराचा उल्लेख केला. दिल्ली-मेरठ नमो भारत रेल्वेचा लाभ आतापर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी घेतला आहे. पूर्वी दिल्ली ते मेरठ हा प्रवास तासांमध्ये पूर्ण होत असे, तो आता काही मिनिटांत पूर्ण होत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
विकसित भारताच्या दृष्टीने आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या मोठ्या गुंतवणुकीवर भर देत पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 11 वर्षांत पायाभूत सुविधांसाठी अर्थ संकल्पात सह पटींहून अधिक वाढ करण्यात आली आहे. महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसाठी 17 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, एक लाख किलोमीटरहून अधिक महामार्गांची निर्मिती झाली आहे. रेल्वे विद्युतीकरणाबाबत त्यांनी नमूद केले की, 2014 पूर्वी सुमारे 20,000 किलोमीटरपर्यंत असलेले विद्युतीकरण आता 40,000 किलोमीटरहून अधिक झाले आहे आणि जवळपास 100 टक्के ब्रॉडगेज जाळे विद्युतीकृत झाले आहे. पहिल्यांदाच काश्मीर खोरे आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या राजधानी रेल्वे जाळ्याशी जोडल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, गेल्या दशकात बंदरांची क्षमता दुप्पटाहून अधिक वाढली असून अंतर्गत जलमार्गांची संख्याही सातत्याने वाढत आहे. विकसित भारत उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक क्षेत्रात भारत वेगाने प्रगती करत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर एकत्रित प्रयत्न आणि राष्ट्रीय एकतेची गरज अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर त्यांनी संसदेत सविस्तर भाष्य केले असून, मुख्यमंत्र्यांसोबतही याबाबत सखोल चर्चा केली आहे. या संकटाला शांतपणे आणि संयमाने सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आणि हेच भारतीयांचे सर्वात मोठे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या आणि भारतीयांच्या जे हिताचे आहे, तीच केंद्र सरकारची नीती आणि धोरण आहे, असा पंतप्रधानांनी पुरुच्चार केला. देशाच्या एकजुटीच्या प्रयत्नांना सर्व राजकीय पक्ष निश्चितच बळ देतील, असा आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असे मोदी म्हणाले.
* * *
शैलेश पाटील/राधिका अघोर/तुषार पवार/आशुतोष सावे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2246445)
अभ्यागत कक्ष : 24