PIB Headquarters
azadi ka amrit mahotsav

परिक्षा पे चर्चा`: विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आव्हानांतून मार्गदर्शन करणारा हृद्य संवाद

Posted On: 06 FEB 2026 3:47PM by PIB Mumbai

मुख्य मुद्दे

  • वर्ष 2018 मध्ये सुरू झालेला `परिक्षा पे चर्चा` (पीपीसी) हा एक वार्षिक राष्ट्रीय संवाद आहे, ज्यामध्ये पंतप्रधान विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी थेट संवाद साधतात आणि परीक्षा, जीवनकौशल्ये व मानसिक स्वास्थ्य या विषयांवर चर्चा करतात.
  • पीपीसी परीक्षा निष्प्रभ तणाव, भावनिक स्थैर्य आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देतो, तसेच तो राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील अनुभवाधारित आणि संकल्पनात्मक शिक्षणाशी सुसंगत आहे.
  • पीपीसी  विद्यार्थ्यांना परीक्षेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्यास प्रोत्साहित करते, आत्मविश्वास, शिस्तबद्ध तयारी आणि लढवय्ये बना, चिंता न करणे,  या विचारांद्वारे लवचिकता विकसित करण्यावर भर देते.
  • 2025 मापदंड: पीपीसी 2025 मध्ये 5 कोटींहून अधिक सहभागी व्यक्ती होते आणि 3.53 कोटी नोंदींसह हा उपक्रम गिनीज विश्व विक्रमामध्ये नोंदवला गेला, ज्यामुळे तो सर्वात मोठा जागतिक सहभागाचा टप्पा ठरला.
  • भारतभर विस्तार 2026: पीपीसी 2026 मध्ये देशभरात पाच प्रदेशांमध्ये संवाद आयोजित केले गेले. देवमोग्रा, कोयंबतूर, रायपूर, गुवाहाटी आणि 7 लोक कल्याण मार्ग (दिल्ली) येथील आयोजनामुळे समावेशकता आणि प्रादेशिक प्रतिनिधित्व आणखी बळकट झाले.

परिचय: परीक्षावीराचा उगम

`परिक्षा पे चर्चा` (पीपीसी) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सुरू केलेला एक राष्ट्रीय उपक्रम आहे. याचा उद्देश परीक्षा-संबंधित तणाव कमी करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्वांगीण शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा आहे. शिक्षण मंत्रालयातील शिक्षण व साक्षरता विभागाद्वारे आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना एक मंच उपलब्ध करून देतो. पंतप्रधान या माध्यमातून थेट संवाद साधून आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक परीक्षाभिमुख दृष्टिकोन मांडतात. हा कार्यक्रम आता जनआंदोलनात परिवर्तित झाला आहे. 2025 च्या आवृत्तीत 5 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यात सहभागी झाले. यामुळे या उपक्रमाचा राष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रभाव दिसून आला. पीपीसी वेळेचे व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, संतुलित जीवनशैली आणि संकल्पनात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देतो आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाच्या सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.

`परिक्षा पे चर्चा`(पीपीसी 2026) च्या नवव्या आवृत्तीत सहभागींची संख्या आणखी वाढली असून देशभरातून 4.5 कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि शिक्षकांनी यासाठी नोंदणी केली आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर व परीक्षा-संबंधित तणावावर लक्ष केंद्रित करत राहतो. पीपीसी 2026 च्या तयारीत 12 जानेवारी 2026 (राष्ट्रीय युवा दिन) ते 23 जानेवारी 2026 (पराक्रम दिवस) दरम्यान देशव्यापी विद्यार्थी सहभाग उपक्रम राबविले गेले. या काळात ‘स्वदेशी संकल्प दौड’ची सुरुवात झाली, ज्यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरतेचा संदेश पसरवण्यात आला, आणि शेवटी निवडक केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा व लेखन स्पर्धांच्या रूपात समारोप झाला.

हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मूळ तत्त्वांचे प्रतिबिंब आहे, ज्यामध्ये तणावरहित, अनुभवाधारित व संकल्पनात्मक शिक्षणाला घोकंपट्टी ऐवजी प्राधान्य देण्यात आले आहे. संवादाद्वारे पंतप्रधान वेळेचे नियोजन, डिजिटल विचलने नियंत्रणात ठेवणे, सजगता आणि भावनिक स्थैर्य यावर भर देतात आणि विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व्यवहार्य सल्ला देतात.

परिक्षा पे चर्चा 2026 चे काही रंजक वैशिष्ट्ये

7 लोक कल्याण मार्गावरील विशेष संवाद

पीपीसी 2026 मधील 7 लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे पार पडलेल्या संवादात अनेक संस्मरणीय व प्रेरणादायी क्षण घडले. या आवृत्तीत 4.5 कोटींपेक्षा जास्त नोंदणी झाली आणि अतिरिक्त 2.26 कोटी लोक संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी झाले, त्यामुळे एकूण सहभाग 6.76 कोटींहून अधिक झाला.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना न्याहारीदरम्यान अचानक भेट दिली, ज्यामुळे त्यांच्या उत्साहात अधिक वाढ झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना आसामी गमुछा भेट म्हणून दिले, जे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षांशी संबंधित भीती आणि त्यावर मात करण्याच्या उपायांवर खुल्या मनाने चर्चा केली. अनेकांनी एक्झाम वाॅरियर्स या पुस्तकातील विचारांमधून प्रेरणा घेतल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना हस्तनिर्मित पुष्पगुच्छ, पुनर्वापरित साहित्यापासून बनवलेली वीणा, आसामी गमुछा, सिक्किममधील सेंद्रिय चहा आणि पारंपरिक मिठाई यांसारख्या भेटवस्तू दिल्या, ज्यातून त्यांची सर्जनशीलता आणि प्रादेशिक वारसा दिसून आला.

पीपीसीचा देशव्यापी विस्तार

वर्ष 2026 ची आवृत्ती  पीपीसी कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने भारतभरातील  कार्यक्रमात परिवर्तित करते. यात पहिल्यांदाच देशातील विविध प्रदेशांमध्ये संवाद आयोजित झाले. कोयंबतूर (तामिळनाडू), रायपूर (छत्तीसगढ), देवमोग्रा (गुजरात), गुवाहाटी (आसाम) आणि नवी दिल्ली येथे यांचे आयोजन करण्यात आले.

आसाममधील एक आगळीवेगळे सत्र ब्रह्मपुत्रा नदीवरील क्रूझवर झाले, ज्यातून प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि नवोन्मेषी संपर्काचा संदेश दिला गेला.

 

उपक्रम ते जनआंदोलन: पीपीसीची वाढ

पीपीसीने 2018 मध्ये नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये साध्या स्वरूपात सुरुवात केली होती, जिथे 2,500 विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते आणि सुमारे 8.5 कोटी प्रेक्षकांनी दूरदर्शन, रेडिओ आणि ऑनलाईन माध्यमांद्वारे कार्यक्रम पाहिला. पहिल्या आवृत्तीत सर्वांगीण विकास व मानसिक लवचिकतेवर लक्ष केंद्रीत होते.

वर्ष 2019 मध्ये कार्यक्रमाचा कालावधी 90 मिनिटांहून अधिक झाला आणि विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी विनोदी व प्रेरणादायी घटक जोडले गेले. 2020 मध्ये ऑनलाईन स्पर्धा सुरू करण्यात आली, ज्यात भारत व 25 देशांतील 2.63 लाख नोंदी प्राप्त झाल्या.

कोवीड-19 साथरोगा दरम्यान पीपीसीने आपली लवचिकता दाखवली. 2021 मध्ये संपूर्ण कार्यक्रम ऑनलाइन झाला (7 एप्रिल), आणि अनिश्चित काळात सशक्ततेचा संदेश दिला. 2022 मध्ये पुन्हा प्रत्यक्ष स्वरूपात तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजन झाले, ज्यात 9.69 लाख विद्यार्थी प्रेक्षक आणि हजारो शिक्षक-पालक यूट्यूब व टिव्हीवर सहभागी झाले.

2023 मध्ये 27 जानेवारीला झालेल्या आवृत्तीत 7.18 लाख विद्यार्थी, 42,337 कर्मचारी आणि 88,544 पालक सहभागी झाले, ज्याने तणाव व्यवस्थापनातील त्याची भूमिका बळकट केली.

2024 मध्ये पीपीसी भारत मंडपम येथे मुक्तसंवाद स्वरूपात आयोजित झाला, ज्यात सुमारे 3,000 सहभागी व एकलव्य माॅडेल रेसीडेंशीयल स्कूल्स(ईएमआरएस) मधील 100 विद्यार्थी सहभागी झाले, व मायगव्ह पोर्टलवर 2.26 कोटी नोंदणी झाली.

2025 मध्ये पीसीसीने 5 कोटी सहभागाचा ऐतिहासिक टप्पा गाठला आणि 3.53 कोटी नोंदींसाठी गिनीज विश्व विक्रम मिळवला. या वेळेस 7 भागांमध्ये प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग व सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 36 विद्यार्थ्यांशी संवाद झाला.

2026 च्या नवव्या आवृत्तीत पीपीसीने 4.5 कोटींपेक्षा जास्त नोंदणी पार केली असून काही अहवालांनुसार सहभाग 6.76 कोटींपर्यंत पोहोचला आहे.

हजारोंमधून कोटींपर्यंतचा हा प्रवास पीपीसीच्या परिवर्तनाची कथा सांगतो, एका साध्या उपक्रमापासून तो पंतप्रधान मोदी यांच्या दृष्टिकोनातून नवयुवकांच्या सर्वांगीण विकासासाठी जनआंदोलन बनला आहे.

रूप : आकर्षक आणि सर्वसमावेशक संवाद

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम अगदी सोप्या आणि सहभागात्मक पद्धतीने घेतला जातो. सुरुवात माय गोव्हवरच्या ऑनलाइन बहुप्रश्नात्मक स्पर्धेने होते. या स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना थेट पंतप्रधान नरेंद्र अमोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. या कार्यक्रमात विद्यार्थांनी परीक्षेला कसे सामोरे जावे, जीवनातील कौशल्ये कशी वाढवावीत आणि स्वतःचा विकास कसा करावा, याबद्दल प्रश्न विचारतात. कार्यक्रम टाउन-हॉलसारख्या मोकळ्या वातावरणात होतो, त्यामुळे संवाद अधिक सहज आणि मैत्रीपूर्ण होतो. 2025 मध्ये हा कार्यक्रम दिल्लीतील सुंदर नर्सरी येथे झाला या कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रम अधिक आपुलकीचा आणि आनंददायी वाटला.

हा उपक्रम परीक्षेच्या तणावाला आत्मविश्वासात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी सर्जनशीलता, स्वतःवरील विश्वास आणि सकारात्मक शिकण्याची पद्धत यांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांना आपले विचार मोकळेपणाने मांडण्यास आणि आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, संपूर्ण देशभरात शिक्षण अधिक रंजक, प्रेरणादायी आणि सक्षम करणारे एक व्यापक आंदोलन बनत आहे.

2026 मधील परीक्षा पे चर्चा या उपक्रमासाठी 12 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान विविध उपक्रम राबवण्यात आले. यात विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवण्यात आला. स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्वदेशी संकल्प दौड आयोजित करण्यात आली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामुळे हा उपक्रम केवळ एक उपक्रम न राहता, राष्ट्रीय भावनांशी जोडलेला एक सांस्कृतिक सोहळा ठरला. 2026 मध्ये आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे हा उपक्रम एकाच ठिकाणी न होता देशातील विविध भागांत आयोजित करण्यात आला. देवमोगरा, कोयंबतूर, रायपूर, गुवाहाटी आणि दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग येथे विशेष संवाद आयोजित करण्यात आले. या पद्धतीमुळे देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत संवाद अधिक सहज पोहोचला. विविध भागांतील अनुभव समोर आले आणि सर्वांना सामावून घेणारे वातावरण निर्माण झाले.

 

 

नवीन पैलूंचा शोध : परीक्षा पे चर्चा माध्यमातून शिक्षणाचा व्यापक विस्तार

परीक्षा पे चर्चा (पीपीसी) हा उपक्रम केवळ परीक्षांपुरत्या चर्चेपुरता मर्यादित न राहता, हळूहळू अधिक व्यापक स्वरूपात विकसित झाला आहे. आता तो शिक्षणाला जीवन कौशल्ये, सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी जोडणारा एक महत्त्वाचा मंच ठरला आहे. या उपक्रमातील विषयांचा विस्तार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा व्यापक दृष्टिकोन दर्शवतो. यामुळे तरुण विद्यार्थ्यांना जबाबदार, संतुलित आणि भविष्यासाठी सज्ज अशी विचारसरणी विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढवण्यावर अधिक भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाला पर्यावरणपूरक सवयी आणि जीवनशैलीशी जोडावे, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. संवादादरम्यान “एक पेड माँ के नाम” या मोहिमेवर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या सन्मानार्थ झाड लावण्यास प्रोत्साहित केले जाते. यामुळे निसर्गाशी भावनिक नाते निर्माण होते आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढते. हा उपक्रम शासनाच्या मिशन लाईफ या संकल्पनेशी सुसंगत आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा जबाबदारीने वापर करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची भावना विकसित करणे यावर भर दिला जातो.

परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये अभ्यासासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व सातत्याने अधोरेखित केले जाते. विद्यार्थ्यांनी निरोगी आहाराच्या सवयी अंगीकाराव्यात, संतुलित दिनचर्या ठेवावी आणि मन शांत ठेवण्याच्या पद्धतींचा अवलंब करावा, असे मार्गदर्शन केले जाते. तणाव योग्य प्रकारे हाताळण्यासाठी श्वसनाचे व्यायाम, सजगपणे अन्न सेवन करणे अशा उपायांवर भर दिला जातो. यामुळे एकाग्रता वाढते, चिंता कमी होते आणि एकूण आरोग्य सुधारते. यातून अभ्यासातील यश, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्थैर्य यांचा एकमेकांशी असलेला जवळचा संबंध अधिक स्पष्ट होतो.

परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये वाढत्या तांत्रिक साधनांच्या वापराची जाणीव ठेवत, त्याचा योग्य आणि मर्यादित वापर करण्यावर भर दिला जातो. मोबाईल, दूरदर्शन यांसारख्या साधनांचा अति वापर आणि त्यातून होणारे लक्ष विचलित होणे याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. एकाग्रता वाढवण्यासाठी आणि कुटुंबीयांशी संवाद अधिक दृढ करण्यासाठी काही काळ तांत्रिक साधनांपासून दूर राहण्याची सवय लावावी, असे सुचवले जाते. या उपक्रमातून तंत्रज्ञानाचा वापर केवळ वेळ घालवण्यासाठी नव्हे, तर अभ्यासासाठी उपयुक्त साधन म्हणून करावा, यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये योग्य वापराची सवय आणि शिस्त निर्माण होते.

परीक्षा पे चर्चा हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 यांच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. या धोरणात आनंददायी, सर्वसमावेशक आणि अनुभवाधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे, आणि त्यालाच हा उपक्रम पूरक ठरतो. हा उपक्रम समग्र शिक्षा अभियान आणि पीएम-श्री शाळा योजना यांसारख्या शैक्षणिक उपक्रमांनाही बळकटी देतो. या योजनांचा उद्देश देशभरातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि ते सर्वांसाठी सुलभ करणे हा आहे. संकल्पनांची सखोल समज, सर्जनशीलता आणि समान संधी यांना प्रोत्साहन देऊन परीक्षा पे चर्चा हा उपक्रम विद्यार्थीकेंद्रित आणि समतोल शिक्षण पद्धतीला चालना देतो.

परीक्षा पे चर्चा हा उपक्रम विविध सामाजिक-आर्थिक स्तरांतील, भिन्न प्रदेशांतील आणि वेगवेगळ्या शालेय व्यवस्थांतील विद्यार्थ्यांना एकत्र आणतो. त्यामुळे भारतातील शिक्षणातील विविधता स्पष्टपणे प्रतिबिंबित होते आणि सर्वांना समान सहभागाची संधी मिळते. 2026 मध्ये हा उपक्रम देशभरातील विविध भागांमध्ये आयोजित करण्यात आला. देवमोगरा, कोयंबतूर, रायपूर, गुवाहाटी आणि दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग येथे संवाद सत्रे घेण्यात आली. यामुळे विविध प्रदेशांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक शैक्षणिक अडचणी मांडण्याची संधी मिळाली. या आवृत्तीत 4.5 कोटीहून अधिक नोंदणी झाली, तर विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक मिळून एकूण सहभाग 6.76 कोटींहून अधिक नोंदवण्यात आला. यावरून या उपक्रमावरील देशभरातील वाढता विश्वास आणि महत्त्व अधोरेखित होते.

परीक्षा पे चर्चा या उपक्रमात अवघड गोष्टी सोप्या करून सांगण्यासाठी खेळ, दैनंदिन जीवन आणि प्रेरणादायी कथांचा उपयोग केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक सहज समजतो. उदाहरणार्थ, फलंदाज जसा खेळताना पूर्ण लक्ष केंद्रित ठेवतो, तसेच अभ्यास करतानाही एकाग्र राहावे, असे सांगितले जाते. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांमधील परस्पर सहकार्याच्या कथांमधून चिकाटी, संघभावना आणि आरोग्यदायी स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अशा उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी अडथळे वाटत नाहीत, तर त्या स्वतःच्या प्रगतीसाठी संधी म्हणून पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते.

परीक्षा पे चर्चा या उपक्रमात केवळ अभ्यासाविषयी मार्गदर्शन न करता, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष भर दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये स्वशिस्त, विश्वास निर्माण करणे आणि नैसर्गिक गुणांचा विकास करणे यांसारख्या मूल्यांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कृतीतून आदर्श घालून द्यावा आणि इतरांना मदत करावी, असे या उपक्रमातून सांगितले जाते. त्यामुळे जबाबदार आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते, जे समाजासाठी सकारात्मक योगदान देऊ शकते. या सर्व पैलूंमुळे परीक्षा पे चर्चा हा उपक्रम केवळ परीक्षेची तयारी यापुरता मर्यादित राहत नाही, तर जीवनातील कौशल्ये, सामाजिक जबाबदारी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांनाही चालना देणारा एक व्यापक उपक्रम बनला आहे. यामुळे विद्यार्थी सर्वांगीण आणि भविष्यासाठी सक्षम बनतात.

सकारात्मक विचारसरणीचा विकास :

मानसिक व सामाजिक आरोग्य :

परीक्षा पे चर्चा या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला बळकटी मिळाली आहे. हा उपक्रम शासनाच्या मनोदर्पण उपक्रम याला पूरक ठरतो. हा उपक्रम शिक्षण मंत्रालयांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य आणि समुपदेशनासाठी सहाय्य देणारा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम आहे. परीक्षेची भीती, अभ्यासाचा ताण आणि अपेक्षांचा दबाव यांसारख्या विषयांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे मदत घेण्याबाबतची संकोचाची भावना कमी होते. यामुळे विद्यार्थ्यांना आपला ताण मोकळेपणाने व्यक्त करण्याचे धैर्य मिळते आणि मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होते.

परीक्षा पे चर्चा या संवादांमधून वेळेचे योग्य नियोजन कसे करावे, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आई ही वेळेचे उत्तम नियोजन करणारी आदर्श व्यक्ती आहे असे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन पद्धतशीरपणे करणे, अवघड विषयांना प्राधान्य देणे आणि शेवटच्या क्षणी होणारा ताण कमी करणे यासाठी प्रोत्साहन मिळते. योग्य नियोजनामुळे अभ्यास अधिक सुलभ होतो आणि आत्मविश्वासही वाढतो.

परीक्षा वॉरियर्स या पुस्तकातून प्रेरणा घेऊन परीक्षा पे चर्चा या उपक्रमामध्ये सकारात्मक शिकण्याच्या दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले जाते. आत्मविश्वास, शिस्त आणि चिकाटी या गुणांवर आधारित ही संकल्पना विद्यार्थ्यांना बळ देते. चिंता करणारे न होता, योद्धा बना असा संदेश देणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे ते आत्मविश्वासाने आणि निर्धाराने परीक्षेला सामोरे जातात. या संदेशाला शासकीय माध्यमांवरही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत झाली आहे.

निष्कर्ष : भारतातील युवकांसाठी एक चिरस्थायी वारसा

परीक्षा पे चर्चा हा उपक्रम आता केवळ परीक्षेपूर्वीचा एक भाग राहिलेला नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणारे एक व्यापक आंदोलन बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालय आणि वर्गखोली यांमधील अंतर कमी करत, या उपक्रमाने युवकांमध्ये आपलेपणाची भावना आणि आत्मविश्वास निर्माण केला आहे. भारत विकसित भारत 2047 या दिशेने वाटचाल करत असताना, परीक्षा पे चर्चा हा उपक्रम देशाच्या भविष्याचा पाया असलेल्या विद्यार्थ्यांना सक्षम, तणावमुक्त आणि जगासमोर उभे राहण्यास तयार करते.

References:

Press Information Bureau

DD News

PM India (Official PMO Website)

Indian Missions

Ministry of Education

Click here to see pdf 

***

YashRane / RajDalekar / NitinGaikwad / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2244914) अभ्यागत कक्ष : 25