नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय विमान वाहतुकीत प्रवासी सुविधांना बळकटी

Posted On: 18 MAR 2026 8:56AM by PIB Mumbai

उडान योजनेअंतर्गत हवाई प्रवास अधिकाधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनल्यामुळे, भारत जागतिक स्तरावर तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. सध्या भारतातील विमानतळांवरून दररोज पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात, हे या क्षेत्राच्या जलद वाढीचे द्योतक आहे.

प्रवाशांसाठी चांगल्या सोयीसुविधांची तरतूद करणे याला कायमच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सर्वोच्च प्राधान्य असते. या सुविधांप्रतीच्या कटिबद्धतेनुसार, मंत्रालयाने प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी अनेक प्रवासी-केंद्रीत उपक्रम हाती घेतले आहेत, त्यामध्ये परवडणाऱ्या दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी 'उडान यात्री' कॅफे, प्रवासात वाचनासाठी पुस्तके मोफत उपलब्ध व्हावीत यासाठी 'फ्लायब्ररी' आणि विमानतळांवर मोफत वाय-फायची सुविधा अशा तरतुदींचा समावेश आहे.

प्रवाशांची सोय, पारदर्शकता आणि विमान कंपन्यांच्या कार्यपद्धतींमध्ये अधिक एकसमानता आणण्यासाठी, मंत्रालयाने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत (डीजीसीए) पुढील निर्देश जारी केले आहेत:

  • सर्वांना समान संधी मिळावी यासाठी, कोणत्याही विमानातील किमान 60% जागा कोणतेही शुल्क न आकारता दिल्या गेल्या पाहिजेत.

  • एकाच पीएनआरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एकत्र, शक्यतोवर शेजारी-शेजारी असलेल्या आसनांवर बसावे.

  • क्रीडा साहित्य आणि संगीत वाद्यांची वाहतूक, लागू असलेल्या सुरक्षा आणि परिचालन नियमांच्या अधीन राहून, पारदर्शक आणि प्रवासी-स्नेही पद्धतीने झाली पाहिजे. विमान कंपन्यांनी पाळीव प्राण्यांच्या वाहतुकीसंदर्भातही स्पष्ट, पारदर्शक धोरणे निश्चित केली पाहिजेत.

  • प्रवाशांच्या हक्कांच्या विशेषतः विलंब, रद्दबातल आणि नाकारलेल्या बोर्डिंगसंदर्भातील फ्रेमवर्कचे काटेकोर पालन,.

  • सर्व विमान कंपन्यांची संकेतस्थळे, मोबाईल ॲप्स, बुकिंग प्लॅटफॉर्म्स आणि विमानतळावरील काउंटर्सवर प्रवाशांच्या हक्कांची ठळकपणे माहिती दर्शवणे

  • व्यापक सुलभता आणि जागरूकता सुनिश्चित करण्यासाठी प्रवाशांच्या हक्कांविषयी प्रादेशिक भाषांमध्ये स्पष्ट संवाद.

प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, तक्रारी कमी करण्यासाठी आणि संपूर्ण हवाई वाहतूक प्रणालीमध्ये सुरक्षा मानकांना सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय कटिबद्ध आहे.

***

NitinFulluke / ManjiriGanoo/ DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2241625) अभ्यागत कक्ष : 30