PIB Headquarters
भारतीय सशस्त्र दलांमध्ये कार्यरत महिला – भूमिका आणि संधींचा विस्तार
Posted On:
08 MAR 2026 1:17PM by PIB Mumbai
|
महत्वाचे मुद्दे
- आंतरराष्ट्रीय महिला दिनी (8 मार्च), भारतीय सशस्त्र दलांमध्ये कार्यरत महिलांचे विस्तारत जाणारे नेतृत्व आणि कार्यकारी भूमिका यांमधून त्यांचे राष्ट्रीय संरक्षणाप्रती वाढते योगदान अधोरेखित होते.
- सशस्त्र दलांमध्ये कार्यरत महिला अधिकाऱ्यांची संख्या 11,000 पर्यंत वाढली असून त्यासाठी विस्तारित प्रशिक्षण संधी तसेच अधिक उत्तम संस्थात्मक समावेश यांचे पाठबळ लाभले आहे.
- राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) प्रवेश घेणाऱ्या महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत असून, मे 2025 मध्ये या संस्थेतून 17 महिलांनी पदवी प्राप्त केली तर नोव्हेंबर 2025 15 महिला पदवीधर झाल्या.
- महिला अधिकारी आता लेफ्टनंट जनरल श्रेणी, लढाऊ वैमानिक तसेच महत्त्वाच्या तुकड्यांच्या कमांडर्स अशा अनेक ज्येष्ठ नेतृत्वपद आणि कार्यकारी अधिकारपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत.
|
प्रस्तावना
आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये महिलांच्या विस्तारत जाणाऱ्या भूमिका आणि उंचावत जाणाऱ्या नेतृत्वावर विचारमंथन करण्याची संधी देतो. यापैकी, महिलांची भारतीय सशस्त्र दलांमधील वाढती उपस्थिती हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. परिचालनात्मक कर्तव्यांपासून, नेतृत्व सांभाळण्याच्या पदांपर्यंत प्रत्येक ठिकाणी या महिला अत्युच्च व्यावसायिकता आणि समर्पण वृत्तीसह देशाच्या संरक्षणविषयक परिदृष्याला आकार अधिकाधिक प्रमाणात देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या काही दशकांमध्ये, त्यांचा हा समावेश भारताच्या संरक्षण क्षेत्रामधील एका सर्वात महत्त्वपूर्ण संस्थात्मक परिवर्तनाच्या रुपात उदयाला आला आहे. प्रगतीशील धोरणात्मक सुधारणा, न्यायिक पाठबळ तसेच लिंगसमानता आणि परिचालनात्मक समावेशकतेच्या राष्ट्रीय उद्दिष्टांना अनुसरून असलेले सातत्यपूर्ण संस्थात्मक प्रयत्न यांच्या माध्यमातून आतापर्यंत बहुतांश प्रमाणात वैद्यकीय आणि परिचारिकांच्या भूमिकांतील ऐतिहासिकदृष्ट्या मर्यादित उपस्थितीपासून, महिलांचा सहभाग सातत्याने विस्तारत राहिला आहे.
आज, लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांमध्ये महिला अधिकारी अधिकाधिक प्रमाणात नेतृत्वविषयक, धोरणात्मक आणि निर्णय घेण्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत; ज्यामुळे भारताच्या संरक्षण दलांमध्ये सर्वसमावेशकता, व्यावसायिकता आणि वर्धित कार्यक्षमता यांच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
भारतीय संरक्षण सेवांमधील महिलांची ऐतिहासिक झेप

भारतीय संरक्षण सेवांमध्ये महिलांची भूमिका सातत्याने मर्यादित पाठबळात्मक कार्यांकडून अधिकाधिक प्रमाणात वैविध्यपूर्ण परिचालनात्मक आणि नेतृत्वशील स्थानांमध्ये विकसित झाली आहे. सशस्त्र दलांच्या वैद्यकीय सेवांमधील समावेशापासून सुरुवात करून महिलांनी हळूहळू शॉर्ट सर्व्हिस कमिशन आणि विशेष भूमिकांच्या माध्यमातून दलाच्या इतर शाखांमध्ये देखील प्रवेश केला. गेल्या काही वर्षांमध्ये प्रागतिक धोरणात्मक सुधारणा तसेच न्यायिक हस्तक्षेपांनी लष्कर, नौदल आणि हवाई दलांमध्ये महिलांच्या संधींचा विस्तार केला आहे. ही ऐतिहासिक वाटचाल आज होऊ घातलेल्या परिवर्तनकारी बदलांना समजून घेण्यासाठीचा पाया रचते.
स्वातंत्र्यानंतर, भारताच्या लैंगिक समानता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या वचनबद्धतेनुसार, भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांच्या भूमिका वैद्यकीय साहाय्यापासून ते व्यापक अधिकारी-स्तरीय समावेश आणि कार्यात्मक योगदानापर्यंत विकसित झाल्या.
वर्ष 1958 मध्ये, प्रथमच, महिला डॉक्टरांना पुरुष डॉक्टरांसारख्याच समान अटींवर लष्करी वैद्यकीय कॉर्प्समध्ये नियमित स्वरुपाची कमिशन्स बहाल करण्यात आली.

वर्ष 1992 मध्ये, भारतीय सशस्त्र दलांनी महिलांसाठी अधिकारी स्तरावरील प्रवेश खुला केला. भारतीय लष्कराने महिलांसाठी विशेष प्रवेश योजना (डब्ल्यूएसईएस) सुरु करून महिलांना बिगर-लढाऊ शाखांमध्ये नियुक्त करण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर पात्रता निकषांचा विस्तार करत, कर्तव्यावर असताना मारल्या गेलेल्या सैनिकांच्या विधवांना देखील अनुकंपा तत्वावरील उपाययोजना म्हणून या योजनेद्वारे सशस्त्र दलांमध्ये काम करण्याची मुभा देण्यात आली.
याचवर्षी संरक्षण क्षेत्रातील इतर दलांमध्ये समांतर प्रगती बघायला मिळाली. भारतीय नौदलाने प्रथमच महिला अधिकाऱ्यांचा सेवेत समावेश केला तर भारतीय हवाई दलाने स्वतःच्या फ्लाईंग, टेक्निकल तसेच बिगर-टेक्निकल शाखांमध्ये महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन अधिकारी म्हणून नियुक्त करण्याची सुरुवात केली. एकूण, 1992 मधील या उपक्रमांनी भारताच्या संरक्षण धोरणातील निर्णायक बदलाचे प्रतिनिधित्व करत, सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या टप्प्याटप्प्याने विस्तारणाऱ्या भूमिकांचा पाया रचला.
भारताच्या संरक्षण सेवांमध्ये लैंगिक समावेशनाला चालना
देशाच्या सशस्त्र दलांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठीच्या सातत्यपूर्ण उपायांचा भाग म्हणून, महिलांमध्ये कारकीर्दीचे मार्ग तसेच नेतृत्ववादी भूमिका यांचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. कर्नल श्रेणीच्या (निवडक वर्गातील) पदोन्नतीसाठी आता महिला अधिकाऱ्यांचा विचार होऊ लागला आहे आणि त्यांना अधिकारी दर्जाची कार्ये नेमून देण्यात येत आहेत. कारकिर्दीच्या प्रगतीवर होऊ शकणारा कोणताही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी, स्थित्यंतर कालावधीत अनिवार्य करियर अभ्यासक्रम पूर्ण करु न शकलेल्या अधिकाऱ्यांसाठी विशिष्ट सूट देण्यात आली आहे.
या विस्तृत सुधारणांच्या आधारावर, प्रत्येक सशस्त्र सेवादलाने नेतृत्वपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये महिलांना अधिकाधिक प्रमाणात सामावून घेण्यासाठी लक्ष्यित उपक्रम हाती घेतले आहेत.
भारतीय लष्कर
- कारकिर्दीत दीर्घकालीन स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी, महिला अधिकाऱ्यांना ‘आर्मी मेडिकल कॉर्प्स’, ‘आर्मी डेंटल कॉर्प्स’ आणि ‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस’ यासह 12 शाखा आणि सेवांमध्ये स्थायी कमिशन देण्यात आले आहे.
भारतीय नौदल
- समुद्री क्षेत्रासाठी परिचालनात्मक समावेशात प्रगती करत, महिला अधिकाऱ्यांना आता युद्धनौकांमध्ये अफ्लोट कार्यांसाठी नियुक्त करण्यात येत आहे तसेच नौदलातील वैमानिक आणि नौदलाच्या हवाई मोहिमांमध्ये (एनएओ) अधिकारी म्हणून देखील नेमणुका देण्यात येत आहेत.
- नौदलातील प्रवेशाच्या संधींचा विस्तार करत, दलाने महिलांसाठी पाणबुड्यांखेरीज इतर सर्व शाखा आणि विशेष कार्यक्षेत्रांमध्ये अधिकारी तसेच अग्निवीर म्हणून महिलांच्या नियुक्तीचा मार्ग खुला केला आणि महिलांच्या नेमणुकांसाठी अग्निपथ योजनेचा वापर करून घेणारे पहिले सेवादल ठरले.
- हवाई क्षेत्रात, महिला अधिकारी आता रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट (आरपीए) शाखेमध्ये काम करण्यास पात्र ठरल्या असून वर्ष 2021 मध्ये पहिली महिला अधिकारी आरपीए स्क्वाड्रनमध्ये समाविष्ट झाली.
- याशिवाय, जानेवारी 2024 पासून महिला सैनिकांना भारतीय नौदल अकादमीमध्ये 10+2 बी.टेक प्रवेश योजनेद्वारे समावेशासाठी पात्र ठरवण्यात आले.
भारतीय हवाई दल
- वर्ष 1990च्या सुमारास लढाऊ सहाय्यक भूमिकेत महिलांना पायलट म्हणून जबाबदारी देणारे भारतीय हवाई दल हे पहिले संरक्षण दल ठरले आहे. एका महत्वपूर्ण सुधारणेअंतर्गत सुरुवातील प्रायोगिक तत्वावर वर्ष 2015 मध्ये महिला अधिकाऱ्यांच्या लढाऊ भूमिकांमध्ये अंतर्भाव करण्यात आला, ज्याला नंतर 2022 मध्ये कायमस्वरूपी योजनेच्या रुपात औपचारिक स्वरूप देऊन समान पायावर लढाऊ आणि इतर युध्दसंबंधी शाखांमध्ये प्रवेशाचे मार्ग खुले करण्यात आले.
- या घडामोडीला पूरक ठरत, वर्ष 2017 पासून फ्लाईंग शाखेमध्ये महिलांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन मधील प्रवेशासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) विशेष प्रवेश योजनेंतर्गत रिक्त पदांची व्यवस्था करण्यात आली.
- यासोबतच, एनडीएच्या माध्यमातून महिला कॅडेट्सची भरती प्रक्रिया संस्थात्मक करण्यात आली. यातून 2027 पर्यंत हवाई दलासाठी दर अभ्यासक्रमामागे महिलांसाठी सहा रिक्त पदे (2 फ्लाइंग साठी आणि 2 'ग्राउंड ड्युटी (तांत्रिक)'साठी, आणि 2 'ग्राउंड ड्युटी (बिगर-तांत्रिक)'साठी निश्चित करण्यात आली आहेत.
- दिनांक 2 डिसेंबर 2023 पासून अग्निवीर वायू महिला (एजीव्ही डब्ल्यू) मोठ्या अभिमानाने भारतीय हवाई दलाच्या सेवेत सहभागी झाल्या असून यातून महिलांना सक्षम करण्याप्रति तसेच समावेशक लष्करी वातावरणाची जोपासना करण्याप्रती हवाई दलाची दृढ वचनबद्धता दिसून येते.

एकत्रितपणे, तिन्ही सेवादलांच्या या उपाययोजना, भारतीय संरक्षण दलांमध्ये परिचालनात्मक, तांत्रिक तसेच नेतृत्वसंबंधी भूमिकांमध्ये महिलांच्या सहभागाच्या समन्वयीत आणि प्रगतीशील विस्ताराचे दर्शन घडवतात. वर्ष 2025 मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून मे महिन्यात 17 तर नोव्हेंबर महिन्यात आणखी 15 महिला सैनिकांनी पदवी प्राप्त केली. यातून वर्ष 2022 मध्ये एनडीए मध्ये महिलांच्या प्रवेशाची सुरुवात झाल्यापासून अकादमीने महिलांसाठी सातत्याने केलेला संधींचा विस्तार अधोरेखित होतो. या वर्षाच्या, म्हणजे 2026 च्या सुरुवातीला एकूण 158 महिलांनी एनडीएमध्ये प्रवेश घेतला आहे. याशिवाय, मार्च 2025 पर्यंत हरियाणा राज्यातून सर्वाधिक म्हणजे 35 महिलांनी अकादमीत प्रवेश घेतला, त्याखालोखाल उत्तर प्रदेशातील 28 तर राजस्थानातील 13 महिलांनी एनडीएमध्ये प्रवेश घेतला आहे. लष्कराने वर्ष 2024 मध्ये महिला सैनिकांची वार्षिक भर्ती 80 वरुन 144 पर्यंत (80% ची वाढ) वाढवली आहे.
महिला अधिकारी सशस्त्र दलात नवीन स्थान निर्माण करत आहेत
भारतीय सशस्त्र दलातील महिलांनी नेतृत्व, परिचालन तैनाती आणि जागतिक प्रतिनिधित्वात लक्षणीय प्रगती केली आहे, ज्यातून तिन्ही सेवांमध्ये लिंग समावेशकतेला अधिकाधिक चालना देण्याचे निरंतर प्रयत्न प्रतिबिंबित होतात .

2025 मध्ये, तिन्ही सैन्यदलांच्या सर्व महिला नौकानयन मोहिमेत, 11 महिला अधिकाऱ्यांनी, ज्यात लष्करातील (लेफ्टनंट कर्नल अनुजा, मेजर करमजीत, मेजर तान्या, कॅप्टन ओमिता, कॅप्टन दौली आणि कॅप्टन प्राजक्ता), नौदल (लेफ्टनंट कमांडर प्रियंका) आणि हवाई दलातील (स्क्वॉड्रन लीडर विभा, स्क्वॉड्रन लीडर श्रद्धा, स्क्वॉड्रन लीडर अरुवी आणि स्क्वॉड्रन लीडर वैशाली) स्वदेशी जहाज त्रिवेणीवरून 1,800 सागरी मैल अंतर कापत सेशेल्सपर्यंत प्रवास पूर्ण केला, ज्यामध्ये परिचालन क्षमता आणि संयुक्त-सेवा समन्वयाचे उत्तम दर्शन घडले. भारताच्या संरक्षण दलांमध्ये महिलांच्या वाढत्या नेतृत्वाचे एक सशक्त प्रतीक तेव्हा ठळकपणे अधोरेखित झाले, जेव्हा भारतीय हवाई दलाने 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी आपल्या बँडमध्ये नऊ महिला अग्निवीरवायूचा समावेश केला आणि फ्लाइट लेफ्टनंट अक्षिता धनकर यांनी राष्ट्रपतींसोबत राष्ट्रध्वज फडकवला .
नेतृत्वाच्या शिखरावर महिला : गणवेशातील महिलांनी पार पाडलेल्या नेतृत्वाच्या भूमिका

लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर - भारतीय सैन्यात वरिष्ठ नेतृत्व पदांवर पोहोचणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणजे साधना सक्सेना नायर यांची वैद्यकीय सेवा (लष्कर ) महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे कारण त्या लष्कराच्या वैद्यकीय विभागात हे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यांची नियुक्ती सशस्त्र दलांमधील महत्त्वाच्या निर्णय घेण्याच्या आणि धोरणात्मक नेतृत्व पदांवरील महिलांच्या वाढत्या भूमिकेचे द्योतक आहे.

कर्नल पोनुंग डोमिंग - भारतीय सैन्यातील कर्नल पोनुंग डोमिंग या उत्तरेकडील भागात 15,000 फूट उंचीवर असलेल्या जगातील सर्वात उंचीवरील सीमा कृती दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. 20 वर्षांहून अधिक काळातील सेवेत त्यांच्या नावावर अनेक उल्लेखनीय कामगिरीची नोंद आहे.

स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ या लढाऊ मोहिमांसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या डे-टाइम भारतीय महिला फायटर पायलट होत्या. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात (2021) भाग घेणाऱ्या त्या पहिल्या महिला फायटर पायलट होत्या. त्यांनी 2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या फ्लायपास्टमध्येही भाग घेतला आणि भारतातील प्रतिष्ठित फायटर पायलट क्लबचा भाग बनल्या.

भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर अन्नू प्रकाश यांनी सागरी सुरक्षा आणि संचलनातील आपले कौशल्य प्रदर्शित केले. त्यांच्या सहभागाने भारताच्या विशाल किनारपट्टीचे रक्षण करण्यात आणि प्रादेशिक स्थिरता सुनिश्चित करण्यात महिलांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.

कॅप्टन हंसजा शर्मा - कॅप्टन हंसजा शर्मा यांनी भारतीय सैन्यातील पहिल्या महिला रुद्र हेलिकॉप्टर पायलट बनून इतिहास रचला. 2026 च्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी 251आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रनचे नेतृत्व केले.

सब लेफ्टनंट आस्था पूनिया - सब लेफ्टनंट आस्था पूनिया यांनी 2025 मध्ये पारंपारिकपणे पुरुषप्रधान क्षेत्रात लिंगभेद प्रथा मोडून, नौदल विमानचालनाच्या लढाऊ विमान क्षेत्रात प्रवेश करणारी पहिली महिला पायलट बनून इतिहास रचला. विशाखापट्टणम येथील आयएनएस डेगा येथे दुसऱ्या बेसिक हॉक कन्व्हर्जन कोर्सच्या पदवीदान समारंभात त्यांना प्रतिष्ठित विंग्स ऑफ गोल्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्क्वॉड्रन लीडर अवनी चतुर्वेदी - अवनी चतुर्वेदी परदेशात हवाई युद्ध सरावात भाग घेणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या (IAF) पहिल्या महिला लढाऊ पायलट बनल्या. Su-30MKI पायलट असलेल्या चतुर्वेदी, जपानी हवाई दलाच्या हयाकुरी तळावर जपान एअर सेल्फ-डिफेन्स फोर्स (JASDF) सोबत 16 दिवसांच्या प्रमुख हवाई युद्ध सरावात सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या तुकडीचा भाग होत्या.

स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह - स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह या भारताच्या पहिल्या महिला राफेल पायलट बनल्या. ही कामगिरी भारतीय हवाई दलातील महिलांचे वाढते कौशल्य आणि परिचालन उत्कृष्टता अधोरेखित करते.

विंग कमांडर अंजली सिंग - भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर अंजली सिंग या परदेशी मिशनवर तैनात होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला लष्करी राजनैतिक अधिकारी ठरल्या. रशियातील भारतीय दूतावासात डेप्युटी एअर अटॅची म्हणून त्यांची नियुक्ती हा एक ऐतिहासिक टप्पा होता, जो सशस्त्र दलांमध्ये महिलांचे वाढते नेतृत्व अधोरेखित करतो.

लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए - लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि रूपा ए यांनी नाविका सागर परिक्रमा II मोहिमेअंतर्गत आयएनएसव्ही तारिणीवरून 25,600 सागरी मैलांची जागतिक प्रदक्षिणा पूर्ण करून इतिहास रचला. त्यांचा 238 दिवसांचा प्रवास भारतीय नौदलातील नारी शक्तीचा एक सशक्त दाखला आहे, जो जगातील महासागरांमध्ये महिलांचे साहस, सहनशक्ती आणि वाढते नेतृत्व प्रदर्शित करतो.
पुरस्कार आणि सन्मान
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचा लिंग पुरस्कार - 2025 (लिंग श्रेणी): भारतीय सैन्यातील मेजर स्वाती शांताकुमार यांना दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मिशन (UNMISS) मध्ये सेवा बजावताना "समान भागीदार, चिरस्थायी शांतता" उपक्रमासंदर्भातील त्यांच्या कार्याबद्दल लिंग श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांचा पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये लैंगिकदृष्ट्या संवेदनशील शांतता स्थापना करणे आणि तळागाळातील सहभाग वाढविण्यात त्यांची भूमिका अधोरेखित करतो.
सैन्य दिवस पुरस्कार (जानेवारी 2025) - जानेवारी 2025 मध्ये सैन्य दिवस पुरस्कारांमध्ये, एनसीसीच्या महिला तुकडीला सैन्य दिवस संचलनात सहभागी झाल्याबद्दल प्रथमच सैन्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, जो महिलांच्या वाढत्या भूमिकेची आणि सहभागाची वाढती संस्थात्मक ओळख दर्शवितो.
संयुक्त राष्ट्र संघाची मान्यता (2023, दीर्घकाळ सुरु असलेल्या वारसातील विशेष उल्लेख) - संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाने संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेत भारतीय महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत मेजर राधिका सेन यांना "मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर 2023" म्हणून नामांकित केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाद्वारे मेजर राधिका सेन यांची "मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर 2023"साठी निवड होणे हे संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेत भारतीय महिलांच्या सकारात्मक योगदानाचे प्रमाण आहे.
जागतिक योगदान आणि शांतता मोहिमेतील कामगिरी
जागतिक शांतता राखण्यात लिंग समानतेला चालना देण्याप्रति भारताची वचनबद्धता संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेतील महिला कर्मचाऱ्यांच्या वाढत्या तैनातीमधून दिसून येते. 2025 च्या मध्यापर्यंत, संयुक्त राष्ट्रांच्या सहा शांतता मोहिमांमध्ये 154 हून अधिक भारतीय महिला सेवा कार्यरत आहेत, जे समावेशक सुरक्षा चौकटींना प्रोत्साहन देण्यात देशाची सक्रिय भूमिका अधोरेखित करते. 2028 पर्यंत लष्करी तुकड्यांमध्ये 15% महिला आणि कर्मचारी अधिकारी किंवा निरीक्षक म्हणून 25% महिलांना सहभागी करून घेण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या लिंग समानता धोरणाशी सुसंगत राहून, भारताने कर्मचारी अधिकारी आणि निरीक्षक श्रेणीमध्ये यापूर्वीच 22% प्रतिनिधित्व साध्य केले आहे, जे शांतता मोहिमांमध्ये जागतिक लिंग समावेशन उद्दिष्टांच्या दिशेने अर्थपूर्ण प्रगती दर्शवते.
भविष्यातील मार्गक्रमण
उत्तम प्रशिक्षण आणि अधिक समावेशकतेमुळे, सशस्त्र दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या सुमारे 11,000 पर्यंत वाढली आहे. वाढत्या संधींमुळे झालेली ही वाढ राष्ट्रीय संरक्षणात महिलांचा वाढता सहभाग दर्शवते.
भारतीय सशस्त्र दलांमध्ये महिलांसाठी भविष्यातील मार्गक्रमण निरंतर सुधारणा, नारी शक्ती उपक्रम आणि लिंग समानतेसाठी संस्थात्मक वचनबद्धतेने प्रेरित अशा लक्षणीयरित्या मोठ्या सहभागाकडे निर्देशित करते. राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये रिक्त पदांमधील वाढ, महिलांना इतर पदांवर हळूहळू समाविष्ट करणे आणि समान संधी देणारी धोरणे या माध्यमातून भरतीमध्ये प्रगतीशील विस्तार महिला अधिकाऱ्यांना सेवांमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम बनवेल.
संदर्भ:
पत्र सूचना कार्यालय
संरक्षण मंत्रालय
डीडी न्यूज
परराष्ट्र मंत्रालय
संयुक्त राष्ट्रे
भारतीय नौदल
पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
***
NitinFulluke / SuhsmaKane / SanjanaChitnis / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2241112)
अभ्यागत कक्ष : 29