नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) जागतिक भागीदारीच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब:'आयएसए' वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे प्रतिपादन

Posted On: 12 MAR 2026 2:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 मार्च 2026

केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सौर ऊर्जेला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर मिळणारी चालना आणि जगभरातील स्वच्छ ऊर्जा परिवर्तनाला गती देण्यात आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची भूमिका अधोरेखित केली आहे. 11 मार्च रोजी नवी दिल्ली येथे आयोजित 'आयएसए' वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना मंत्री महोदय म्हणाले की, ही आघाडी सौर ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत विकासाला पुढे नेण्यासाठी सामायिक दृष्टीकोन आणि जागतिक भागीदारीच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे.

120 हून अधिक देशांची युती म्हणून आयएसएचा विस्तार

जोशी यांनी नमूद केले की, सुमारे एक दशकापूर्वी भारत आणि फ्रान्सने सूर्याच्या शक्तीला जागतिक विकासाच्या केंद्रस्थानी ठेवण्याच्या धाडसी संकल्पनेसह एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. ते म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच या संकल्पनेचे रूपांतर जागतिक चळवळीत होण्यास मदत झाली.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने आपल्या हस्तक्षेपांतर्गत निर्माण केलेल्या प्रभावाला अधोरेखित करताना जोशी यांनी नमूद केले की, "गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने सौर ऊर्जेच्या आश्वासनाचे रूपांतर जगभरातील वास्तविक आणि जीवन बदलणाऱ्या प्रभावात करण्यास मदत केली आहे. जिथे सर्वात जास्त गरज आहे तिथे सौर ऊर्जेच्या उपयोजनाला पुढे नेऊन, आयएसए ने जागतिक ऊर्जा परिवर्तनाला उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांकडे वळवण्यात उत्प्रेरक भूमिका बजावली आहे, ज्यामुळे ज्या समुदायांना सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा पोहोचली आहे.

लक्ष्यित हस्तक्षेपांच्या माध्यमातून, आयएसए दररोज लोकांचे जीवन सुधारत आहे. आरोग्य केंद्रांचे सौरऊर्जा आधारित केंद्रांमध्ये रुपांतरण करून अखंड आरोग्य सेवा सुनिश्चित करणे, सौर-ऊर्जेवर चालणारी सिंचन व्यवस्था आणि शीतगृहांद्वारे  शेतकऱ्यांना सक्षम करणे, अन्न सुरक्षा मजबूत करणे आणि शाळा व सार्वजनिक संस्थांपर्यंत स्वच्छ वीज पोहोचवणे. स्टार्टअप्स, तरुण व्यावसायिक आणि नाविन्यपूर्ण परिसंस्थांना मिळत असलेल्या पाठबळामुळे स्वच्छ ऊर्जेच्या भविष्यासाठी नवीन संधी, रोजगार आणि नेतृत्व निर्माण होत आहे.

जसजशी जागतिक सौर ऊर्जा क्षमता विस्तारत आहे आणि स्वच्छ ऊर्जेतील गुंतवणूक ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचत आहे, तसतसे आयएसएचे कार्य हे सिद्ध करते की ऊर्जा परिवर्तन हे सर्वसमावेशक, लोककेंद्रित आणि परिवर्तनीय असू शकते. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी च्या स्थापना दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्लीचा अध्यक्ष असलेला भारत देश, केवळ साध्य केलेल्या प्रगतीचाच उत्सव साजरा करत नाही, तर लाखो लोकांच्या उंचावलेल्या जीवनमानाचा गौरव करतो आणि सूर्याच्या शक्तीद्वारे पोहोच, लवचिकता आणि संधींचा विस्तार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची निर्मिती भारतीय तत्त्वज्ञान 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच संपूर्ण जग हे एकच कुटुंब आहे  या धारणेवर आधारित आहे आणि स्वच्छ ऊर्जेचे फायदे समान रितीने विभागले जावेत यासाठी एकत्रितपणे काम करणाऱ्या राष्ट्रांची भावना त्यातून दिसून येते.

या आघाडीच्या वाढीवर प्रकाश टाकताना जोशी म्हणाले की, एक शक्तिशाली दृष्टीकोन म्हणून सुरू झालेली ही आघाडी आज 120 हून अधिक देशांच्या आघाडीत रूपांतरित झाली आहे आणि जागतिक सौर संक्रमणाला गती देण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे.

भारताची सौर ऊर्जा वृद्धी मजबूत धोरणात्मक वचनबद्धतेचा प्रभाव दर्शवते

भारताच्या स्वतःच्या प्रगतीचा संदर्भ देत नूतन आणि नवीकरणीय ऊर्जामंत्री म्हणाले की, देशाची स्थापित सौर ऊर्जा क्षमता सुमारे 136 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे, जी भारताच्या एकूण नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेच्या जवळपास निम्मी आहे. त्यांनी नमूद केले की, ही वाढ सातत्यपूर्ण धोरणात्मक वचनबद्धता आणि नाविन्यपूर्ण उपक्रम काय साध्य करू शकतात याचे निदर्शक आहे.

प्रल्हाद जोशी  यांनी पुढे अशा प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकला जे सौर ऊर्जेचे फायदे थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम ठरत आहेत. 'पीएम सूर्य घर: मोफत बिजली योजना' सारखे कार्यक्रम लाखो कुटुंबांना त्यांची स्वतःची स्वच्छ वीज निर्माण करण्यास सक्षम करत आहेत, तर 'पीएम-कुसुम' (PM-KUSUM) योजना सौर-ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करत आहे.

जागतिक सौर ऊर्जेचा विस्तार वेगाने होत आहे

जोशी यांनी सौर ऊर्जेच्या मागे असलेल्या उल्लेखनीय जागतिक गतीकडे देखील लक्ष वेधले. त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, जगाला पहिली 1,000 गिगावॅट सौर क्षमता स्थापित करण्यासाठी सुमारे पंचवीस वर्षे लागली, मात्र पुढची 1,000 गिगावॅट क्षमता त्यापेक्षा कितीतरी वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, जे जागतिक ऊर्जा परिवर्तनातील एका नवीन युगाचे संकेत आहे.

स्वच्छ उर्जा संक्रमणाचा केंद्रबिंदू आता ग्लोबल साऊथकडे सरकत आहे. त्या भागातील उर्जेची वाढती मागणी तसेच मुबलक सौर संसाधने उपलब्ध असल्यामुळे पारंपरिक उर्जा मार्गांच्या पलीकडे झेप घेण्याची अभूतपूर्व संधी उपलब्ध झाली आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी अधिक भर दिला.

या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ही सौर क्षेत्राच्या वापराचा विस्तार करून शाश्वत विकासासाठी नव्या संधींची दारे खुली करण्यासाठी सरकारे, विकासातील भागीदार, वित्तीय संस्था तसेच खासगी क्षेत्र यांना एकत्र आणणारा वैशिष्ट्यपूर्ण मंच म्हणून उदयाला आला आहे.

भविष्यकालीन उर्जा प्रणालींना आकार देण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञाने

केंद्रीय मंत्री जोशी पुढे म्हणाले की उर्जा स्थित्यंतर आता एका अशा नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. जेथे डिजिटल तंत्रज्ञाने आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे घटक अधिकधिक महत्वाची भूमिका बजावणार आहेत. अधिक स्मार्ट आणि जास्त लवचिक उर्जा यंत्रणा उभारण्यासाठी नवोन्मेषाचा वापर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या उर्जेसाठी एआय या जागतिक मोहिमेला पुढे नेण्यात आयएसएच्या नेतृत्वाला त्यांनी अधोरेखित केले.  

भाषण संपवताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, सौर स्थित्यंतर हे केवळ ऊर्जेशी संबंधित नाही तर ते जगभरात विकास, लवचिकता आणि समृद्धीसाठीच्या संधी निर्माण करण्याशी संबंधित आहे.

केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालय सचिव संतोष कुमार सारंगी यांनी त्यांच्या भाषणात सांगितले, “सौर उर्जा ही खऱ्या अर्थाने आपल्या काळातील एक सर्वात मौल्यवान सार्वजनिक हिताची बाब म्हणून उदयाला आली आहे, ही अशी मुबलक आणि परोपकारी शक्ती आहे जिचा अनेक देश त्यांच्या जनतेच्या सामुहिक कल्याणासाठी अधिकाधिक प्रमाणात वापर करू लागले आहेत.”

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक आशिष खन्ना यांनी सांगितले, “आज ही आघाडी, जगातील सर्वात मुबलक उर्जा स्त्रोत सर्वात संवैधानिक देखील असला पाहिजे असा विश्वास असणाऱ्या 125 सदस्य आणि स्वाक्षरीधारक देशांच्या जागतिक युतीमध्ये विकसित झाली आहे.”

ते पुढे म्हणाले की आयएसए यापुढेही नम्रता आणि हेतूसह कार्यरत राहील आणि आपल्या सदस्य देशांना या क्षेत्रातील गतिमानता, विस्तारित उर्जा उपलब्धता, सशक्त उपजीविका आणि सामायिक समृद्धी अशा दृश्य परिणामांमध्ये परिवर्तीत करण्यासाठी पाठबळ देत राहील. आपण सर्वजण एकत्र येऊन सूर्यप्रकाशाचे सर्वांसाठी संधी, लवचिकता आणि प्रगतीच्या रुपात परिवर्तन करत राहूया.  

हरित हायड्रोजन तसेच उर्जा साठवण विषयक उपाययोजनांच्या क्षेत्रात आघाडीवर कार्यरत असलेल्या नाविन्यपूर्ण स्टार्ट अप्स निश्चित करून त्यांना मदत करण्यासाठी या प्रसंगी आयएसएचे हरित हायड्रोजन आणि साठवण स्पर्धा 2026 ची घोषणा करण्यात आली.

यासोबतच, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने सदस्य देश आणि भागीदारांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने एक नवे, सुधारित संकेतस्थळ देखील सुरु केले. हा सुधारित मंच आघाडीचे कार्य आणि परिणाम यांच्या दिशेने नेणारा अधिक अनोखा आणि वापरकर्ता केंद्रित मार्ग बनून ज्ञान, कार्यक्रम आणि संधींची उपलब्धता मजबूत करेल, भागधारकांचा सहभाग सुधारेल तसेच आयएसएच्या विस्तारत जाणाऱ्या पोर्टफ़ोलिओचे आणि जागतिक महत्त्वाकांक्षांचे दर्शन घडवेल.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडी विषयी थोडक्यात माहिती

जागतिक सौर क्रांती आता अभूतपूर्व गती घेत आहे. या वेगातून, अधिक स्वच्छ आणि अधिक शाश्वत उर्जा प्रणालींच्या दिशेने होत असलेल्या जगाच्या स्थित्यंतरात सौर उर्जेचे वाढते केंद्रीकरण दिसून येते. जगभरात सौर उर्जेच्या वापराचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार, विकास संस्था, उद्योगक्षेत्र आणि गुंतवणूकदार यांच्यातील भागीदारीला चालना देऊन आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए) या स्थित्यंतरात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष 2015 मध्ये पॅरिस येथे झालेल्या कॉप21 हवामानविषयक परिषदेदरम्यान भारत आणि फ्रान्स या देशांनी संयुक्तपणे या आघाडीची सुरुवात केली होती.

जेथे उर्जेच्या उपलब्धतेचा विस्तार करण्यात, उपजीविका सशक्त करण्यात आणि लवचिकता वाढवण्यात सौर उर्जा परिवर्तनकारी भूमिका बजावू शकेल अशा आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका यामधील देशांना तसेच लहान बेटस्वरूपी विकसनशील देशांना मदत करण्यावर आयएसए विशेष भर देते.


नेहा कुलकर्णी /शैलेश पाटील /संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2238838) अभ्यागत कक्ष : 14