विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वैद्यक क्षेत्रातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील 26 तरुण व्यावसायिकांना केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते पुरस्कार

Posted On: 05 MAR 2026 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2026

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान विभाग (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अवकाश विभागांचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते वैद्यक क्षेत्रातील विविध शाखांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील 26 तरुण व्यावसायिकांना आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारप्राप्त तरुण ऑन्कोलॉजी, पेडियाट्रिक्स, एंडोक्राइनोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, आपत्कालीन वैद्यकशास्त्र इत्यादी शाखांमध्ये कार्यरत आहेत.

हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या माध्यम संस्थेचे कौतुक करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मिळणारा पुरस्कार हा उशिराने मिळणाऱ्या पुरस्कारापेक्षा अधिक प्रेरणादायी ठरतो, या पुरस्कारामुळे विजेत्या डॉक्टरांना आपली ओळख निर्माण करता येईल.

डॉक्टरांना कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात सन्मानित करणे हे देशातील आरोग्यसेवा व्यवस्थेचे भविष्य बळकट करण्यासाठी महत्त्वाचे आहे, असे सांगून मंत्री म्हणाले, जडणघडणीच्या काळात प्रोत्साहन मिळाले तर वैद्यकीय व्यावसायिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यासाठी आणि वेगाने बदलणाऱ्या वैद्यक क्षेत्रात आपले ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवण्यास प्रेरित होतील.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी वैद्यक व्यवसायाच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. नवीन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आरोग्यसेवा क्षेत्रात क्रांतिकारी बदल होत आहेत, तंत्रज्ञानामुळे रोगाचे निदान आणि उपचार करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा झाली आहे; तरीदेखील रुग्णसेवेत डॉक्टरांचा अनुभव व त्यातून होणारे आकलन महत्त्वाचे ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

या पुरस्कार विजेत्यांमधील अनेक जण त्यांच्या कारकीर्दीत मैलाचे टप्पे गाठतील आणि भविष्यात वैद्यक क्षेत्रातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्याकरता पुन्हा इथे येतील, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

सुषमा काणे/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2235531) अभ्यागत कक्ष : 62