पंतप्रधान कार्यालय
भारत-कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी परिषदेतील पंतप्रधानांच्या सीईओ फोरम मधील भाषणाचा मजकूर
Posted On:
02 MAR 2026 12:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2026
माननीय पंतप्रधान मार्क कार्नी, दोन्ही देशांतील व्यावसायिक नेते, मान्यवर स्त्री - पुरुषहो, नमस्कार!
भारत-कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) परिषदेमध्ये आपणा सर्वांशी संवाद साधताना मला अत्यंत आनंद होत आहे. आपले सकारात्मक विचार मांडल्याबद्दल मी पंतप्रधान कार्नी यांचे विशेष आभार मानतो.
मित्रहो,
आज आपण भारत-कॅनडा संबंधांमध्ये एक नवीन अध्याय लिहिणार आहोत. पंतप्रधान कार्नी यांचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, परंतु आपल्या संबंधांनी जणू एका प्रकाशवर्षाची झेप घेतली आहे. गेल्या काही महिन्यांत विश्वास वाढला आहे, स्पष्टता आली आहे आणि नवीन गती निर्माण झाली आहे. हे सर्व त्या काळात घडत आहे, जेव्हा जग आर्थिक अनिश्चिततेच्या टप्प्यातून जात आहे आणि जागतिक आर्थिक व्यवस्था दबावाखाली आहे. अशा वेळी भारत आणि कॅनडातील व्यावसायिक नेत्यांचे हे चिंतन आपल्या भागीदारीचा नवीन आराखडा तयार करेल. आपणा सर्वांच्या दृष्टीकोन आणि बांधिलकीचे मी अभिनंदन करतो.
मित्रहो,
भारत आणि कॅनडा ही सशक्त लोकशाही राष्ट्रे आहेत, जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत आणि समान मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था आहेत. लोकशाही, विविधता आणि विकास ही तत्त्वे आपल्याला नैसर्गिक भागीदार म्हणून पुढे जाण्यास प्रेरित करतात. आज पंतप्रधान कार्नी आणि मी आपल्या सामायिक दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आपण द्विपक्षीय व्यापार 50 बिलियन डॉलरच्या स्तरावर नेण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. व्यापक आर्थिक भागीदारी करार लवकरात लवकर अंतिम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
परंतु मित्रहो,
सरकार चौकट तयार करू शकतात, धोरणात्मक दिशा देऊ शकतात; परंतु त्या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात उतरवण्याची शक्ती आपणा सर्वांकडे आहे.
मित्रहो,
आज भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. या परिवर्तनामागे मजबूत देशांतर्गत मागणी, तरुण लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक आणि डिजिटल तंत्रज्ञानाची ताकद आहे. हे आपल्या सातत्यपूर्ण सुधारणांच्या प्रवासाचे फलित आहे. धोरण सुलभीकरणापासून उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनांपर्यंत, रसद व्यवस्थापन आधुनिकीकरणापासून कर आणि दिवाळखोरी सुधारणा उपायांपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपण व्यवसाय सुलभतेला बळकट करत आहोत.
मित्रहो,
भारत आणि कॅनडा एकत्र उभे राहतात तेव्हा आपण केवळ दोन अर्थव्यवस्था जोडत नाही, तर भांडवल आणि कौशल्य यांची एक आर्थिक शक्ती निर्माण करतो. आपली एकत्रित जीडीपी 6 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक आहे. परंतु आपली खरी ताकद आपल्या महत्त्वाकांक्षांमध्ये आहे. या सामायिक महत्त्वाकांक्षांना पुढे नेण्यासाठी मी काही सूचना मांडतो.
पहिले, स्वच्छ ऊर्जा. ही दोन्ही देशांची प्राथमिकता आहे. आज आपण अणुऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी आणि युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. थोड्याच वेळापूर्वी आम्हाला कॅमेकोच्या सीईओचे सकारात्मक विचार ऐकण्याची संधी मिळाली. लघु घटकाधारित अणुभट्ट्या, प्रगत अणुभट्ट्या आणि अणुऊर्जा मूल्यसाखळीमध्ये आपण एकत्र पुढे जावे. महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात सक्षम पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी आपण पावले उचलली आहेत. बॅटरी आणि ऊर्जा साठवण क्षेत्रात कॅनडाची नवकल्पना आणि भारताची विस्तार क्षमता एकत्र आणू शकतो.
दुसरे क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि भांडवली भागीदारी. या वर्षीच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 130 बिलियन डॉलरची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय पायाभूत सुविधा आराखड्यांतर्गत 1.3 ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक होत आहे. कॅनडाच्या निवृत्ती वेतन कोषांनी भारतात 100 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे, जे परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. भारताच्या पायाभूत सुविधा विकासकथेत सहभागी होण्यासाठी मी आपले स्वागत करतो.
तिसरे, कृत्रिम बुद्धिमत्ता. आपण संयुक्त एआय संगणन मार्गिका निर्माण करू शकतो. स्टार्टअपसाठी एआय नवकल्पना चाचणी परिसंस्था तयार करू शकतो.
चौथे, उत्पादन आणि तंत्रज्ञान. इलेक्ट्रॉनिक, विमानन आणि अवकाश क्षेत्र आणि अभियांत्रिकी क्षेत्रात कॅनडाचे तंत्रज्ञान आणि भारताचा विस्तार एकत्र आणून जागतिक मूल्यसाखळ्या बळकट करू शकतो.
पाचवे, अन्न प्रक्रिया उद्योग. आज भारतात मेगा फूड पार्क, शीतसाखळ्या आणि अन्न परीक्षण प्रयोगशाळा वेगाने उभारल्या जात आहेत. हेही आपल्या परस्पर हितकारक सहकार्याचे एक सक्षम उदाहरण ठरू शकते.
मित्रहो,
आपली भागीदारी केवळ राष्ट्रीय राजधानींपुरती मर्यादित राहू नये; ती राज्ये आणि प्रांतांपर्यंत नेली पाहिजे. अल्बर्टाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीला गुजरात आणि राजस्थानच्या अक्षय ऊर्जा महत्त्वाकांक्षांशी जोडले पाहिजे. ओंटारियोची उत्पादनक्षमता तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील औद्योगिक समुहांसोबत एकत्र केली पाहिजे. मॉन्ट्रियलच्या तंत्रज्ञान परिसंस्थेला बेंगळुरू आणि हैदराबादच्या नवकल्पना केंद्रांशी एकत्रित केले पाहिजे. तेव्हाच आपण धोरणाला समृद्धीत रूपांतरित करू शकू.
मित्रहो,
आपल्यापैकी काही जण क्रिकेट पाहत असतील. भारतात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट विश्वचषकात कॅनडाला खेळताना पाहून आम्हा सर्वांना आनंद झाला. “जसे टी-20 क्रिकेटमध्ये जलद निर्णय, निर्भय फटके आणि सामना जिंकणाऱ्या भागीदाऱ्या असतात, तसेच भारत आणि कॅनडा एकत्रितपणे भविष्य घडवतील.” या संकल्पासह मी आपणा सर्वांना भारताच्या विकास प्रवासात सहभागी होण्याचे आमंत्रण देतो.
खूप-खूप धन्यवाद.
अंबादास यादव/नितीन गायकवाड/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234888)
अभ्यागत कक्ष : 30
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam