वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि इस्रायल मधील मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींसंबंधी चर्चेच्या पहिली फेरीचा नवी दिल्लीत यशस्वी समारोप
Posted On:
26 FEB 2026 10:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026
भारत आणि इस्रायल मधील मुक्त व्यापार कराराच्या (FTA) वाटाघाटींसंबंधी चर्चेची पहिली फेरी 23 ते 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नवी दिल्लीत पार पडली. आज या चर्चेच्या फेरीचा यशस्वी समारोप झाला. नोव्हेंबर 2025 मध्ये या कराराबाबतच्या संदर्भ अटींवर (ToR) स्वाक्षरी करण्यात आली होती. यामुळे व्यापार आणि आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी निश्चित केलेल्या क्षेत्रांच्या संदर्भात चर्चेसाठी एक संरचित आराखडा उपलब्ध झाला आहे.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौर्यात पंतप्रधानांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी जेरुसलेममधील नेसेटच्या (इस्रायलची संसद) विशेष अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील व्यापाराची अफाट क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्याचे आवाहन केले.
या वाटाघाटींच्या दरम्यान, 24 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इस्रायलच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. व्यापार, नवोन्मेष आणि विकासाच्या नवीन संधीचा शोध घेण्यासाठी दोन्ही देशांनी घनिष्ठतेने काम करावे, यामुळे दोन्ही देशांमधील भागीदारी अधिक दृढ होईल, असे ते म्हणाले.
या चार दिवसीय वाटाघाटी विषयक चर्चेदरम्यान दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी माल व्यापार, सेवा क्षेत्रातील व्यापार, रूल्स ऑफ ओरिजिन (मूळ देशासंबंधीचे नियम), सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी उपाययोजना (SPS), व्यापारातील तांत्रिक अडथळे (TBT), सीमाशुल्क प्रक्रिया, बौद्धिक मालमत्ता अधिकार, डिजिटल व्यापार आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर तसेच रचनात्मक आणि भविष्यवेधी दृष्टिकोनातून चर्चा केली. याअंतर्गत दोन्ही देशांनी सर्वसमावेशक, समतोल साधणाऱ्या आणि परस्पर लाभदायक ठरेल असा करार करण्याचे उद्दिष्ट अधोरेखित केले.
दोन्ही देशांनी प्रत्यक्ष बैठका होण्यादरम्यानच्या मधल्या काळात आभासी पद्धतीने संवाद सुरू ठेवण्यावर सहमती व्यक्त केली. आता प्रत्यक्ष वाटाघाटींची पुढची फेरी मे 2026 मध्ये इस्रायलमध्ये आयोजित केली जाणार आहे.
आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय माल व्यापार अंदाजे 3.62 अब्ज अमेरिकी डॉलर इतका राहिला आहे. प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि इस्रायलमधील उद्योगांसाठी एक स्थिर आणि आश्वासक आराखडा उपलब्ध होणार आहे. हा करार व्यापार वृद्धीसाठी एक मोलाची संधी उपलब्ध करून देणारा ठरणार आहे.
सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233331)
अभ्यागत कक्ष : 9