आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये “इनोव्हेशन टू इम्पॅक्ट: एआय अ‍ॅज अ पब्लिक हेल्थ गेम-चेंजर” या विषयावरील सत्रात सहभाग घेतला, सार्वजनिक आरोग्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची परिवर्तनकारी भूमिका केली अधोरेखित


भारतासाठी ए आय म्हणजे केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे तर सर्वसमावेशक बुद्धिमत्ता आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण देत अनुप्रिया पटेल यांनी केले प्रतिपादन

कृत्रिम बुद्धिमत्तेचा आरोग्यसेवेवरील परिणाम मानवी जीवनावरील त्याचा प्रभाव आणि आरोग्य असमानता कमी करण्यातील त्याच्या भूमिकेनुसार मोजला पाहिजे : अनुप्रिया पटेल.

एआय हे डॉक्टरांची जागा घेण्यासाठी नाही, तर त्यांना सक्षम करण्यासाठी आहे; त्यामुळे डॉक्टरांना गुंतागुंतीच्या उपचारांवर लक्ष केंद्रीत करता येते : केंद्रीय राज्यमंत्री

एआय चा सर्वात मोठा प्रभाव आरोग्य क्षेत्रावर होईल, रॉय जेकब्स, रॉयल फिलिप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत असलेली मजबूत डिजिटल आरोग्य पायाभूत सेवा ही एआय च्या संपूर्ण क्षमतेचा वापर करण्याची गुरुकिल्ली आहे : रॉयल फिलिप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी

Posted On: 17 FEB 2026 4:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये “इनोव्हेशन टू इम्पॅक्ट: एआय अ‍ॅज अ पब्लिक हेल्थ गेम-चेंजर” या विषयावरील सत्रात भाग घेतला.या सत्रात सार्वजनिक आरोग्य परिणामांना पुढे नेण्यात आणि भारताच्या आरोग्यसेवा वितरण प्रणालींना बळकटी देण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनकारी भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी त्यांच्या भाषणात धोरणकर्ते, आरोग्यसेवा नेते, तंत्रज्ञान तज्ञ, संशोधक आणि उद्योगातील भागधारकांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतासाठी एआय म्हणजे केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता नाही तर सर्वांसाठी समावेशक बुद्धिमत्ता होय, असे त्या म्हणाल्या. ज्यावेळी भारत आरोग्यक्षेत्रातील एआय च्या भूमिकेबद्दल बोलत असतो तेव्हा ते केवळ काही प्रगत अल्गोरिदम किंवा अचूकतेच्या आश्वासनापुरते मर्यादित नसून, तंत्रज्ञान लोकांच्या जीवनाला कितपत स्पर्श करते आणि देशभरातील आरोग्यविषयक असमानता कितपत कमी करते, यावरुन  त्याचे मूल्यांकन केले जाते, यावर पटेल यांनी भर दिला.

भारत विकसित भारत 2047 च्या संकल्पाकडे वाटचाल करत असताना आरोग्य हा विकासाचा एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयाला आला आहे. भारताची विशाल लोकसंख्या, ग्रामीण आणि शहरी भाग, तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग असा दुप्पट भार एक वैशिष्ट्यपूर्ण आव्हान उभे करतो. अशा स्थितीत तंत्रज्ञान, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक सक्षम करणारे अत्यावश्यक साधन ठरते, असे त्या म्हणाल्या.

एआयने रोग निरीक्षण आणि प्रतिबंध पासून निदान आणि उपचारांपर्यंत आरोग्यसेवेच्या परिघाला व्यापले आहे, असे त्या म्हणाल्या. त्यांनी मीडिया डिजीज सर्व्हिलन्स सिस्टम चा विशेष उल्लेख करुन सांगितले की, हे एक एआय-सक्षम साधन आहे जे 13 भाषांमध्ये रोगांचे कल मॉनिटर करते, रिअल-टाइम अलर्ट निर्माण करते आणि एखाद्या साथीच्या प्रादुर्भावाच्या विरोधातील तयारी आणखी सक्षम करते. या प्रणालीवरुन भारताच्या रोग नियंत्रण प्रयत्नातील एआय चा वाढता वापर आणि देखरेख क्षमता वाढवण्यातील भूमिका अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एक आरोग्य अभियानाअंतर्गत जीनोमिक देखरेखीसाठी एआय वर आधारित उपकरणे सुरू केली असून त्या माध्यमातून प्राण्यांपासून मानवांमध्ये संक्रमण होण्यापूर्वीच संभाव्य झुनोटिक उद्रेकाचा अंदाज घेणे शक्य आहे, असे पटेल म्हणाल्या. अशा प्रकारच्या पूर्वानुमान क्षमता प्रतिबंधात्मक सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात एक आदर्श बदल दर्शवतात यावर त्यांनी भर दिला.

याशिवाय क्षयरोगासाठी, एआय आधारित हातात धरण्यायोग्य एक्सरे मशिन्स आणि संगणकावर चालणाऱ्या शोध साधनांचा वापर यावर देखील त्यांनी भर दिला. या साधनांमुळे प्रगत निदान यंत्रणा समुदायाला सहज प्राप्त होणे शक्य झाले आहे, असे त्या म्हणाल्या. या नवनवीन शोधांमुळे क्षयरोगाची सुमारे 16 टक्के अतिरिक्त प्रकरणे शोधण्यात मदत झाली आहे. तसेच, एआय-आधारित साधनांनी संभाव्य प्रतिकूल क्षयरोग उपचार परिणामांचा अंदाज लावल्यामुळे नकारात्मक उपचार परिणामांमध्ये 27 टक्के घट करण्यात  मदत झाली असून, भारतातील क्षयरोगविरोधी लढ्याला सामर्थ्य प्राप्त झाले आहे. 

विस्तारक्षमता आणि उपचारांचा किफायतशीरपणा यावर भर देत पटेल यांनी सांगितले की भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या, साधनांच्या मर्यादा असलेल्या ठिकाणी, उपाययोजना विस्तारक्षम, किफायतशीर आणि प्रणालीगत तफावत भरून काढण्यात  सक्षम असाव्यात. केंद्र सरकारने आरोग्यसेवांसाठी एक भक्कम एआय परिसंस्था उभारण्याच्या दिशेने अतिशय सक्रियपणे प्रयत्न केले असून सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवठ्यामध्ये जागतिक दर्जाच्या एआय कौशल्याचा समावेश करण्यासाठी एम्स दिल्ली, पीजीआयएमईआर चंदीगड आणि एम्स ऋषिकेश येथे एआयसाठी तीन उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणे इत्यादी उपक्रमांचा त्यात समावेश आहे, असे पटेल यांनी सांगितले. 

तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की एआय आपल्याला वृद्धी आणि सहाय्य करण्यासाठी उपलब्ध आहे, डॉक्टरांची जागा घेण्यासाठी नाही. डॉक्टरांवरचा नियमित आणि उच्च-तीव्रतेच्या कामांचा भार कमी करून डॉक्टरांना अधिक गुंतागुंतीच्या उपचारांवर लक्ष केंद्रीत करता येते आणि गंभीर क्लिनिकल निर्णय घेण्यास लागणारा अधिक वेळ मिळू शकतो.

“वैद्यकशास्त्र हे केवळ एक विज्ञान नाही; ती एक कला देखील आहे,” असे त्यांनी नमूद केले. आरोग्यसेवा केवळ अल्गोरिदमवरच आधारित नसून ती मानवी स्पर्श, सहानुभूती, करुणा आणि संवादातूनच भरभराटीला येते - ही अशी वैशिष्ट्ये आहेत जी यंत्राद्वारे कधीही आत्मसात केली जाऊ शकत नाहीत आणि जी नेहमीच वैद्यकीय व्यावसायिकांचे कार्यक्षेत्र राहतील.

भविष्यासाठी सज्ज असलेले आरोग्यसेवा व्यावसायिक एआय-साक्षर असले पाहिजेत, यावर आपल्या भाषणाच्या समारोपात मंत्र्यांनी भर दिला. या संदर्भात, त्यांनी नमूद केले की नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस’ने अलीकडेच आरोग्यसेवेमधील कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील एक ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे जेणेकरून देशभरातील डॉक्टरांना आवश्यक डिजिटल क्षमतांनी सुसज्ज करण्यात येणार असून, तंत्रज्ञान आधारित भविष्याचा सामना करण्यासाठी भारताचे वैद्यकीय कार्यबळ सज्ज राहिल याची खात्री करण्यात येत आहे. 

शिखर परिषदेला संबोधित करताना, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) प्रो. व्ही.के. पॉल यांनी अधोरेखित केले की कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या आरोग्यसेवा व्यवस्थेत अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि सर्वांसाठी आरोग्य कवच या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करण्यासाठी एक धोरणात्मक संधी आहे. भारताची व्यापक लोकसंख्या, विविधता तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचे दुहेरी ओझे लक्षात घेता, सेवा वितरण बळकट करण्यासाठी आणि आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आधारित आणि पुराव्यावर आधारित उपयोजना आवश्यक आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता प्राथमिक आरोग्यसेवेत लक्षणीय सुधारणा करू शकते, लवकर निदान सक्षम करू शकते, रोग निरीक्षण प्रणाली मजबूत करू शकते आणि डेटा-आधारित धोरण तयार करण्यास मदत करू शकते, हे त्यांनी अधोरेखित केले. भारताच्या वाढत्या डिजिटल सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांशी कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकत्रीकरण केल्याने आरोग्य व्यवस्थेत परस्परसंवादक्षम प्रणाली, रिअल-टाइम विश्लेषण आणि अधिक कार्यक्षम संसाधन वाटप सुनिश्चित होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रो.पॉल यांनी सुरक्षितता आणि सार्वजनिक विश्वास राखण्यासाठी मजबूत नियामक चौकटी, नैतिक संरक्षणात्मक उपाय आणि सातत्यपूर्ण प्रमाणीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सरकार, शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यात सातत्यपूर्ण सहकार्याचे आवाहन केले, ज्यायोगे व्यापक स्तरावर परिणामकारक, परवडणारी आणि स्वदेशी उपायोजना विकसित करता येईल. 

या कार्यक्रमात बोलताना, रॉयल फिलिप्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रॉय जेकोब्स यांनी सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्तेचा आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सर्वात मोठा प्रभाव पडेल. वाढती मागणी, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि काळजीची वाढती जटिलता यामुळे जगभरातील आरोग्य प्रणाली प्रचंड दबावाखाली असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले. ज्यामुळे एआयचे एकत्रीकरण केवळ संधीच नाही तर एक गरज बनली आहे, असे ते म्हणाले.

केवळ कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्यसेवेत बदल करू शकत नाही; त्याला मजबूत डेटा प्रशासन, अखंड डेटा व्यवस्थापन आणि मजबूत क्लिनिकल एकात्मता यांनी पाठिंबा दिला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. "तंत्रज्ञान हे क्लिनिकल गरजा आणि कार्यप्रवाहांशी सुसंगत असले पाहिजे," असे त्यांनी नमूद केले. अर्थपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता तैनातीसाठी गुणवत्तापूर्ण डेटा, परस्परसंवादक्षमता आणि स्पष्टपणे परिभाषित वापर प्रकरणे आवश्यक आहेत हे त्यांनी अधोरेखित केले.

आरोग्यसेवा विश्वासावर चालते आणि म्हणूनच क्लिनिकल आत्मविश्वास आणि रुग्णांची सुरक्षितता राखण्यासाठी  कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली पारदर्शक, स्पष्टीकरणात्मक आणि सतत प्रमाणित केली पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला.

भारताच्या डिजिटल आरोग्य उपक्रमांचे कौतुक करताना त्यांनी नमूद केले की, आयुष्मान भारत योजनेसारखे कार्यक्रम लोकसंख्येच्या स्तरावर परस्परसंवादक्षम डेटा प्रणाली आणि सातत्यपूर्ण उपचार सेवा यासाठी भक्कम पाया घालत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेला परिणामकारक आणि शाश्वत प्रभाव निर्माण करण्यासाठी अशाच पायाभूत सुविधांची आवश्यकता असते.  

भारतात विकसित झालेली उपाययोजना आता जागतिक स्तरावर अमलात आणली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. मोठ्या प्रमाणावर विविध रूपात आणि गुंतागुंतीत विकसित झालेली तंत्रज्ञान उपाययोजना अधिक लवचिक आणि अनुकलनीय ठरतात हे त्यांनी स्पष्ट केले. सहयोगी नवोपक्रमासाठी रॉयल फिलिप्सच्या वचनबद्धतेची पुष्टी करताना, जेकोब्स यांनी विश्वास व्यक्त केला की सरकार आणि उद्योग क्षेत्रांमधील भागीदारी एआय-आधारित परिवर्तनाला गती देईल आणि जागतिक स्तरावर आरोग्य परिणाम सुधारेल.

एकूणच चर्चेत असे दिसून आले की जर कृत्रिम बुद्धिमत्ता जबाबदारीने, नैतिकतेने आणि मोठ्या प्रमाणात तैनात केली गेली तर ती सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात एक परिवर्तनकारी शक्ती ठरू शकते. प्रायोगिक प्रकल्पांच्या पलीकडे जाऊन प्रणालीस्तरावर एआय चे एकत्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे सर्व वक्त्यांनी नमूद केले. त्यासाठी परस्परसंवादक्षम डिजिटल पायाभूत सुविधा, मजबूत नियामक चौकटी आणि सार्वजनिक खाजगी सहकार्य अनिवार्य आहे, यावरही त्यांनी भर दिला.  

एआय रोग निरीक्षण, निदान, क्लिनिकल निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि आरोग्य प्रणालीची कार्यक्षमता लक्षणीयरित्या सुधारू शकते; मात्र ती वैद्यकीय व्यावसायिकांची जागा घेण्यासाठी नव्हे तर त्यांना सक्षम करण्यासाठी आहे, हे या चर्चासत्रात अधोरेखित करण्यात आले. सत्राचा समारोप कृत्रिम बुद्धिमत्तेला सर्वसमावेशक, विस्तारक्षम आणि रुग्णकेंद्रीत उपाय म्हणून स्वीकारण्याच्या सामूहिक बांधिलकीने झाला, जेणेकरून भारतातील गुंतागुंतीच्या आरोग्य आव्हानांना सामोरे जाता येईल आणि जागतिक आरोग्य सक्षमता अधिक बळकट करता येईल. 


नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2229153) अभ्यागत कक्ष : 13