इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नैतिक, समावेशक आणि जबाबदार ए आय वापराला प्रोत्साहन देण्यासाठी 16-17 फेब्रुवारी 2026 रोजी देशव्यापी डिजिटल मोहीम

Posted On: 15 FEB 2026 1:14PM by PIB Mumbai


नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये 'इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट 2026' च्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे (MeitY), 'इंडिया ए आय मिशन' अंतर्गत इंटेल इंडियाच्या सहकार्याने 16 फेब्रुवारी 2026 (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 8:00 वाजल्यापासून) एक देशव्यापी मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत “24 तासांत कृत्रिम बुद्धिमत्ता  (ए आय) जबाबदारी मोहिमेसाठी मिळालेली सर्वाधिक प्रतिज्ञापत्रे” या श्रेणीत अधिकृत 'गिनीज विश्व विक्रम' प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जाईल. या मोहिमेचा मुख्य उद्देश देशातील नागरिकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए आय) नैतिक, समावेशक आणि जबाबदार वापरासाठी वचनबद्ध करणे हा आहे. याद्वारे विश्वासार्ह आणि मानवकेंद्रित ए आय परिसंस्था निर्माण करण्याच्या भारताच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला जाईल.
डिजिटल प्रतिज्ञा   http://aipledge.indiaai.gov.in/ येथे उपलब्ध असेल. ही मोहीम परस्परसंवादी आणि जनजागृतीवर आधारित असून, यामध्ये सहभागींना औपचारिक प्रतिज्ञा घेण्यापूर्वी काही काल्पनिक परिस्थितींवर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील, जेणेकरून ते जबाबदार ए आय पद्धतींबाबत विचार करू शकतील. प्रतिज्ञा  पूर्ण केल्यानंतर, सहभागींना 'इंडिया एआय' आणि 'इंटेल इंडिया' कडून संयुक्तपणे डिजिटल सन्मान पदक प्राप्त होईल, तसेच सरकारद्वारे संचालित ए आय शिक्षण अभ्यासक्रमांची माहिती देखील मिळेल.
ही मोहीम सर्व क्षेत्रांतील आणि वयोगटातील लोकांसाठी सुलभ असेल अशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी मायक्रोफोन किंवा कॅमेरा परवानगीची आवश्यकता नाही तसेच कोणत्याही पात्रता परीक्षा किंवा गुणांची अट नाही.
सहभागाची प्रक्रिया:
खालील पायऱ्यांचे अनुसरण करून सहभागी होता येईल:

अधिकृत प्रतिज्ञा पोर्टलला भेट द्या.
सामान्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
ओ टी पी (ईमेल आयडी किंवा फोन नंबर) द्वारे पडताळणी करा.
ए आय जागरूकता संदर्भातील संक्षिप्त परिस्थिती-आधारित प्रश्नांची उत्तरे द्या.
औपचारिक 'ए आय जबाबदारी प्रतिज्ञा' सादर करा.

या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक, सरकारी अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील प्रतिनिधी, उद्योग व्यावसायिक, स्टार्टअप्स आणि विविध क्षेत्रातील नागरिकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तरुणांच्या सहभागावर विशेष भर देऊन, जबाबदार ए आय वापर, डेटा गोपनीयता, उत्तरदायित्व आणि चुकीच्या माहितीचा प्रतिकार या विषयांवर जागरूकता निर्माण करणे हे या मोहीमेचे उद्दिष्ट आहे.

***

सुषमा काणे/संदेश नाईक/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2228412) अभ्यागत कक्ष : 17