रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे गाडीतील प्रत्यक्ष प्रवासादरम्यान(ऑन बोर्ड) उत्तम सेवा आणि गतिशक्ती कार्गो टर्मिनल्स आणि मालवाहतूक संबंधित सुविधांच्या माध्यमातून रेल आधारित लॉजिस्टिक्स सह रेल्वे चालवणार सुधारित सोयीसुविधांची  ‘रिफॉर्म एक्स्प्रेस’



सामान्य श्रेणीच्या (जनरल) डब्यांवर लक्ष केंद्रित करून रेल्वेच्या गाड्यांची निरंतर स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट ठेवत अशा प्रकारे एक  ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.

Posted On: 14 FEB 2026 6:52PM by PIB Mumbai

 

2026 मध्ये "52 आठवड्यात 52 सुधारणा" करण्याच्या भारतीय रेल्वेच्या संकल्पानुसार, भारतीय रेल्वेने दोन नव्या सुधारणांना मान्यता दिली असून त्यांची अंमलबजावणी त्वरित सुरू होईल,अशी घोषणा रेल्वे, माहिती, प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव यांनी आज  केली‌ सुधारणा ही एकदाच घडणारी घटना नसून ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, असे ही ते पुढे   म्हणाले.

  

 पहिल्या सुधारणांविषयी सविस्तर माहिती  देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, की 2026 पासून, भारतीय रेल्वे गाड्यांची, विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांची,संपूर्ण स्वच्छता करण्यात येईल .

सध्याच्या यंत्रणेद्वारे,मोठ्या प्रमाणात स्वच्छता ही केवळ आरक्षित डब्यांपुरती मर्यादित असे; आता  रेल्वेच्या इतिहासात प्रथमच, सामान्य डब्यांची संपूर्ण स्वच्छता देखील या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. पूर्वीची "स्वच्छ रेल्वे स्थानक" ही संकल्पना,  मर्यादित स्थानकांवर संपूर्ण स्वच्छता प्रदान करत होती, आता ती गाडीच्या  सुरुवातीच्या स्थानापासून तिच्या गंतव्य स्थानापर्यंत सतत स्वच्छता करणाऱ्या प्रारुपात बदलली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.प्रवासादरम्यान शौचालये, कचऱ्याचे डबे, केबिन डब्यामधील आतील भाग, पाण्याची उपलब्धता आणि दिवे बंद पडणे यासारख्या किरकोळ विद्युत किंवा यांत्रिक दोषांवर सतत लक्ष ठेवले  जाईल; जेणेकरून  प्रवासातील वातावरण लक्षणीयरित्या सुधारेल.

ग्राहकांसाठी प्रवासाचे वातावरण पूर्णपणे सुधारण्याच्या विचारातून ही सुधारणा करण्यात आल्याचे वैष्णव यांनी सांगितले.विभागीय रेल्वेशी सल्लामसलत करून, पुढील सहा महिन्यांत प्रत्येक  विभागातील सुमारे चार ते पाच गाड्या, प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या आणि जास्त वेळा धावणाऱ्या गाड्या सुरवातीच्या काळात ही सेवा सुरू करण्यासाठी निश्चित केल्या गेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात विविध विभागातील  एकूण 80 गाड्या या कामासाठी निश्चित करण्यात आल्या  आहेत आणि पुढील तीन वर्षांच्या कालावधीत भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये ही सुधारणा लागू केली जाईल.गाड्यांची निवड व्यवस्थापकीय पातळीवर क्षेत्रीय माहिती (फील्ड इनपुट) आणि परिचालन( ऑपरेशनल) निकषांवर आधारित आहे.

स्वच्छता वारंवारता स्पष्टपणे सांगणाऱ्या परिभाषेत सेवास्तर करारांनुसार पूर्णपणे तंत्रज्ञान-सक्षम व्यावसायिक पथके नियुक्त केली जातील, जी गर्दीच्या वेळेत अधिक वेळा   स्वच्छता करतील आणि गर्दी नसलेल्या वेळेत तुलनेने यांची वारंवारता कमी असेल. शौचालयाची सतत स्वच्छता, कचरा हटवणे, कॅबिनेट साफसफाई, कपड्यांची (लिनेन) हाताळणी आणि संबंधित सेवा यासाठी सुनिश्चित केल्या जातील, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

पूर्वी वेगवेगळ्या एजन्सींना देण्यात येणारे कापड (लिनन) वितरण, लिनन संकलन आणि साफसफाईचे काम आता एकत्र  केले जाईल आणि एकाच एजन्सीला दिले जाईल,असे त्यांनी पुढे सांगितले.नियोजित स्थानकांवर,आरक्षित डब्यांसाठी  तैनात असलेले कर्मचारी सामान्य डब्यांमध्ये जातील जेणेकरून आरक्षित डब्यांच्या बरोबरीची स्वच्छता मानके सुनिश्चित होतील. रेल्वेच्या इतिहासातील हे एक खूप मोठे परिवर्तन असल्याचे सांगत ते म्हणाले प्रथमच  सामान्य डब्यांच्या स्वच्छतेकडे इतके लक्ष दिले जात आहे.

दुसऱ्या सुधारणेबाबत बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की ही सुधारणा 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या गती शक्ती मालवाहतूक टर्मिनल धोरणावर आधारित आहे. या धोरणामुळे मालवाहतूक टर्मिनलला मंजुरी देण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुलभ झाली. पूर्वी ज्या कामासाठी सुमारे 6 वर्षे लागत होती, ती कामे आता साधारण 3 महिन्यांत पूर्ण होऊ लागली आहेत. अभियांत्रिकी आराखडे, संकेत व्यवस्था आणि विद्युत आराखड्यांना मिळणाऱ्या मंजुरीची प्रक्रिया देखील सुलभ करण्यात आली. यामुळे सुमारे 124 बहुविध पद्धतींची मालवाहतूक टर्मिनल विकसित करण्यात आली असून त्यांची संभाव्य वहन क्षमता सुमारे 200 दशलक्ष टन आणि वार्षिक उत्पन्न क्षमता सुमारे 20,000 कोटी रुपये इतकी आहे.

वैष्णव यांनी सांगितले की, 3 वर्षांच्या अनुभवावर आधारित 4 महिन्यांच्या सल्लामसलतीनंतर ही अधिक व्यापक सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे सध्या असलेल्या 124 गती शक्ती मालवाहतूक टर्मिनलांची संख्या पुढील 5 वर्षांत 500 हून अधिक होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी याला 2022 मधील सुधारणेपेक्षाही अधिक मूलभूत आणि मोठी सुधारणा असल्याचे म्हटले.

या सुधारणेतील सर्वात महत्त्वाची भर म्हणजे मालवाहतूक टर्मिनलमध्येच प्रक्रिया सुविधा समाविष्ट करणे, ज्यामुळे ती केंद्रे “मालवाहतूक आणि प्रक्रिया” अशी संयुक्त केंद्रे बनतील. उदाहरणार्थ, सिमेंट क्लिंकर थेट गतिशक्ती मालवाहतूक टर्मिनलवर आणून तेथेच दळून सिमेंट तयार करता येईल आणि नंतर पिशव्यांत भरून किंवा तयार सिमेंट मिश्रण वाहनांद्वारे पाठवता येईल. त्याचप्रमाणे अन्नधान्य प्रक्रिया, भरणे-उतरणे आणि मूल्यवर्धनाची कामेही टर्मिनलमध्येच करता येणार आहेत. त्यामुळे साहित्य आधी वेगळ्या ठिकाणी प्रक्रिया करून आणण्याची गरज राहणार नाही, कृत्रिम अडथळे दूर होतील आणि रेल्वेला अधिक मालवाहतूक मिळेल.

त्यांनी सांगितले की अनेक अपुरी वापरली जाणारे मालगोदामे आता गतिशक्ती मालवाहतूक टर्मिनल म्हणून विकसित केली जातील. जुन्या धोरणांखाली विकसित केलेल्या बाजूच्या रेल्वे मार्गांना या सुलभ चौकटीत समाविष्ट करता येईल. टर्मिनल आणि मुख्य मार्गांमधील लहान जोडमार्गांच्या देखभालीसाठी खासगी ऑपरेटरांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, आता रेल्वे शुल्क घेऊन ती देखभाल करेल, ज्यामुळे सुरक्षितता वाढेल आणि जबाबदारी स्पष्ट होईल.

या सुधारणेमुळे समान वापरासाठीची सुविधा वाढवण्यात आली असून वाय-जोडणी आणि रेल्वेवरून रेल्वे जाणारे पूल यांचा समावेश करण्यात आला आहे. अनेक गती शक्ती टर्मिनलांना जोडणीची व्यवस्था औपचारिक करण्यात आली असून एखाद्या विद्यमान मार्गावर नवे टर्मिनल उभारले गेले तरी त्याला जोडणी नाकारणे शक्य होणार नाही. यामुळे पूर्वी वादातून निर्माण होणारे न्यायालयीन प्रकरणे टळतील. तसेच वाद टाळण्यासाठी एक नवी चौकट तयार करण्यात आली असून, दरमहा किंवा टप्प्यांनुसार टर्मिनल विकासक आणि रेल्वे अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक होऊन संयुक्त नोंदी व “वाद नाही” अशी प्रमाणपत्रे दिली जातील, त्यामुळे लवाद किंवा न्यायालयात जाण्याची गरज कमी होईल.

***

शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2228286) अभ्यागत कक्ष : 8