माहिती आणि प्रसारण मंत्रालय
बर्लिन येथील युरोपियन फिल्म मार्केट 2026 मधील भारताच्या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी चित्रपट, संस्कृती व नवकल्पनांचे प्रदर्शन
भारतीय चित्रपट निर्मात्यांच्या सहभागामुळे जागतिक स्तरावरील भारतीय चित्रपटांचा वाढता प्रभाव अधोरेखित झाला
भारतात निर्मिती स्पर्धेचे विजेते आणि राज्यांनी जागतिक मंचावर सर्जनशीलतेचे सामर्थ्य दर्शविले
इएफएम नवोन्मेष हब 2026 च्या मंचावर भारताने अत्याधुनिक तंत्रज्ञान आधारित सर्जन कल्पकता आणि एव्हीजीसी-एक्सआर क्षमता सादर केली
Posted On:
13 FEB 2026 5:30PM by PIB Mumbai
बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित युरोपियन फिल्म मार्केट (इएफएम) 2026 मध्ये भारताचा प्रभावी व बहुआयामी सहभाग दर्शवत भारत दालनाचे उद्घाटन करण्यात आले. इएफएममधील या भारताच्या अधिकृत दालनाद्वारे चित्रपट, संस्कृती आणि सर्जक तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावरचा देशाचा वाढता प्रभाव अधोरेखित केला जात आहे. या दालनाचे उद्घाटन बर्लिनमधील भारताचे राजदूत अजित विनायक गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रभावी व्यक्ती, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि भारतीय चित्रपट व नवोन्मेष शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

भारत जर्मनी यांच्यातील सर्जनशील व सांस्कृतिक क्षेत्रातील संबंधांची वाढती व्याप्ती या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रतिबिंबित झाली. जगातील सर्वात प्रभावशाली चित्रपट बाजारपेठ असलेल्या युरोपियन फिल्म मार्केटच्या प्रमुख व बर्लिनेल प्रोच्या संचालक तान्या मेसनर, आंतरराष्ट्रीय सहभाग व धोरणात्मक औद्योगिक संबंध यांना आकार देण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या इएफएमच्या विक्री व आरेखन विभागाचे प्रमुख पीटर डॉश आणि भारत व जर्मनी यांच्यातील कला व सांस्कृतिक संवाद दृढ करण्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या, टागोर केंद्राच्या संचालक त्रिशा सकलेचा हे मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) वरिष्ठ अधिकारी, बर्लिनमधील भारतीय वकिलातीचे सदस्य आणि देशाच्या प्रगतीशील सर्जक परिसंस्थेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध प्रतिनिधी मंडळांचे सदस्यदेखील उद्घाटनाला हजर होते.
भारतीय चित्रपट निर्मात्यांनी जागतिक भागीदारी वाढविली
भारताचा इएफएममधील यावर्षीचा सहभाग देशाच्या कथाकथनामधील सर्वोत्कृष्टतेचे व नवकल्पकतेच्या सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यावेळी आंतरराष्ट्रीय निर्माते, विक्री प्रतिनिधी, वितरक आणि महोत्सवाच्या आयोजकांसोबत काम करणारे नऊ भारतीय चित्रपट निर्माते यामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांची उपस्थिती जगातल्या सहनिर्मिती प्रकल्पांमधील भारताचा वाढता सहभाग आणि विविध भाषांमधल्या, शैलीतल्या भारतीय कथांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढता स्वीकार याचे द्योतक आहे. सुरचित बैठका व प्रकल्प चर्चा याद्वारे या चित्रपट निर्मात्यांनी पारंपरिक चित्रपट व्यापाराचा विस्तार करणारी भागीदारी, दोन देशांमधील सहकार्य आणि दीर्घकालीन सर्जनशील मैत्री यातील संधींचा शोध घेतला.

भारताच्या वेगाने वाढणाऱ्या माध्यम तंत्रज्ञान व सर्जक तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार उदयोन्मुख स्टार्ट अप उद्योगांच्या प्रतिनिधींचा सहभागदेखील तितकीच उल्लेखनीय बाब होती. या कंपन्यांनी कथाकथन, तंत्रज्ञान व डिजिटल निर्मिती यांना एकत्र आणणारे पर्याय सादर केले. नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताची सर्जक अर्थव्यवस्था कशी विकसित होत आहे हे या पर्यायांनी दाखवून दिले. त्यांच्या एएफएममधील सहभागातून जागतिक मनोरंजन परिसंस्थेतील आशय निर्मिती करणारा प्रमुख देश ते तंत्रज्ञानातील प्रगतीचे केंद्र अशी ओळख हा भारताच्या प्रगतीचा प्रवास दिसून आला.
तरुण नवोन्मेषकांनी केले भारताचे प्रतिनिधित्व

या शिष्टमंडळात क्रिएट इन इंडिया (सीआयसी) स्पर्धेतील दोन विजेत्यांचाही समावेश होता. नवकल्पकतेच्या आधारे कथा सांगणाऱ्या तरुण सर्जक उद्योजकांच्या कामामधून चाकोरीबाहेरच्या कल्पना ठळकपणे दिसून आल्या.
नवीन कौशल्याला प्रोत्साहन देण्यावर भर देणे आणि उदयोन्मुख प्रतिभेला जागतिक मंच मिळवून देणे यावर देशात भर दिला जात असल्याचे त्यांच्या सहभागातून अधोरेखित झाले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रतिनिधीमंडळ देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. अनुकूल धोरण, गुंतवणूक पर्याय आणि चित्रपट निर्मितीसाठीची व्यापक संसाधने याद्वारे चित्रपट निर्मात्यांना सहाय्य करण्याची राज्याची वचनबद्धता तसेच जागतिक चित्रपटसृष्टीच्या नकाशावरील महाराष्ट्राचे प्रमुख स्थान यातून दिसून आले. दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिल्लीच्या शिष्टमंडळाने चित्रिकरणासाठी विशेष प्रोत्साहन आणि परवाना प्रक्रिया यावर भर दिला. शहरातील मनोहर चित्रिकरण स्थळांचे दर्शन त्यांनी जागतिक प्रेक्षकांना घडविले.
पॅव्हेलियनमधील संवादादरम्यान, एनएफडीसी च्या व्यवस्थापनाने जून 2026 मध्ये होणारा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एमआयएफएफ) 2026 आणि दरवर्षी 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आयोजित होणारा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), यासह भारतातील आगामी प्रमुख महोत्सवांबद्दल देखील माहिती दिली. या महोत्सवांना सिनेमॅटिक देवाणघेवाण, सह-निर्मिती आणि बाजारपेठेतील सहभागासाठीचे प्रमुख जागतिक व्यासपीठ म्हणून स्थान देण्यात आले असून, यामुळे आंतरराष्ट्रीय सहभाग आणि सहकार्याला अधिक चालना मिळाली.
चित्रपट आणि सर्जनशीलता हे आंतरराष्ट्रीय सहभागाचे एक प्रभावी साधन असल्याचे राजदूत अजित विनायक गुप्ते यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. त्यांनी नमूद केले की ईएफएम मधील भारताची उपस्थिती केवळ त्याची दीर्घकालीन कथाकथन परंपराच नव्हे, तर जागतिक सर्जनशील उद्योगांमधील त्याची वाढती भूमिका देखील प्रतिबिंबित करते. त्यांनी चित्रपट, संस्कृती आणि नवोन्मेष यामध्ये भारत आणि जर्मनी दरम्यानच्या वाढत्या सहकार्यावर प्रकाश टाकला आणि शाश्वत सर्जनशील आणि आर्थिक भागीदारी निर्माण करण्यामधील ईएफएम सारख्या व्यासपीठांचे महत्त्व अधोरेखित केले.
भारत पॅव्हेलियन ने सर्जनशील भागधारकांना एकत्र आणले
एनएफडीसीने आयोजित केलेले भारत पॅव्हेलियन आंतरराष्ट्रीय उद्योगासाठी एक गतिमान बैठक केंद्र म्हणून काम करते. संपूर्ण बाजारपेठेत, पॅव्हेलियन व्यावसायिक बैठका, सह-निर्मिती चर्चा, नेटवर्किंग संवाद आणि उद्योग संवाद आयोजित करत आहे, तसेच भारताला चित्रीकरणाचे एक आकर्षक गंतव्यस्थान आणि सहयोगी सामग्री भागीदार म्हणून प्रोत्साहन देत आहे. हे एक मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करत असून, या ठिकाणी चित्रपट निर्माते, तंत्रज्ञान नवोन्मेषक, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि जागतिक भागधारक भागीदारीच्या संधी शोधण्यासाठी एकत्र येत आहेत.
या वर्षी भारताच्या सहभागाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, ईएफएम इनोव्हेशन हबमधील उपस्थिती. या ठिकाणी चार भारतीय टेक स्टार्ट-अप्स अत्याधुनिक साधने आणि प्लॅटफॉर्म सादर करत आहेत, जे इमर्सिव्ह स्टोरीटेलिंग, डिजिटल प्रोडक्शन आणि माध्यम परिसंस्थेच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण करतील. त्यांचा सहभाग, एव्हीजीसी-एक्सआर आणि सर्जनशील नवोन्मेष क्षेत्रातील भारताच्या वाढत्या उपस्थितीवर प्रकाश टाकतो, तसेच तांत्रिक उद्योजकता, भविष्यातील कथाकथनाचा अविभाज्य भाग कसा बनत आहे, हे प्रदर्शित करतो. यामधून स्टार्ट-अप्सना पाठिंबा देणे आणि सर्जनशील उद्योगांमधील नवोन्मेषाला चालना देणे, यासाठी व्यापक राष्ट्रीय प्राधान्य दिसून येते.
ईएफएम 2026 मधील भारताचा रचनात्मक आणि भविष्यवेधी सहभाग, हा केवळ आशय निर्मितीमध्येच नव्हे तर सर्जनशील उद्योजकता, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि नवोन्मेष-आधारित विकासात देशाला जागतिक नेता म्हणून प्रस्थापित करण्याचा स्पष्ट धोरणात्मक दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो. चित्रपट निर्माते, स्टार्ट-अप्स, सांस्कृतिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय उद्योगातील धुरीण यांना एकत्र आणणारे भारत पॅव्हेलियन, हे जागतिक चित्रपट आणि माध्यम परिप्रेक्ष्यातील भारताच्या वाढत्या सहभागाचे प्रतीक बनले आहे. ईएफएम दरम्यान, भारत पॅव्हेलियन हे उपक्रम, संवाद आणि सहकार्याचे एक चैतन्यमय केंद्र बनले असून, ते आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायाशी भारताचे संबंध मजबूत करत आहे, आणि जागतिक मनोरंजनाच्या भविष्याला आकार देण्यामधील भारताची भूमिका मजबूत करत आहे.
***
शैलेश पाटील/सुरेखा जोशी/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2227877)
अभ्यागत कक्ष : 12