आयुष मंत्रालय
32 विमा कंपन्यांतर्गत रोकडविरहित उपचार सुविधेसाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा जनरल इन्शुरन्स कौन्सिलसोबत ऐतिहासिक सामंजस्य करार
Posted On:
10 FEB 2026 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2026
नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) मुख्य प्रवाहातील आरोग्य विमा परिसंस्थेत आयुर्वेदाचे स्थान बळकट करण्याच्या दिशेने एक महत्वाचे ऐतिहासिक पाऊल टाकले आहे. संस्थेने आज दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी जनरल इन्शुरन्स कौन्सिल (GIC) सोबत एक सामायिक नोंदणी सामंजस्य करार केला.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक प्राध्यापक (वैद्य) पी. के. प्रजापती आणि जनरल इन्शुरन्स कौन्सिलचे आरोग्य संचालक सेगर संपतकुमार यांनी, आयुष आरोग्य विमा तज्ञ कोअर ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक बेजोन कुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक प्राध्यापक (वैद्य) पी. के. प्रजापती यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. या करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आता जनरल इन्शुरन्स कौन्सिल अंतर्गत असलेल्या सर्व 32 विमा कंपन्यांच्या पॅनेलवर नोंदणीकृत संस्था बनली आहे असे त्यांनी सांगितले. यामुळे रुग्णांना रोखविरहित (Cashless) उपचार सेवा पुरवणे शक्य होणार आहे. या महत्त्वाच्या घडामोडीबद्दल त्यांनी आयुष मंत्रालय आणि त्यांच्या कार्यकारी पथकाचे आभार मानले. यामुळे उपक्रमाचा मोठ्या प्रमाणावर रुग्णांना फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे रुग्णांचा आयुर्वेदिक उपचार घेण्याकडचा ओघ वाढेल, आणि त्यासोबतच सेवांचा अधिक वापर आणि संस्थेच्या शाश्वत प्रगतीसाठीही मदत होणार आहे.
महत्त्वाची घोषणा
यावेळी आयुष आरोग्य विमा तज्ञ कोअर ग्रुपचे अध्यक्ष प्राध्यापक बेजोन कुमार मिश्रा यांनी आयुष मंत्रालयाच्या एका मोठ्या उपक्रमाची घोषणा केली. याअंतर्गत आयुष उपचारांशी संबंधित विमाविषयक शंकांचे निरसन करण्यासाठीच्या एका समर्पित मदत व्यवस्थेचा (Support system) प्रारंभ करण्यात आला.
आयुष मंत्रालयाने देशात पहिल्यांदाच आयुष आरोग्य विमा हेल्पलाइन सुरू केली आहे :
मदत क्रमांक: 1800-11-0008
वेळ: सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत
लाभार्थ्यांना विमाविषयक समस्या सोडवण्यात मदत करणे, आयुष विमा संरक्षणाबाबत जागरूकता वाढवणे आणि पात्र लाभ सुलभतेने उपलब्ध करून देणे हा या मदत क्रमांकाचा उद्देश आहे.


सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2226069)
अभ्यागत कक्ष : 14