दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय टपाल विभागाच्या देशव्यापी शाखांमार्फत म्युच्युअल फंड गुंतवणूक योजनांचा विस्तार वाढवण्यासाठी टपाल विभाग व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) यांनी सामंजस्य करार केला

Posted On: 10 FEB 2026 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2026

भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भारतीय टपाल विभागाने त्यांच्या देशव्यापी टपाल शाखांमार्फत म्युच्युअल फंड गुंतवणूक योजनांचे वितरण वाढवण्यासाठी भारतातील आघाडीचा शेअर बाजार नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) बरोबर सामंजस्य करार केल्याची घोषणा आज केली. एनएसई कडे म्युच्युअल फंडांच्या ऑर्डर पासून सेटलमेंट पर्यंत सर्व व्यवहार करणारी उत्तम ऑनलाइन प्रणाली उपलब्ध आहे. आता एनएसई बरोबर झालेल्या या करारामुळे टपाल विभागाच्या देशभर पसरलेल्या 1.64 लाख टपाल कार्यालयांमार्फत ही सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच ही सुविधा सेबी च्या नियमांनुसार दिली जाणार आहे. या सहकार्यामुळे देशातील अगदी तळागाळातील,ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांना एनएसई च्या म्युच्युअल फंड सेवांचा लाभ मिळणार आहे.

भारतीय टपाल खात्यावरील जनतेचा विश्वास, त्याच्या शाखांचा देशव्यापी विस्तार व एनएसई च्या शेअर बाजारासंबंधित यंत्रणा तसेच तंत्रज्ञानविषयक सज्जतेला एकत्र आणणाऱ्या या महत्वाच्या भागीदारीमुळे देशातील आर्थिक समावेशनाला चालना देण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील जागरूकता, व्यवहारातील पारदर्शकता वाढेल तसेच भांडवली बाजाराशी संलग्न आर्थिक साधनांमधील गुंतवणूक देखील वाढेल.

या सामंजस्य कराराअंतर्गत टपाल विभागाच्या निवडक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणित म्युच्युअल फंड वितरक म्हणून मान्यता देण्यात येईल. या कर्मचाऱ्यांना एनएसई च्या म्युच्युअल फंड मंचामार्फत विविध म्युच्युअल फंड योजना आणि संबंधित सेवा प्रदान करण्यासाठी सक्षम केले जाईल. त्यासाठी आवश्यक असलेले एनआयएसएम  प्रमाणपत्र व ईयुआयएन नोंदणी तसेच इतर नियमपालन पूर्ण केल्याची सर्व प्रमाणपत्रे त्यांना घ्यावी लागतील. हा सामंजस्य करार केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षे तो वैध असणार आहे आणि परस्पर संमतीने त्याचे नूतनीकरण केले जाईल.

या उपक्रमामुळे भारताच्या टियर 2 व टियर 3 शहरे तसेच ग्रामीण भागात म्युच्युअल फंडांची माहिती व सुविधा पोचेल, गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करता येईल व आर्थिक दृष्ट्या सक्षम समाजाकडे भारताच्या सुरू असलेल्या वाटचालीला गती मिळेल.

देशातील आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी, गुंतवणूकदारांना संरक्षण देण्यासाठी व समाजाच्या सर्व स्तरांमधून आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे चालना मिळेल.


सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2225977) अभ्यागत कक्ष : 16