श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओने भविष्य निर्वाह निधीसाठी प्राप्तिकर प्रणालीच्या सुसूत्रीकरणाचे स्वागत केले
Posted On:
03 FEB 2026 4:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026
मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधीचे नियमन प्राप्तिकर कायदा, 2025 च्या अनुसूची XI नुसार केले जाते. सध्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण उपबंध अधिनियम, 1952 च्या कलम 17 अंतर्गत सवलतीसाठीच्या पात्रतेमध्ये भिन्नता आहे. शिवाय प्राप्तिकर कायदा तरतुदी आणि ईपीएफओ याअंतर्गत अधिसूचित गुंतवणुकीच्या पद्धतीतही फरक आहे. या दोन्ही कायद्यांमध्ये मालकाच्या योगदानाच्या मर्यादांमध्ये सुसंगतता नव्हती. या फरकांमुळे गोंधळ निर्माण होतो आणि विनाकारण खटल्यांमध्ये वाढ होते.
केंद्रीय अर्थसंकल्पाने (2026-2027) मान्यताप्राप्त भविष्य निर्वाह निधींना लागू असलेल्या प्राप्तिकर चौकटीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण उपबंध अधिनियम, 1952 आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, 1952 च्या वैधानिक आणि प्रशासकीय तरतुदींशी संरेखित केले आहे.
सवलत
प्राप्तिकर कायदा, 2025 अंतर्गत मान्यता केवळ अशाच भविष्य निर्वाह निधींना उपलब्ध होईल, ज्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण उपबंध अधिनियम,1952 च्या कलम 17 अंतर्गत सूट मिळवली आहे.
गुंतवणूक
गुंतवणुकीच्या नियमांचे नियमन, लागू ईपीएफ चौकट आणि अधीनस्थ कायद्यानुसार सुरू राहील. सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीला 50% पर्यंत मर्यादित ठेवणारी कठोर वैधानिक मर्यादा काढून टाकण्यात आली आहे.
नियोक्त्याचे योगदान
नियोक्त्याचे योगदान 7.5 लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेच्या अधीन असेल. एकदा ही आर्थिक मर्यादा ओलांडली की, योगदानावर अतिरिक्त लाभ म्हणून कर आकारला जाईल.
केंद्रीय अर्थसंकल्पातील (2026-2027) प्राप्तिकर प्रणालीचे सुसूत्रीकरण, भविष्य निर्वाह निधी कायद्याशी सुसंगतता आणि ताळमेळ राखून, संबंधित भागधारकांचे हित साधण्यात महत्त्वपूर्ण ठरेल. ईपीएफ सवलतीचे नियमन, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण उपबंध अधिनियम, 1952 द्वारे केले जात असल्याचे, आता स्पष्टपणे दिसेल. गुंतवणुकीचे नियम आता ईपीएफ गुंतवणुकीच्या नियमांनुसार आणि नियोक्त्याच्या योगदानावरील मर्यादा प्राप्तिकर कायद्यांतर्गत असलेल्या आर्थिक मर्यादेनुसार संरेखित करण्यात आल्या आहेत.
अधिक तपशील येथे उपलब्ध आहेत: Finance Bill & FAQs on Budget by CBDT.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2222612)
अभ्यागत कक्ष : 26