पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आगामी जागतिक पाणथळ भूमी दिवस 2026 चे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताच्या रामसर यादीत 2 नव्या पाणथळ जागांच्या समावेशाची केली घोषणा


उत्तर प्रदेशातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील छारी-धांड यांना मिळाली आंतरराष्ट्रीय मान्यता

प्रविष्टि तिथि: 31 JAN 2026 11:24AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2026

 

दिनांक 2 फेब्रुवारी 2026 या आगामी जागतिक पाणथळ भूमी दिवसाचे  औचित्य साधून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताच्या रामसर यादीत 2 नव्या पाणथळ जागांच्या समावेशाची घोषणा केली आहे.  

यादव यांनी ‘एक्स’ वर याबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पटना पक्षी अभयारण्य आणि गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील  छारी -धांड   यांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील रामसर स्थळांची संख्या 2014मधील 26 स्थळांवरून सध्या 98 स्थळांपर्यंत पोहोचली असून यात 276% हून अधिक वाढ झाली असल्याचे यादव यांनी अधोरेखित केले.  ही आंतरराष्ट्रीय मान्यता पर्यावरण संरक्षण आणि पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी सांगितले. 

घोषित करण्यात आलेल्या दोन पाणथळ जागा शेकडो स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींना अधिवास प्रदान करतात. धोक्यात आलेल्या पक्ष्यांव्यतिरिक्त, या क्षेत्रात  चिंकारा, लांडगे, शशकर्ण किंवा कलंदर, वाळवंटी मांजर आणि वाळवंटी कोल्ह्यांसारखे वन्यजीवही आढळतात.

भारत, 1971 मध्ये इराणमधील रामसर येथे स्वाक्षरी झालेल्या आणि 'रामसर करार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'पाणथळ जागांवरील करारा'वर स्वाक्षरी करणाऱ्या देशांपैकी  एक आहे. भारत 1 फेब्रुवारी 1982 रोजी या कराराचा स्वाक्षरीकर्ता बनला. 

विशेष संवर्धनात्मक महत्त्व असलेल्या पाणथळ जागांना 'आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पाणथळ जागा' म्हणून घोषित केले जाऊ शकते. ही स्थळे महत्त्वपूर्ण आहेत, कारण ती आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेल्या चौकटींनुसार संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी देशाच्या वचनबद्धतेची आदर्श उदाहरणे ठरू  शकतात.

 

* * *

नितीन फुल्लुके/सोनाली काकडे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2221144) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Malayalam