इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटला जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून भारताची एआय परिसंस्था व्यवस्थित पद्धतीने विकसित होत आहे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 पूर्वी प्रमुख उपलब्धीची घोषणा
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आघाडीच्या 60 उद्योग तज्ज्ञांचे विचार संकलित करून एआयचे भवितव्य यावरील संग्रहग्रंथ प्रकाशित केला
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 9:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आगामी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या निमित्ताने आज एक उच्चस्तरीय पत्रकार परिषद आयोजित केली होती, ज्याच्या अध्यक्षस्थानी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव होते. या कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद; भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार अजय सूद आणि मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ग्लोबल साउथमधील पहिल्या जागतिक एआय समिटचे 16 ते 20,फेब्रुवारी 2026, दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजन करण्यासाठी भारत सज्ज होत असताना आजच्या पत्रकार परिषदेत प्रमुख घडामोडींची रूपरेषा मांडण्यात आली, जागतिक सहभागाला दुजोरा देण्यात आला तसेच इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या अपेक्षित निकालांचा पूर्वआढावा घेण्यात आला.

उपस्थितांना संबोधित करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, इंडिया एआय इम्पॅक्ट समिटला जगभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे आणि ही आतापर्यंतचा जागतिक स्तरावरील सर्वात मोठी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद ठरणार आहे. त्यांनी मॉडेल्स, अॅप्लिकेशन्स आणि पायाभूत सुविधांसह एआय मूल्य साखळीत काम करणारे उद्योगपती , विकासक आणि नवोन्मेषकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच साधलेल्या संवादांचा उल्लेख केला. या सहभागातून भारताच्या एआय परिसंस्थेची व्यवस्थित प्रगती आणि वापर -आधारित उपायांवर भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, आघाडीच्या आयटी कंपन्यांनी 200 हून अधिक केंद्रित, क्षेत्र-निहाय एआय मॉडेल्स विकसित केले आहेत, जे एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान जारी करण्याचे प्रस्तावित आहे. ते पुढे म्हणाले की, एआय पायाभूत सुविधांमध्ये सुमारे 70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक सुरू झाली असून शिखर परिषद समाप्त होईपर्यंत ती दुप्पट होण्याची शक्यता आहे आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चर आणि उद्योगांनी अनुमोदन दिलेला अभ्यासक्रम 500 विद्यापीठांमध्ये सुरु करून एआय प्रतिभा विकासाला चालना दिली जाईल, ज्यामुळे या क्षेत्रासाठी प्रतिभावंतांची एक मजबूत साखळी तयार होईल.

"द इम्पॅक्ट अजेंडा: लीडरशिप रिफ्लेक्शन्स" या शीर्षकाखाली, कृत्रिम बुद्धिमत्तेचे भवितव्य आणि समावेशक विकास, नवोन्मेष आणि सामाजिक प्रभाव यामधील त्यांची भूमिका, यावर उद्योग क्षेत्रातील सुमारे 60 तज्ज्ञांच्या विचारांचे संकलनदेखील अश्विनी वैष्णव यांनी प्रकाशित केले.
यावेळी या शिखर परिषदेपूर्वी साध्य केलेल्या यशाची उजळणी करण्यात आली, तसेच उद्योग, सरकारे, शिक्षण तज्ज्ञ आणि नागरी समाजाकडून या ऐतिहासिक बैठकीदरम्यान काय अपेक्षित आहे, याची रूपरेषा मांडण्यात आली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी अधोरेखित केले की लोक, ग्रह आणि प्रगती या सूत्रांवर आधारित सर्व सात संकल्पना-आधारित कार्यगटांच्या हायब्रीड बैठका यशस्वीपणे संपन्न झाल्या, आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट आता अंतिम टप्प्यात आहे.
उपस्थितांना संबोधित करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन म्हणाले की, इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे प्रमुख उद्दीष्ट तंत्रज्ञानाचे, विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेचे लोकशाहीकरण वाढवणे, हे आहे, जेणेकरून त्याचे फायदे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचतील याची खात्री मिळेल. त्यांनी नमूद केले की, ग्लोबल साउथमध्ये आयोजित होणारी ही पहिली जागतिक एआय शिखर परिषद असल्यामुळे, ही शिखर परिषद एआय प्रशासन आणि मानकांचे दृष्टिकोन संरेखित करण्यावर भर देते, तसेच वास्तविक जगात वापर करताना, एआयच्या सुरक्षित आणि जबाबदार प्रतियोजनाबाबत सामायिक जागतिक समज वाढवणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

याव्यतिरिक्त, शिखर परिषदेच्या आठवड्यात भारत मंडपम आणि सुषमा स्वराज भवनमध्ये सुमारे 500 पेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, ज्यामुळे समांतर नेते-स्तरीय संवाद, प्रदर्शने आणि परिणामाभिमुख सत्रे होतील, अशी घोषणा करण्यात आली. एआय इम्पॅक्ट एक्स्पोमध्ये देशांचे दालन, मंत्रालये, राज्य सरकारे, उद्योग, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांसह 840 हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील, जे वास्तविक-जगातील उदहरणांसाह कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपाय प्रदर्शित करतील. इंडिया एआय भारताच्या मूलभूत एआय मॉडेल्सवरील प्रगतीदेखील प्रदर्शित करेल.
याशिवाय, परिषदेत 15 राज्य/सरकार प्रमुख, 40 हून अधिक मंत्री, 100 हून अधिक आघाडीचे सीईओ आणि सीएक्सओ आणि 100 हून अधिक नामांकित शिक्षणतज्ज्ञ सहभागी होतील. उद्योगांचा सहभाग हा या परिषदेचा प्रमुख घटक म्हणून उदयाला आला. जिओ, क्वालकॉम, ओपनएआय, एनव्हीडिया, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲडोब आणि गेट्स फाउंडेशन यासारखे उद्योग क्षेत्रातील भागीदार या परिषदेत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 च्या माध्यमातून नवोन्मेष, आर्थिक विकास आणि सामाजिक प्रभावाला चालना देताना, कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षित, विश्वासार्ह आणि समावेशक राहील याची खात्री करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेचा या पत्रकार परिषदेत पुनरुच्चार करण्यात आला.
* * *
सोनाली काकडे/सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221093)
आगंतुक पटल : 5