पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
जागतिक ऊर्जा क्षेत्रात भारताची भूमिका अधिक मजबूत करत भारत ऊर्जा सप्ताह 2026 ची सांगता
भारत भू-राजकीय उलथापालथीसाठी पूर्णपणे सज्ज असून जागतिक ऊर्जा संवादाच्या केंद्रस्थानी कायम आहे: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी
देशांतर्गत अन्वेषण, स्वच्छ ऊर्जा उत्पादनात वाढ आणि स्थिर मूल्य निर्धारणाने भारताची ऊर्जा स्वायत्तता मजबूत केली आहे
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
जागतिक ऊर्जा बाजारपेठेतील भू-राजकीय अस्थिरतेचा सामना करण्यासाठी भक्कमपणे तयार असल्याचे भारताने दाखवून दिले आहे आणि यापुढेही भारत आंतरराष्ट्रीय ऊर्जा चर्चेच्या केंद्रस्थानी राहील, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी भारत ऊर्जा सप्ताह 2026 च्या समारोप समारंभात सांगितले. 27 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 दरम्यान गोव्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
समारोप प्रसंगी आयोजित अनौपचारिक चर्चेदरम्यान बोलताना, पुरी यांनी भारताची ऊर्जा रणनीती विविधता, लवचिकता आणि दूरदर्शी बदलांवर आधारित आहे यावर भर दिला. "आम्ही भू-राजकीय धक्क्यांचा सामना अतिशय खुबीने केला आहे. पुरवठा स्रोतांच्या विविधीकरणाद्वारे आणि स्वच्छ इंधनांकडे वेगाने संक्रमण करत प्रत्येक आव्हानाचे संधीमध्ये रूपांतर केले आहे," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

जागतिक स्तरावरील भारताचे स्थान अधोरेखित करताना, पुरी यांनी नमूद केले की, देश आज तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक, चौथा सर्वात मोठा रिफायनर आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या सर्वोच्च निर्यातदारांपैकी एक आहे. "जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत ऊर्जेची उपलब्धता, परवडणारे दर आणि स्थिरता सुनिश्चित करत राहील," असे पुरी म्हणाले.
पारंपारिक इंधनांमध्ये गुंतवणूक सुरु ठेवण्याबरोबरच कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG), हरित हायड्रोजन आणि स्वदेशी स्वच्छ-ऊर्जा तंत्रज्ञानावरील सरकारच्या प्रयत्नांवरही केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. "पारंपारिक ऊर्जा आवश्यक राहील, परंतु इथेनॉल मिश्रणापासून ते कॉम्प्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन आणि जैवइंधनापर्यंत आपण जी प्रगती करत आहोत , त्यामुळे विश्वास वाटतो की हरित इंधनाची भूमिका आणखी वाढेल," असे ते म्हणाले.
जागतिक मूल्य संकटाच्या काळात ग्राहकांवर होणाऱ्या परिणामांसंबंधी चिंतेचे निराकरण करताना, मंत्री म्हणाले की भारताने आपल्या नागरिकांना अस्थिरतेपासून यशस्वीरित्या वाचवले आहे. "जागतिक अनिश्चिततेचा परिणाम ग्राहकांवर होऊ दिला नाही. आज भारतातील ऊर्जेचे दर जगातील सर्वात कमी दरांपैकी एक आहेत आणि संकटाच्या काळातही अखंड पुरवठा सुनिश्चित केला आहे," असे सांगत त्यांनी एलपीजीसह इंधनाच्या किमती ग्राहकांसाठी परवडणाऱ्या राखण्यात तेल विपणन कंपन्यांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपाचे उदाहरण दिले.

मंत्र्यांनंतर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सरकारच्या विकासाच्या वाटचालीस पाठिंबा देण्यासाठी सरकारची रूपरेषा सादर केली. “सात टक्क्यांहून अधिक अपेक्षित आर्थिक वाढीमुळे, ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढेल. आमचे लक्ष दोन स्तंभांवर केंद्रित आहे: देशांतर्गत अन्वेषण आणि उत्पादन मजबूत करणे, आणि भारताला जगाच्या दृष्टीने शुध्दीकरण केलेल्या उत्पादनांचा एक विश्वसनीय पुरवठादार म्हणून स्थापित करणे,” असे सचिव मित्तल यांनी सांगितले.
आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी वाढीव खोदकाम आणि अन्वेषणासह इतर क्रियाकलापांना गती देण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजनांची रूपरेषा डॉ. मित्तल यांनी मांडली. त्यांनी मूल्यवर्धनासाठी आणि आयात कमी करण्यासाठी शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्सच्या एकात्मतेवरही भर दिला. “आम्ही जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राहून देशांतर्गत क्षमता वाढवत आहोत,” असे ते पुढे म्हणाले.
ऊर्जा संक्रमणाबद्दल बोलताना, डॉ. मित्तल यांनी तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. “लॉजिस्टिक्स ऑप्टिमायझेशनपासून ते कृत्रिम प्रज्ञा -आधारित कार्यक्षमतेपर्यंत, तंत्रज्ञान खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यान्वित लवचिकता सुधारण्यासाठी केंद्रस्थानी येत आहे,” असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, ‘सीबीजी’च्या लक्ष्यांची पूर्तता करण्याच्या दिशेने भारत योग्य मार्गावरून वाटचाल करीत आहे आणि यामध्ये राज्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालील बायोमास पुरवठा साखळी तयार केली आहे. त्यामुळे 2030 पर्यंत इंधनामध्ये ते 5 टक्के मिश्रण करण्याचे उद्दिष्ट आहे.
समारोप सत्रामध्ये ‘इंडिया एनर्जी वीक 2026’ हे एक असे व्यासपीठ म्हणून अधोरेखित केले, जे ऊर्जा सुरक्षा, किफायतशीर आणि शाश्वतता यांना जोडते, आणि त्याच वेळी वेगाने बदलणाऱ्या जागतिक ऊर्जा क्षेत्रात भारताला एक स्थिर, विश्वासार्ह आणि व्यावहारिक नेता म्हणून स्थापित करीत आहे.
‘इंडिया एनर्जी वीक’ विषयी माहिती
‘इंडिया एनर्जी वीक’ म्हणजेच भारत ऊर्जा सप्ताह हे देशाचे प्रमुख जागतिक ऊर्जा व्यासपीठ आहे, जे सुरक्षित, शाश्वत आणि किफायतशीर ऊर्जा भविष्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रगतीला गती देण्यासाठी सरकारी नेते, उद्योग कार्यकारी आणि नवोन्मेषकांना एकत्र आणते. एक तटस्थ आंतरराष्ट्रीय मंच म्हणून, आयईडब्ल्यू गुंतवणूक, धोरणात्मक समन्वय आणि तांत्रिक सहकार्याला चालना देते. यामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला आकार दिला जात आहे.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2220857)
आगंतुक पटल : 24