पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक ऊर्जा संक्रमणात गुंतवणूक, भागीदारी आणि कृतीचे आवाहन करत भारत ऊर्जा सप्ताह 2026 ला प्रारंभ


सुरक्षा, परवडणारे दर आणि शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जा संक्रमणाला सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे पाठबळ आवश्यक - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी

प्रविष्टि तिथि: 27 JAN 2026 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2026

 

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री आणि एडीएनओसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह सीईओ सुलतान अहमद अल जाबेर यांच्या प्रमुख भाषणांनी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या स्वागतपर  भाषणाने भारत ऊर्जा सप्ताह 2026 चा आज प्रारंभ झाला.

ऊर्जा संवादाचे कृतीत, नवोन्मेषाचे  अंमलबजावणीत आणि महत्त्वाकांक्षेचे परिणामात रूपांतर करण्यासाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून जागतिक परिषदेच्या भूमिकेचा वक्त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

मुख्य भाषण देताना, केंद्रीय मंत्री पुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा सुरक्षा, स्वयंपूर्णता आणि हवामानविषयक  न्यायसंगत दृष्टीकोनाच्या दिशेने सुरु असलेली भारताची ठोस  आणि लवचिक प्रगती अधोरेखित केली.  त्यांनी नमूद केले की भारत ऊर्जा सप्ताह वेगाने एक विश्वासार्ह जागतिक मंच म्हणून विकसित झाला आहे, जो जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील अभूतपूर्व संक्रमण आणि अस्थिरतेच्या काळात धोरणकर्ते, उत्पादक, ग्राहक, तंत्रज्ञान प्रदाते आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणतो.

जागतिक ऊर्जा संक्रमण हे प्रामुख्याने  ऊर्जेचे स्रोत आणि साधने बदलणे नाही तर  "ऊर्जा संवर्धन" शी संबंधित  आहे यावर पुरी यांनी भर दिला. तेल, वायू, जैवइंधन, हरित हायड्रोजन, एलएनजी आणि स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनांमध्ये शाश्वत गुंतवणुकीची गरज त्यांनी अधोरेखित केली. उपलब्धता, परवडणारे दर   आणि दीर्घकालीन उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या सुधारणा-केंद्रित दृष्टिकोनाची रूपरेषा त्यांनी मांडली.

मोठे गाळयुक्त खोरे अन्वेषणासाठी खुले करणे, ओपन एकरीज लायसन्सिंग पॉलिसी (OALP) आणि डिस्कवर्ड स्मॉल फिल्ड्स (DSF) बोलीच्या  फेऱ्या, तसेच जागतिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सुरु असलेल्या  धोरणात्मक सुधारणा यांचा  केंद्रीय मंत्र्यांनी उल्लेख केला.

ते म्हणाले  की, भारतात एलपीजी वापराचा  जलद विस्तार, स्वयंपाकासाठी  स्वच्छ इंधन आणि  ऊर्जा मिश्रणात विविधता  हे समावेशक विकास  आणि समान ऊर्जा पोहोच प्रति  देशाची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.

संयुक्त अरब अमिरातीचे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री आणि एडीएनओसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह सीईओ  सुलतान अहमद अल जाबेर यांनी उपस्थितांना संबोधित करताना अधोरेखित केले की जागतिक ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणात परिवर्तनाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे, जी उदयोन्मुख बाजारपेठा, डिजिटलायझेशन आणि विविध ऊर्जा प्रणालींच्या एकत्रीकरणाने प्रेरित आहे.  त्यांनी नमूद केले की भारत या प्रमुख कलाच्या  केंद्रस्थानी आहे आणि आगामी दशकांमध्ये जागतिक ऊर्जेच्या मागणीचा   निर्णायक चालक असेल.

अपुरी गुंतवणूक, हा जागतिक ऊर्जा व्यवस्थेसमोरील सर्वात मोठा धोका आहे, यावर भर देत डॉ. अल जाबेर यांनी, सुरक्षा, किफायतशीरपणा आणि शाश्वतता याची खात्री करण्यासाठी उर्जेच्या सर्व प्रकारांमध्ये संतुलित गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. युएई-भारत ऊर्जा भागीदारीचे महत्व अधोरेखित करताना, त्यांनी भारताला कच्चे तेल, एलएनजी आणि एलपीजीचा विश्वासार्ह पुरवठादार म्हणून एडीएनओसीची भूमिका मांडली, आणि त्याचबरोबर वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक ऊर्जा परिदृश्यात निश्चितता, लवचिकता आणि सामायिक मूल्य प्रदान करणाऱ्या दीर्घकालीन, विश्वास-आधारित भागीदारीप्रति यूएईच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

प्रतिनिधींचे स्वागत करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, इंडिया एनर्जी वीक 2026 हा कल्पनांचे कृतीत रूपांतर करणारा जागतिक मंच म्हणून उदयाला आला आहे. यजमान राज्य म्हणून गोव्याने शाश्वत विकासाचा आपला दृष्टीकोन  प्रदर्शित केला असून, यात 2050 पर्यंत 100 टक्के नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दीर्घकालीन आराखड्याचा समावेश आहे, असे ते म्हणाले. सागरी संसाधनांचा जबाबदार वापर करून, पर्यावरणीय शाश्वतता सुरक्षित करून, हरित  अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्थेचा समतोल साधण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

उद्घाटनपर भाषणांमधून, इंडिया एनर्जी वीक 2026 ने व्यावहारिक  आणि समावेशक उपाय प्रदान करणारे एक जबाबदार जागतिक ऊर्जा नेतृत्व म्हणून भारताचे स्थान अधोरेखित केले. जागतिक ऊर्जा संक्रमणाला गती देणारे महत्वाचे घटक म्हणून, आंतरराष्ट्रीय सहकार्य, नवोन्मेष आणि गुंतवणूकीला चालना देण्यावर जोर देण्यात आला.

इंडिया एनर्जी वीक

इंडिया एनर्जी वीक हे देशाचे प्रमुख जागतिक ऊर्जा व्यासपीठ आहे, ते सुरक्षित, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा भविष्याच्या दिशेने प्रगतीला गती देण्यासाठी सरकारी नेते, उद्योग क्षेत्रातील धुरीण आणि नवोन्मेषकांना एकत्र आणते. एक तटस्थ आंतरराष्ट्रीय मंच म्हणून, इंडिया एनर्जी वीक, जागतिक ऊर्जा परिदृश्याला आकार देण्यासाठी गुंतवणूक, धोरण संतुलन आणि तांत्रिक सहकार्याला चालना देते.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219240) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam