संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्ली येथे युरोपियन युनियन आयोगाचे उच्च प्रतिनिधी/उपाध्यक्ष यांची घेतली भेट
भारतीय आणि युरोपियन युनियन संरक्षण उद्योगांनी व्यापक जागतिक हितासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये समन्वय राखायला हवा : राजनाथ सिंह
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2026 3:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2026
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 27, जानेवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे युरोपियन युनियन (ईयू) आयोगाच्या उच्च प्रतिनिधी/उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्यासमवेत एक बैठक घेतली. या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण मुद्द्यांवर चर्चा केली. संरक्षण मंत्री म्हणाले की भारत आणि युरोपियन युनियनमध्ये लोकशाही, बहुलवाद आणि कायद्याचे राज्य ही सामायिक तत्त्वे आहेत जी सातत्याने वृद्धिंगत होत असलेल्या भागीदारीला आधार देतात. त्यांनी पुढे नमूद केले की ही मूल्येच जागतिक स्थैर्य, शाश्वत विकास आणि समावेशक समृद्धीसाठी व्यावहारिक सहकार्यात रूपांतरित करण्याचा भारत प्रयत्न करत आहे.

भारतीय आणि युरोपियन युनियनच्या संरक्षण उद्योगांनी व्यापक जागतिक हितासाठी आपल्या प्रयत्नांमध्ये समन्वय राखला पाहिजे यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला हे पूरक आहे तसेच युरोपियन युनियनच्या धोरणात्मक स्वायत्ततेच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. विश्वासार्ह संरक्षण परिसंस्था आणि भविष्यासाठी सज्ज क्षमता निर्माण करण्यासाठी पुरवठा साखळ्यांचे एकत्रीकरण करून ही भागीदारी अधिक सामर्थ्यवान बनेल. ते म्हणाले की भारताचा संरक्षण उद्योग युरोपियन युनियनच्या 'रीआर्म इनिशिएटिव्ह'मध्ये अर्थपूर्ण भूमिका बजावू शकतो, विशेषतः अशा परिस्थितीत जेव्हा युरोपियन युनियन पुरवठादारांमध्ये वेगाने विविधता आणण्याचा आणि जोखीम अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्लास भारत दौऱ्यावर आल्यामुळे हा दौरा विशेष असल्याचे ते म्हणाले.

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होता आले यासाठी, विशेषतः कर्तव्य पथ येथील संचलनाला युरोपियन युनियनच्या उपस्थितीबद्दल काजा कल्लास यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की भारत आणि युरोपियन युनियनने हिंद महासागर क्षेत्रात एकत्र काम केले पाहिजे आणि संयुक्त सरावांद्वारे एकमेकांच्या सर्वोत्तम पद्धतींमधून शिकले पाहिजे. गुरुग्राममधील भारतीय नौदलाच्या इन्फर्मेशन फ्यूजन सेंटर-इंडियन ओशन रिजन (IFC-IOR) येथे संपर्क अधिकारी (LO) नियुक्त करण्याच्या युरोपियन युनियनच्या प्रस्तावाचे संरक्षण मंत्र्यांनी स्वागत केले. IFC-IOR येथे ईयू संपर्क अधिकारी नियुक्त केल्यावर चाचेगिरी रोखण्यात आणि हिंद महासागर प्रदेशातील धोक्यांचे मूल्यांकन करण्यात भारतीय नौदलासोबत परिचालन समन्वय वाढीस लागेल.

* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219150)
आगंतुक पटल : 13