पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया एनर्जी वीक 2026 : गोव्यात जागतिक ऊर्जा नेतृत्व एकत्र येणार – हरदीप सिंग पुरी

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 6:05PM by PIB Mumbai


गोव्यातील ओएनजीसी एटीआय येथे 27-30 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येणारा इंडिया एनर्जी वीक 2026 हा जागतिक ऊर्जा क्षेत्रासाठी निर्णायक असून, जागतिक ऊर्जा मंत्री, उद्योग क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते, वित्तीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र तसेच तंत्रज्ञान पुरवठादार यांना एकत्र आणणारा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय मंच ठरणार आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी 23 जानेवारी रोजी सांगितले. इंडिया एनर्जी वीक 2026 च्या पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संबोधित करताना ते बोलत होते. इंडिया एनर्जी वीक हा या वर्षातील पहिला प्रमुख आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्रम आहे, असे स्पष्ट करतांना, हा मंच ऊर्जा सुरक्षिततेला बळकटी देणे, गुंतवणुकीला चालना देणे तसेच व्यवहार्य कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे मार्ग पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे सिंग यांनी सांगितले. 

कार्यक्रमाची वाढती जागतिक प्रतिष्ठा अधोरेखित करताना पुरी यांनी नमूद केले की, स्थापना झाल्यापासून इंडिया एनर्जी वीकचा विस्तार वर्षागणिक लक्षणीयरीत्या वाढत गेला आहे. 2023 मध्ये झालेल्या पहिल्या आवृत्तीत सुमारे 30 हजार प्रतिनिधी आणि 316 प्रदर्शकांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर 2024 मध्ये सहभागींची संख्या 45 हजारांहून अधिक झाली, तर 2025 मध्ये ही संख्या 68 हजारांपर्यंत पोहोचली. इंडिया एनर्जी वीक 2026 ही आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती ठरण्याची अपेक्षा असून, यात 75 हजारांहून अधिक प्रतिनिधी, 600 पेक्षा जास्त स्टॉलधारक सहभागी होणार असून, 180 आंतरराष्ट्रीय स्टॉलधारकांचा समावेश असेल. 500 हून अधिक जागतिक वक्ते तसेच 120 पेक्षा अधिक परिषद सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. सहभागाचा हा व्यापक स्तर आणि वैविध्य जागतिक ऊर्जा संवादाला दिशा देण्यात भारताची वाढती नेतृत्व भूमिका स्पष्टपणे दर्शविते, असे मंत्र्यांनी अधोरेखित केले.
युएई, कॅनडा, नेदरलँड्स, ओमान, ब्रुनेई, म्यानमार, टांझानिया आणि इतर देशांतील 17 मंत्री आणि उपमंत्री सहभागी होण्याचे निश्चित झाले असून, आंतरराष्ट्रीय संस्था जसे की इंटरनॅशनल एनर्जी फोरम, बिमस्टेक आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियनही कार्यक्रमात सहभागी होतील, असे पुरी म्हणाले. हे प्रदर्शन 11 थीमॅटिक विभागांमध्ये आयोजित केले जाईल, जे अग्रगण्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे प्रायोजित असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या विभागांमध्ये डिजिटलायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, बायोफ्युएल्स, एलएनजी इकोसिस्टम, सिटी गॅस वितरण, ‘मेक इन इंडिया ’ तसेच नेट-झिरो सोल्यूशन्स यांचा समावेश असेल, तसेच नवीन विभागांमध्ये न्यूक्लियर एनर्जी विभाग आणि सस्टेनेबल अव्हिएशन फ्युएल विभाग यांचा समावेश करण्यात आला आहे.
धोरणात्मक परिषद कार्यक्रमाचा संदर्भ देत मंत्री म्हणाले की, इंडीया एनर्जी वीक 2026 ही परिषद जागतिक प्राधान्यक्रम आणि भारताची विकसित होत असलेली नेतृत्वाची भूमिका प्रतिबिंबित करणाऱ्या 10 धोरणात्मक विषयांवर आधारित असेल. या परिषदेत 4 मंत्रीस्तरीय सत्रे असतील, असे त्यांनी सांगितले. यामध्ये उद्घाटन सत्राचाही समावेश असेल, ज्यात ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ धोरणकर्ते एकत्र येतील. यासोबतच, जागतिक उद्योग क्षेत्रातील नेते आणि तज्ज्ञांच्या सहभागासह 47 नेतृत्वात्मक व स्पॉटलाईट पॅनल चर्चा आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय, तंत्रज्ञान, बाजारपेठा आणि शाश्वतता यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांसोबत द्विपक्षीय संवादाच्या स्वरूपातील 5 ‘उर्जा चर्चा’ घेतल्या जातील.

सरकारच्या स्वदेशीकरणावर असलेल्या भरावर भर देत पुरी म्हणाले की, इंजिनिअर्स इंडीय लिमिटेड यांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात येणारे स्वतंत्र ‘मेक इन इंडिया आणि स्वदेशीकरण दालनं’ हे सुक्ष्म आणि लघू उद्योग, विक्रेते आणि स्टार्ट-अप्स यांच्यासोबत सहकार्याला प्रोत्साहन देईल. महत्त्वाच्या उपकरणांचे स्थानिकीकरण करून आत्मनिर्भर भारत या दृष्टीकोनाला बळकटी देणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. या दालनांमध्ये तंत्रज्ञानाधारित परिवर्तन आणि शाश्वततेवर प्रकाश टाकणाऱ्या ‘उर्जा चर्चा’ दररोज आयोजित केल्या जातील. याशिवाय, जपान, अमेरिका, जर्मनी, युनायटेड किंगडम, नेदरलँड्स, नॉर्वे, कॅनडा, रशिया आणि चीन यांसह 11 देशांचे दालनं आंतरराष्ट्रीय सहभाग अधिक दृढ करतील.
इंडीया एनर्जी वीक 2026 ही परिषद ठोस व्यावसायिक परिणाम साध्य करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल, असे पुरी यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान अनेक महत्त्वाचे करार आणि सामंजस्य करार स्वाक्षरीसाठी प्रस्तावित आहेत. यामध्ये ओएनजीसी, जपानमधील मित्सुई ओएलके लिमिटेड लाईन्स आणि दक्षिण कोरियातील सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज यांच्यातील जहाजबांधणीविषयक करारांचा समावेश आहे. तसेच, ब्राझिलियन कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी बीपीसीएल आणि पेट्रोब्रास यांच्यातील टर्म करार, जागतिक अपस्ट्रीम संधींसाठी बीपीआरएल आणि शेल यांच्यातील सहकार्य करार, एलएनजी पुरवठ्यासाठी ओआयएल, एनआरएल आणि टोटल एनर्जीज यांच्यातील सामंजस्य करार, तसेच ओडिशातील परादीप येथे 200 केटीपीए क्षमतेच्या शाश्वत विमान इंधन प्रकल्पाच्या उभारणीसाठी एनआरएल आणि टोटल एनर्जीज यांच्यातील सहकार्य करारांचा यामध्ये समावेश आहे.
उच्चस्तरीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करत मंत्री म्हणाले की, मुख्य परिषदेसोबतच अनेक महत्त्वाचे वेगळे उपक्रम आणि गोलमेज चर्चांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये 9 व्या पंतप्रधान गोलमेज चर्चेचा समावेश असून, यावेळी पंतप्रधान जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि खासगी क्षेत्रातील नेते, तसेच जागतिक पातळीवरील आघाडीच्या ऊर्जा आणि तंत्रज्ञान कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधतील. ही प्रमुख बैठक ऊर्जा क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी आणि गुंतवणूक-आधारित विकास यांना चालना देण्यासाठी भारताची बांधिलकी अधोरेखित करते, असे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये भारत - अरब ऊर्जा संवादाचा समावेश असेल, असे पुरी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय उर्जा मंचासहीत मंत्री या संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवतील. तसेच, टोकियो सत्राचा पुढील भाग म्हणून भारत–जपान ऊर्जा गोलमेज, भूऔष्णिक ऊर्जा आणि कार्बन कॅप्चर, उपयोग व साठवण यांवर लक्ष केंद्रित करणारी भारत–आइसलँड गोलमेज, भारत–नेदरलँड्स ऊर्जा गोलमेज, तसेच ऊर्जा क्षेत्रातील भारत–अमेरिका व्यापार आणि गुंतवणूक संबंध दृढ करण्यासाठी युएसआयबीसी आणि युएसआयएसपीएफ यांच्यासोबत गोलमेज चर्चा आयोजित केल्या जातील. 
मंत्री म्हणाले की, इंडीया एनर्जी वीक 2026 मध्ये नवोन्मेष आणि स्टार्ट-अप्सच्या सहभागावर विशेष भर देण्यात येणार आहे. यासाठी अविन्या 2026 – स्टार्टअप स्पर्धा, जागतिक सहभागासह वसुधा 3.0, तसेच भारतीय माहीती तंत्रज्ञान संस्था यांच्या सहभागातून आयोजित हॅकेथॉन स्पर्धा 2026 अशा उपक्रमांचा समावेश असेल. हा हॅकथॉन ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या आव्हानांवर केंद्रित असेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अन्वेषण, ऊर्जा कार्यक्षमता, हायड्रोजन अर्थव्यवस्था आणि परिपत्र अर्थव्यवस्था यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण ज्ञानाधारित दस्तऐवज सादर करण्यात येणार आहेत, असे पुरी यांनी सांगितले. जैवइंधन वित्तपुरवठ्यावर अधारित श्वेतपत्र, शाश्वत विमान इंधन विषयक मायक्रोसाइट, तसेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था आणि पीपीएसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित होणारा इंडीयन बायोएनर्जी आऊटलुक 2030 अहवाल यांचा समावेश आहे. या ज्ञानविषयक उपक्रमांमुळे उदयोन्मुख ऊर्जा क्षेत्रांमध्ये सूचित धोरणनिर्मिती आणि गुंतवणूकविषयक निर्णयांना भक्कम आधार मिळेल, असे ते म्हणाले. 
इंडीया एनर्जी वीक 2026 ही परिषद ऊर्जा सुरक्षा, आर्थिक वाढ आणि शाश्वतता यांमध्ये समतोल साधण्याबाबत भारताची बांधिलकी अधोरेखित करते, असे पुरी यांनी समारोप करतांना सांगितले. जागतिक ऊर्जा केंद्र म्हणून भारताची भूमिका अधिक बळकट करत, जागतिक ऊर्जा संक्रमणामध्ये भारताला एक विश्वासार्ह आणि प्रभावी आवाज म्हणून स्थान देते, असे त्यांनी सांगितले.

 ***

अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2218118) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam