पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीच्या द्विशताब्दी सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 2:06PM by PIB Mumbai

 

जय स्वामी नारायण

आपण सगळेच आज एका विशेष समारंभात सहभागी झालो आहोत. भगवान स्वामी नारायण यांच्या शिक्षापत्रीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेला हा सोहळा आणि या पावन सोहळ्यातील आपला सहभाग हा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे.  आजच्या या पावन दिनी सर्व संतांना माझे नमन. भगवान स्वामी नारायण यांच्या करोडो भक्तांना या द्विशताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा आणि अभिनंदन.

मित्रांनो,

ज्ञान योग हा भारताचा स्थायीभाव आहे. हजारो वर्षांपूर्वीचे वेद आजही आपले प्रेरणास्थान आहेत. वेदांपासून प्रेरणा घेत आपल्या साधुसंतांनी त्या त्या काळात समाजात विकास घडवला. वेदांपासून उपनिषदांपर्यंत, उपनिषदांपासून पुराणं, श्रुती, स्मृती, कथाकथन, गायन अशा विविध माध्यमातून आपली संस्कृती बहरत गेली, तिचे सामर्थ्य वाढतच राहिले.

मित्रांनो,

विविध कालखंडांमध्ये तत्कालिन गरजेनुसार संतमहात्म्यांनी आणि विचारवंतांनी या परंपरेत भर घातली. भगवान स्वामी नारायण यांनी आपले जीवन लोकशिक्षण आणि लोकसेवेप्रती समर्पित केले होते हे आपण सगळे जाणतोच. शिक्षापत्रीमध्ये त्यांनी आपले हे अनुभव अतिशय सोप्या शब्दांमध्ये मांडले आहेत. त्यातून भगवान स्वामी नारायण यांनी आपल्याला जीवन जगण्याचा अमूल्य मंत्र सांगितला आहे.

मित्रांनो,

शिक्षापत्रीचा आजचा हा द्विशताब्दी सोहळा म्हणजे आपल्या सर्वांसाठीच शिक्षापत्रीमधून नवीन काय शिकता येईल हे तपासून पाहण्याची संधी आहे. आपल्या आयुष्यात आपण या आदर्शांचे कितपत पालन करतो आहोत याचेदेखील मूल्यांकन करण्याची ही संधी आहे.

मित्रांनो,

भगवान स्वामी नारायण यांचे जीवनचरित्र अध्यात्मातून सेवेचे मूर्तीमंत उदाहरण आहे. त्यांचे शिष्य आज समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि मानवसेवेचे अनेक उपक्रम राबवत आहेत. शिक्षण, आरोग्य, शेतकरी कल्याण, पाणी यासाठीचे त्यांचे उपक्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत. तुम्ही सगळे संत आणि हरि भक्तांनी केलेला हा समाजकार्याचा विस्तार प्रेरणादायी आहे.

मित्रांनो,

आज आपल्या देशात स्वदेशी आणि स्वच्छता या लोकचळवळी राबवल्या जात आहेत. ‘व्होकल फॉर लोकल’ हा मंत्र घराघरांत पोहोचला आहे. तुमचे पाठबळ या चळवळींना मिळाले, तर शिक्षापत्रीचा हा द्विशताब्दी सोहळा अजूनच अविस्मरणीय ठरेल. प्राचीन हस्तलिखितांच्या जतनासाठी देशात ज्ञान भारतम अभियान सुरू आहे, हे तुम्हालादेखील माहिती आहे. या कामी तुमच्यासारख्या सगळ्या ज्ञानयोगी संस्थांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. आपल्या भारतातील प्राचीन ज्ञानभांडार आणि त्याचे वेगळेपण आपण जपले पाहिजे. या कामी तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ज्ञान भांडारम अभियानाचे यश कित्येक पटींनी वाढेल. 

मित्रांनो,

सध्या आपल्या देशात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा मोठा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जात आहे. एक हजार वर्षांपूर्वी सोमनाथ मंदीर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्यापासून आतापर्यंत त्याच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांचा प्रवास आपण सोमनाथ स्वाभिमान पर्व म्हणून साजरा करत आहोत. तुम्ही सर्वांनी या उत्सवात सहभागी होऊन त्याचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचवावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुमच्या माध्यमातून भारताच्या विकास यात्रेला भगवान स्वामी नारायणांचा आशीर्वाद मिळत राहील असा मला विश्वास आहे. सर्व संतांना, सर्व हरि भक्तांना आणि सर्व भाविकांना पुन्हा एकदा माझ्या हार्दिक शुभेच्छा.

जय स्वामी नारायण!

कोटी कोटी धन्यवाद!

***

अंबादास यादव/सुरेखा जोशी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2218037) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada