इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज नेदरलँड्समधील वेल्डहोव्हेन येथील एएसएमएल’च्या मुख्यालयाला भेट दिली.

भारताने नवीन सेमीकंडक्टर उद्योगाची सुरुवात केली असून वेफरवर सर्किट छापण्याची प्रक्रिया असलेली लिथोग्राफी ही संपूर्ण सेमीकंडक्टर उत्पादन साखळीतील सर्वात जटिल आणि अत्यंत अचूकता आवश्यक असलेली प्रक्रिया आहे, असे या भेटीत बोलताना वैष्णव यांनी सांगितले.
मंत्र्यांनी माहिती दिली की एएसएमएल ही लिथोग्राफिक साधनांची जगातील अग्रगण्य पुरवठादार कंपनी असल्याचे सांगत मंत्र्यांनी माहिती दिली की जगातील प्रत्येक चिपच्या निर्मितीत एएसएमएल ची उपकरणे वापरली जातात. "धोलेरा येथील आमच्या फॅबमध्ये एएसएमएल’ची उपकरणे वापरली जाणार आहेत. त्यामुळे त्यांचे तंत्रज्ञानाला समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे," असे वैष्णव म्हणाले.
एएसएमएल भारतात येणे ही एक महत्त्वपूर्ण घडामोड असेल, यावर त्यांनी भर दिला. देशाची डिझाइन क्षमता, मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुसंगत धोरणांमुळे जगभरातील अनेक उपकरण उत्पादक आता भारतात आपला तळ स्थापन करण्याचा विचार करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

एएसएमएल’ बद्दल
एएसएमएल ही सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगातील अग्रगण्य पुरवठादार कंपनी आहे. ही डच बहुराष्ट्रीय कंपनी एकात्मिक सर्किट तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फोटोलिथोग्राफी मशीनच्या विकास आणि उत्पादनामध्ये तरबेज आहे. ही कंपनी आघाडीच्या चिप उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर सिलिकॉनवर सूक्ष्म नमुने तयार करण्यास सक्षम करते, ज्यामुळे लहान, वेगवान आणि अधिक ऊर्जा-कार्यक्षम चिप्स तयार करता येतात.
एएसएमएल’च्या एका शिष्टमंडळाने सेमीकॉन इंडिया 2025 मध्ये भाग घेतला होता आणि भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासात भागीदार होण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली होती.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर