सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

25 वा भारत रंग महोत्सव 2026 भारतातील 40 ठिकाणी आणि सातही खंडांमधील प्रत्येकी एका देशात अभूतपूर्व भव्य स्वरूपात साजरा होणार


228 भाषा आणि बोलींमधील 277 भारतीय तर 12 आंतरराष्ट्रीय प्रस्तुतींचा समावेश

थिएटर बाजारच्या माध्यमातून नवीन नाटककारांना प्रोत्साहन; 'श्रुती' अंतर्गत 17 पुस्तके प्रकाशित होणार; महिला दिग्दर्शकांच्या 33 नाट्यकृतींचा समावेश

स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि नाट्यकर्मींना आदरांजली म्हणून विशेष सादरीकरणे

प्रविष्टि तिथि: 22 JAN 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जानेवारी 2026

 

राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) च्या वतीने 27 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भारत रंग महोत्सव (बीआरएम) 2026 या जगातील सर्वात भव्य आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाच्या 25 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार असून यंदाचा हा महोत्सव आजवरचा सर्वात व्यापक आणि समावेशक असणार आहे.

भारत रंग महोत्सव 2026 हा महत्त्वाचा टप्पा असून त्याअंतर्गत देशभरातील 40 ठिकाणी नाट्यप्रयोग सादर केले जातील, तसेच  सात खंडांमधील प्रत्येकी किमान एका देशातील निर्मिती असेल, त्यामुळे महोत्सवाची जागतिक  पोहोच आणि सांस्कृतिक क्षेत्रात वाजणारा त्याचा डंका अधिक दृढ होईल.

या महोत्सवात एकूण 277 भारतीय प्रस्तुती सादर केल्या जातील, त्यामध्ये 136 निवडक नाटके आणि आमंत्रित प्रस्तुती, तसेच 12 आंतरराष्ट्रीय निर्मितींचा समावेश असेल. या निर्मितींमध्ये 228 भारतीय आणि परदेशी भाषांतील तसेच बोलीभाषांमधील सादरीकरणांचा समावेश आहे, ज्यामुळे भारत रंग महोत्सव भाषिक विविधतेच्या बाबतीत जगातील सर्वात मोठा रंगभूमी महोत्सव ठरला आहे.

महोत्सवात सहभागासाठी आलेल्या 817 राष्ट्रीय आणि 34 आंतरराष्ट्रीय अर्जांच्या  कठोर चाचणी प्रक्रियेतून नाटकांची निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त, महोत्सवात विविध केंद्रांमध्ये 19 विद्यापीठांसह 14 स्थानिक प्रस्तुतींचाही महोत्सवात समावेश आहे. 

याप्रसंगी बोलताना, एनएसडीचे उपाध्यक्ष प्रा. भरत गुप्त म्हणाले: “भारत रंग महोत्सव 2026 हा केवळ उद्देश म्हणून नव्हे तर एकूणच  व्यापक स्वरूपात रंगभूमीच्या लोकशाहीकरण आणि सार्वत्रिकीकरणाचे प्रतीक आहे.  हा महोत्सव विविध समुदाय आणि वयोगटाच्या विविध भाषा, शैली आणि नाट्य अभिव्यक्तींचा समावेश करून सामायिक सर्जनशील सातत्य राखण्याच्या भारताच्या नीतिमत्तेचे प्रतिबिंबित करतो.”

या आवृत्तीने  मैथिली, भोजपुरी, तुळु, उर्दू, संस्कृत, ताई खामटी, न्यशी यांसह जवळजवळ सर्व प्रमुख भारतीय भाषा आणि अनेक आदिवासी आणि विलुप्तप्राय भाषांसह सादरीकरणे करून भाषिक आणि सांस्कृतिक पटल  लक्षणीयरित्या  विस्तारले  आहे.

पहिल्यांदाच, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दमण आणि दीव, आयझॉल (मिझोरम), तुरा (मेघालय), नागाव (आसाम), मंडी (हिमाचल प्रदेश) आणि रोहतक (हरियाणा) यासह अनेक नवीन केंद्रे जोडण्यात आली आहेत.

या महोत्सवाची भावना अधोरेखित करताना, एनएसडीचे संचालक चित्तरंजन त्रिपाठी म्हणाले: "25 वा भारत रंग महोत्सव हा लोकांचा , लोकांद्वारे आणि लोकांसाठी रंगभूमीचा महाकुंभ आहे. हा एक सर्वसमावेशक, सामान्यांचा आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आहे जिथे भाषा, प्रदेश, सौंदर्यशास्त्र आणि विचारसरणी विविध नाट्यरूपांमधून एकत्र येतात."

भारत रंग महोत्सव 2026 मध्ये आदिरंग महोत्सव (आदिवासी रंगभूमी, नृत्य आणि हस्तकला), जश्ने बचपन (बाल रंगभूमी), बाल संगम (मुलांद्वारे  लोकनृत्य आणि नाटक), पूर्वोत्तर नाट्य समारोह (ईशान्य रंगभूमी), कठपुतळी रंगभूमी महोत्सव, नृत्य नाट्य महोत्सव, शास्त्रीय संस्कृत नाट्य महोत्सव आणि लघु नाट्य महोत्सव यासह विविध प्रकारचे नाट्य महोत्सव सादर केले जातील.

प्रथमच, ट्रान्सजेंडर समुदाय, लैंगिक कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि इतर कमी प्रतिनिधित्व असलेल्या गटांची निर्मिती प्रस्तुत केली जाणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा, लोकमाता अहिल्याबाई होळकर आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना उजाळा दिला जाईल. तसेच रतन थियाम, दया प्रकाश सिन्हा, बन्सी कौल आणि आलोक चॅटर्जी यांसारख्या रंगभूमीवरील दिग्गज कलावंतांना आदरांजली वाहिली जाणार आहे. इब्राहिम अल्काझी यांच्या सन्मानार्थ नवी दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) संकुलात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन केले जाईल. यासोबतच, कर्करोगावर मात केलेल्या आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या कलावंताने लिहिलेले तसेच सादर केलेले एक नाट्य सादरीकरणही यावेळी होणार आहे.

लोककलांचे सादरीकरण, पथनाट्य, चर्चासत्रे, मास्टर क्लासेस आणि कार्यशाळा असे उपक्रम या महोत्सवाचा अविभाज्य भाग असतील. राष्ट्रीय नाट्य विद्यालय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात अद्वितीय (Advitiya) या विशेष विभागातंर्गत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संकुलात संवाद सत्रे आणि नुक्कड नाटक- म्हणजेच  पथनाटकांच्या सादरीकरणाचे आयोजनही केले जाईल.

‘थिएटर बाजार’  हे या महोत्सवातले आणखी एक मुख्य आकर्षण असणार आहे. याअंतर्गत नव्याने लिहिलेल्या नाटकांना प्रोत्साहन दिले जाईल. यातील निवडक नाटकांना पुरस्कार देऊन ती प्रकाशित केली जाणार आहेत. ‘श्रुती’  या उपक्रमांतर्गत 17 पुस्तकांचे प्रकाशन केले जाईल. विशेष म्हणजे, महिलांनी दिग्दर्शित केलेल्या 33 नाटकांचे सादरीकरण या महोत्सवात केले जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि नामवंत रंगभूमी तज्ज्ञांच्या सन्मानार्थ विशेष सादरीकरणे देखील होणार आहेत.

या महोत्सवात भारताच्या विविध खाद्यपरंपरा आणि पारंपरिक हस्तकलांचे दर्शन घडवणारे विशेष स्टॉल्स असतील, यामुळे या महोत्सवानिमित्त मिळणार्‍या सांस्कृतिक अनुभवात अधिकची भर पडणार आहे.

'भारत रंग महोत्सव 2026' चे भव्य स्वरूप लक्षात घेता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या सांस्कृतिक तसेच शैक्षणिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये मैथिली-भोजपुरी अकादमी, हिंदी अकादमी, गढवाली-कुमाऊनी-जौनसारी अकादमी आणि उर्दू अकादमी (दिल्ली सरकार) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये नॅशनल पोलिश थिएटर अकादमी (वॉर्सा), नॅशनल अकादमी ऑफ थिएटर अँड फिल्म आर्ट्स (माद्रिद) आणि रशियन इन्स्टिट्यूट ऑफ थिएटर आर्ट्स –  जीआयटीआयएस  (मॉस्को) यांचा समावेश असून, भारताच्या विविध राज्यांचे आणि सांस्कृतिक संस्थांचेही या महोत्सवाला पाठबळ लाभले आहे.

 

* * *

सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217356) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Kannada , Urdu , Telugu , Malayalam