पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि पहिल्या शयनयान वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ
विकसित भारताच्या संकल्पनेसाठी, पूर्व भारताचा विकास ही प्राथमिकता आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे: पंतप्रधान
काल, देशातील पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे पश्चिम बंगालमधून सुरू करण्यात आली; राज्याला जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत जलदगती रेल्वेगाड्या देखील मिळाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत जलद रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरू झाले आहे: पंतप्रधान
बालागढ येथे बांधली जाणारी विस्तारित बंदर प्रवेशद्वार प्रणाली हुगळी आणि आसपासच्या भागासाठी नवीन संधींचे मार्ग उघडेल: पंतप्रधान
आज भारत बहुविध वाहतूक जोडणी आणि हरित गतीशीलता यावर विशेष भर देत आहे; अखंड वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी बंदरे, नदी जलमार्ग, महामार्ग आणि विमानतळ हे सर्व एकमेकांशी जोडले जात आहेत: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
18 JAN 2026 3:53PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. याप्रसंगी जनसभेला संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, काल ते मालदामध्ये होते आणि आज त्यांना हुगळीतील लोकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यांनी अधोरेखित केले की विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास आवश्यक आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. काल आणि आजचे कार्यक्रम या संकल्पाला बळ देतात, असे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
मोदी यांनी अधोरेखित केले की, काल देशातील पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे पश्चिम बंगालमधून सुरू झाली. ते पुढे म्हणाले की, बंगालला जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत जलद रेल्वेगाड्याही मिळाल्या आहेत. आज आणखी तीन अमृत भारत जलद गाड्या सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. यापैकी एक गाडी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी आणि बंगालमधील जोडणी अधिक मजबूत करेल, असे त्यांनी सांगितले. दिल्ली आणि तामिळनाडूसाठीही अमृत भारत जलद गाड्या सुरू करण्यात आल्याचे त्यांनी पुढे सांगितले. पश्चिम बंगालच्या रेल्वे जोडणीसाठी गेल्या 24 तासांचा काळ अभूतपूर्व राहिला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदींनी निरीक्षण नोंदवले की, बंगालमध्ये जलमार्गांची मोठी क्षमता आहे आणि केंद्र सरकार यावरही काम करत आहे. बंदर-आधारित विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मदत दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. थोड्या वेळापूर्वी बंदरे आणि नदी जलमार्गांशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगाल आणि भारताच्या विकासासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आधारावर पश्चिम बंगालला निर्मिती, व्यापार आणि दळणवळणाचे मोठे केंद्र म्हणून विकसित केले जाऊ शकते, असे हे स्तंभ आहेत, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पांबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचे अभिनंदन केले.
बंदरे आणि त्यांच्याशी संबंधित परिसंस्थेवर अधिक भर दिल्यास, अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे त्यांनी अधोरेखित केले. गेल्या 11 वर्षांत केंद्र सरकारने श्यामा प्रसाद मुखर्जी बंदराच्या क्षमता विस्तारासाठी मोठी गुंतवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सागरमाला योजनेअंतर्गत, या बंदराचे संपर्कजाळे सुधारण्यासाठी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रयत्नांचे परिणाम आता दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी, कोलकाता बंदराने गेल्या वर्षी मालवाहतूक हाताळणीमध्ये नवे विक्रम प्रस्थापित केल्याचेही सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालागढमध्ये विकसित केले जात असणारे विस्तारित बंदर द्वार प्रणाली हुगळी आणि आसपासच्या परिसरासाठी नवीन संधी निर्माण करेल असेही नमूद केले. यामुळे कोलकाता शहरातील रहदारी आणि दळणवळणावरील ताण कमी होईल असे त्यांनी अधोरेखित केले. गंगा नदीवर बांधलेल्या जलमार्गामुळे मालवाहतुकीत वृद्धी होईल असेही ते म्हणाले. या सर्व पायाभूत सुविधा हुगळीला गोदाम आणि व्यापार केंद्र म्हणून रूपांतरित होण्यास मदत करतील. त्यामुळे शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, हजारो रोजगार निर्माण होतील, लहान व्यापारी आणि वाहतूकदारांना फायदा होईल तसेच शेतकरी आणि उत्पादकांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
मोदी यांनी, भारत आज बहुआयामी संपर्कजाळे आणि हरित गतिशीलता यांच्यावर अधिक भर देत असल्याचे अधोरेखित केले. विना अडथळा वाहतूक सुलभ होण्यासाठी बंदरे, नदी जलमार्ग, महामार्ग आणि विमानतळ एकमेकांशी जोडले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच यामुळे दळणवळणाचा खर्च आणि वाहतुकीचा वेळ दोन्ही कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना, वाहतुकीची साधने पर्यावरणपूरक असावी याची खात्री करण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याचे ते म्हणाले. हायब्रीड इलेक्ट्रीक नौकांमुळे नदी वाहतूक आणि हरित गतिशीलतेला बळकटी मिळेल त्यामधून हुगळी नदीचा प्रवास सुलभ होईल, प्रदूषणांत घट होईल आणि नदीआधारित पर्यटनाला चालना मिळेल असेही त्यांनी निदर्शनास आणले.
पंतप्रधानांनी, भारत वेगाने मत्स्यव्यवसाय आणि सागरी उत्पादनांच्या आणि निर्यातीच्या क्षेत्रात प्रगती करत असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यांचे पश्चिम बंगालने या क्षेत्रात देशाचे नेतृत्व करावे हे स्वप्न सामाईक केले. केंद्र सरकार पश्चिम बंगालमधील नदी जल मार्गाच्या दृष्टीकोनाला प्रामुख्याने पाठिंबा देत असल्याचे त्यांनी अधोरेखित करत त्याचा फायदा शेतकरी आणि मच्छिमारांना आधीच होऊ लागल्याचे नमूद केले. मोदी यांनी, केंद्र सरकारकडून राबवले जाणारे हे सर्व प्रकल्प पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला गतिमान करतील अशी टिप्पणी केली. या प्रकल्पांसाठी त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, शांतनू ठाकूर, सुकांता मजुमदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी हुगळी मधील सिंगूर इथे रु 830 कोटींहून जास्त किमतीच्या अनेक विकासप्रकल्पांचे भूमिपूजन व उदघाटन केले.
पंतप्रधानांनी बालागढ इथल्या अंतर्देशीय जलवाहतूक टर्मिनल व रस्तापार पुलासह विस्तारित बंदर द्वार यंत्रणेची पायाभरणी केली
बालागढ मध्ये सुमारे 900 एकर जागेवर आधुनिक मालवाहतूक टर्मिनलचा विकास केला जात असून त्याची क्षमता 27 लाख टन प्रति वर्ष अपेक्षित आहे. या प्रकल्पात 2 विशेष मालवाहतूक जेट्टी बांधल्या जाणार असून त्यातील एक जेट्टी कंटेनरसाठी व दुसरी जेट्टी सुक्या मालवाहतुकीसाठी असेल.
बालगढ मध्ये येणाऱ्या मालवाहतूक टर्मिनलमुळे शहरातील गर्दी टाळून वेगाने मालवाहतूक करणे सोयीचे होणार आहे. यामुळे रस्तासुरक्षा राखून वाहतूक कोंडी टाळता येईल व कोलकाता शहरातील प्रदूषण कमी होऊन नागरिकांचे जीवन सुसह्य होईल. वाहतुकीच्या विविध साधनांचा वापर केल्यामुळे दळणवळणाची कार्यक्षमता वाढेल तसेच स्थानिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी व शेतकऱ्यांसाठी रास्त दरात बाजारपेठांच्या दिशेने वाहतूक उपलब्ध होईल. या प्रकल्पातून स्थानिक युवकांना वाहतूक,टर्मिनल वापर, देखभाल सेवा आणि इतर क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधानांनी कोलकाता येथे अत्याधुनिक इलेक्ट्रिक कॅटामरानचेही उद्घाटन केले. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने देशांतर्गत जलवाहतुकीसाठी तयार केलेल्या स्वदेशी बनावटीच्या 6 इलेक्ट्रिक कॅटामरानपैकी हे एक आहे. प्रगत इलेक्ट्रिक प्रोपल्शन सिस्टीम आणि लिथियम-टायटनेट बॅटरी तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली 50 प्रवासी क्षमता असलेली ही हायब्रीड इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम कॅटामरान, पूर्णपणे इलेक्ट्रिक अर्थात शून्य-उत्सर्जन पद्धतीने तसेच मोठ्या कालावधीसाठी हायब्रीड पद्धतीने चालण्यास सक्षम आहे. ही नौका हुगळी नदीकाठी शहरी जल वाहतूक, पर्यावरणपूरक पर्यटन आणि शेवटच्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीला मदत करेल.
पंतप्रधानांनी जयरामबाटी–बरोगोपीनाथपूर–मायनापूर या नवीन रेल्वे मार्गाचेही उद्घाटन केले. हा मार्ग तारकेश्वर–विष्णुपूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या नवीन रेल्वे मार्गासोबतच, मयनापूर आणि जयरामबाटी दरम्यान, बरोगोपीनाथपूर येथे थांबा असलेली एक नवीन रेल्वे सेवा देखील सुरू केली जाईल. यामुळे बांकुरा जिल्ह्यातील रहिवाशांना थेट रेल्वे संपर्क मिळेल, त्यामुळे दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी आणि तीर्थयात्रेकरूंसाठी प्रवास अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर होईल.
पंतप्रधानांनी कोलकाता (हावडा) - आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस; कोलकाता (सियालदा ) - बनारस अमृत भारत एक्सप्रेस; कोलकाता (सांतरागाछी) - तांबरम अमृत भारत एक्सप्रेस या तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
***
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/उमा रायकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215895)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada