पंतप्रधान कार्यालय
आसाममधील गुवाहाटी इथे बोडो पारंपरिक संस्कृतिक बगुरूम्बा दोहो कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2026 8:47PM by PIB Mumbai
नमोश्कार ! खुलुम्बोई !!
मा खोबोर ? माघ बिहु आरू माघ दोमाशीर हुभेच्छा आरू मरोम जोनादशु.
आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, केंद्रातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, पवित्रा मार्गारीटा, आसाम विधानसभेचे अध्यक्ष विश्वजित दोईमारी, बोडोभूमी प्रादेशिक परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य हाग्रामा मोहिलारी, राज्य सरकारचे मंत्री, सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू-भगिनी आणि आसामच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,
आसामची संस्कृती आणि बोडो परंपरा जवळून पाहण्याची संधी मिळाली हे माझे सद्भाग्य आहे. पंतप्रधान म्हणून मी जितक्या वेळा आसामला भेट दिली, तितक्या वेळा याआधी इतर कोणत्याही पंतप्रधानाने आसामला भेट दिली नाही. आसामच्या कला आणि संस्कृतीला मोठे व्यासपीठ मिळावे अशी माझी नेहमीच इच्छा असते. अशा भव्य कार्यक्रमांद्वारे आसामची वेगळी ओळख देशात आणि जगामध्ये निर्माण व्हावी, यासाठी यापूर्वीही सतत प्रयत्न केले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात होणारे बिहू उत्सव असोत, झुमोइर बिनोंदिनी उत्सव असो, अथवा दिल्लीत दीड वर्षापूर्वी आयोजित भव्य बोडोलँड महोत्सव असोत किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असोत, आसामच्या कला आणि संस्कृतीचा अवर्णनीय, अद्भूत आनंद अनुभवण्याची संधी मी कधीही सोडत नाही. आज, बागुरुम्बा पुन्हा एकदा आयोजित केला जात आहे. हा कार्यक्रम बोडोची वेगळी ओळख दाखवणारा एक उत्साही, चैतन्यादायी उत्सव आहे. हा कार्यक्रम बोडो समुदाय आणि आसामचा वारसा यांचा एक गौरव आहे, सन्मान आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्वांना आणि विशेषतः सर्व कलाकारांना माझ्या शुभेच्छा देतो आणि त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.
मित्रांनो,
'बागुरुम्बा दोहो' हा केवळ एक उत्सव नाही. तर ते आपल्या महान बोडो परंपरेचा सन्मान करण्याचे एक माध्यम आहे. बोडो समुदायाच्या महान व्यक्तींचे स्मरण करण्याचे हे माध्यम आहे. बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा, गुरुदेव कालीचरण ब्रह्मा, रूपनाथ ब्रह्मा, सतीश चंद्र बसुमतारी, मोरादम ब्रह्मा, कनकेश्वर नार्जरी - अशा अनेक महान व्यक्तित्त्वांनी सामाजिक सुधारणा, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि राजकीय जाणीवा बळकट केल्या आहेत. या प्रसंगी, मी बोडो समुदायाच्या सर्व महान व्यक्तींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रांनो,
भाजपा आसामच्या संस्कृतीला संपूर्ण भारताचा अभिमान,गौरव मानते. भारताचा इतिहास आसामच्या भूतकाळातून परिपूर्ण होतो. आणि म्हणूनच, भाजपा सरकारच्या काळात, बागुरुंबा दहोउसारखे भव्य उत्सव साजरे केले जातात, बिहूला राष्ट्रीय मान्यता दिली जाते, आमच्या प्रयत्नांमुळे शोराइदेउ मोइदमचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे आणि आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
बंधू आणि भगिनींनो,
आम्ही बोडो भाषेला आसामच्या सहयोगी अधिकृत भाषेचा दर्जा देखील दिला आहे. बोडो भाषेतील शिक्षण प्रक्रिया बळकट करण्यासाठी एक स्वतंत्र संचालनालय स्थापन करण्यात आले आहे. या वचनबद्धतेमुळे, बाथोउू धर्माला पूर्ण आदराने मान्यता देण्यात आली आहे आणि बाथोउू पूजेच्या दिवशी राज्यामध्ये सुट्टी घोषित करण्यात आली आहे. भाजपा सरकारनेच महान योद्धा लसित बोरफुकन यांचा भव्य पुतळा स्थापित केला. त्याच वेळी बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. त्याचप्रमाणे, भाजपा सरकार आसामच्या प्रत्येक वारशाचा आणि अभिमानाचा गौरव करते. श्रीमंत शंकरदेव यांच्या भक्ती आणि सामाजिक सौहार्दाची परंपरा, ज्योतिप्रसाद अग्रवालांची कला आणि चेतना यांचा सन्मान करणे आम्ही आपले सद्भाग्य मानतो. योगायोगाने, आज ज्योतिप्रसाद अग्रवाल यांची पुण्यतिथी आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
मित्रांनो,
आज जेव्हा मी इथे आलो आहे, तेव्हा माझ्या मनात कितीतरी विचार येत आहेत! माझा आसाम किती प्रगती करत आहे, हे पाहून मी भावुक होत आहे. एकेकाळी जिथे दररोज रक्तपात व्हायचा, आज तिथे संस्कृतीचे अद्भुत रंग सजले आहेत! एकेकाळी जिथे गोळ्यांचा आवाज घुमायचा, आज तिथे 'खाम' आणि 'सिफुन्ग'चे मधुर स्वर ऐकू येत आहेत. पूर्वी जिथे संचारबंदीचा शुकशुकाट असायचा, आज तिथे संगीताचे सूर घुमत आहेत. पूर्वी जिथे अशांती आणि अस्थिरता होती, आज तिथे 'बागुरुम्बा'ची अशी आकर्षक सादरीकरणे होत आहेत. हे भव्य आयोजन केवळ आसामचे यश नाही, तर हे यश संपूर्ण भारताचे आहे. आसामच्या या बदलाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.
मित्रांनो,
माझ्या आसामी जनतेने, माझ्या बोडो बंधू-भगिनींनी, यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला, याचे मला समाधान आहे. तुम्ही डबल इंजिन सरकारला शांतता आणि विकासाची जी जबाबदारी दिली होती, तुमच्या आशीर्वादाने आम्ही ती पूर्ण करून दाखवली आहे. 2020 च्या बोडो शांतता करारामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. या करारानंतर विश्वास पुन्हा निर्माण झाला आणि हजारो तरुणांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला. करारानंतर बोडो क्षेत्रात शिक्षण आणि विकासाच्या नवीन संधी निर्माण झाल्या. शांतता केवळ कायदा आणि सुव्यवस्थेपुरती मर्यादित राहिली नाही, तर ती दैनंदिन जीवनाचा भाग बनली आणि यामध्ये तुमच्या प्रयत्नांची सर्वात मोठी भूमिका राहिली आहे.
मित्रांनो,
आसामची शांतता, आसामचा विकास आणि आसामचा गौरव, या सर्वांच्या केंद्रस्थानी जर कोणी असेल, तर तो आसामचा युवक आहे. आसामच्या तरुणांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी जो मार्ग निवडला आहे, तो मला आणि आपल्याला सर्वांना उज्ज्वल भविष्यापर्यंत घेऊन जायचा आहे. शांतता करारापासूनच आमचे सरकार बोडोलँडच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. सरकारने पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने पुढे नेली आहे, हजारो तरुणांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत दिली गेली आहे, जेणेकरून ते एक नवीन सुरुवात करू शकतील!
मित्रांनो,
भाजप सरकारच्या प्रयत्नांचे फळ आज आपल्या सर्वांसमोर आहे. माझे प्रतिभावान बोडो तरुण आज आसामचे सांस्कृतिक दूत बनत आहेत. क्रीडा क्षेत्रातही बोडो समाजाची मुले-मुली नाव उज्ज्वल करत आहेत. ते आज नवीन विश्वासाने उघडपणे नवीन स्वप्ने पाहत आहेत, आपली स्वप्ने पूर्ण करत आहेत आणि आसामच्या विकासालाही गती देत आहेत.
मित्रांनो,
जेव्हा आपण आसामची कला, संस्कृती आणि ओळखीचा सन्मान करतो, तेव्हा काही लोक असेही आहेत ज्यांना त्रास होतो. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, आसामचा सन्मान कोणत्या पक्षाच्या लोकांना आवडत नाही? उत्तर एकच आहे - काँग्रेस पक्ष! तो कोणता पक्ष आहे, ज्याने भूपेन हजारिकाजींना 'भारतरत्न' देण्यास विरोध केला होता? काँग्रेस पक्ष! आसाममध्ये सेमीकंडक्टर युनिटला कोणत्या पक्षाने विरोध केला होता? स्वतः काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील एका मंत्र्याने, जे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे सुपुत्र देखील आहेत. त्यांनी सेमीकंडक्टर युनिट आसाममध्ये का लावले जात आहे, याला विरोध केला.
मित्रांनो,
आजही जेव्हा मी आसामच्या संस्कृतीशी संबंधित एखादी गोष्ट परिधान करतो, जर 'गमोछा', जर गमोछा माझ्यासोबत असेल, तर कोणता पक्ष आसामची थट्टा उडवतो? काँग्रेस पक्ष.
भावा-बहिणींनो,
आसाम आणि बोडोलँड क्षेत्र इतकी दशके मुख्य प्रवाहापासून तुटलेले राहिले, याला केवळ आणि केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसने आपल्या राजकीय फायद्यासाठी आसाममध्ये अस्थिरता निर्माण केली, काँग्रेसने आसामला हिंसेच्या आगीत ढकलले. स्वातंत्र्यानंतर आसामसमोरही आपली आव्हाने होती! पण, काँग्रेसने काय केले? काँग्रेसने त्या समस्यांवर तोडगा शोधण्याऐवजी, त्यावर आपली राजकीय पोळी भाजली. गरज विश्वासाची होती पण, काँग्रेसने फाटाफूट वाढवली. गरज संवादाची होती, पण काँग्रेसने दुर्लक्ष केले, चर्चेचे रस्ते बंद केले! विशेषतः बोडोलँड क्षेत्र, बोडोलँडच्या लोकांचा आवाज कधी नीट ऐकलाच गेला नाही. जेव्हा गरज आपल्या लोकांच्या जखमा भरण्याची होती, जेव्हा गरज आसामच्या लोकांची सेवा करण्याची होती, तेव्हा काँग्रेस घुसखोरांसाठी आसामचे दरवाजे उघडून त्यांचे स्वागत करण्यात मग्न होती.
मित्रांनो,
काँग्रेस आसाममधील नागरिकांना आपले मानत नाही. काँग्रेसच्या नेत्यांना परदेशी घुसखोरांना अधिक प्राधान्य देतात कारण ते इथे राहून काँग्रेसची मतपेटी तयार होतात. त्यामुळे, काँग्रेसच्या राजवटीत परदेशी घुसखोर येत राहिले, आसामच्या लाखो एकर जमिनीवर आक्रमण करत राहिले, आणि काँग्रेस त्यांना मदत करत राहिली. मला आनंद वाटतो की, आज हेमंतजींच्या सरकार आसाममधील लोकांच्या मालकीची लाखो एकर जमीन घुसखोरांकडून मुक्त करत आहे.
मित्रांनो,
काँग्रेसने नेहमीच आसाम आणि ईशान्येकडील राज्यांकडे तुच्छतेने पाहात आले आहे. काँग्रेसच्या ज्या लोकांना ईशान्येकडील राज्यांचा विकास महत्त्वाचा वाटला नाही, ते आसामच्या विकासावर लक्ष केंद्रित तरी कसे करू शकले असते? बोडो प्रदेशांच्या आशा-अपेक्षांचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ तरी कुठे होता? त्यामुळेच, काँग्रेसच्या सरकारने जाणूनबुजून या प्रदेशाला अडचणींमध्ये टाकले.
बंधू आणि भगिनींनो,
काँग्रेसने केलेली ही सर्व पापे धुवून काढण्याचे कामही आमचे दुहेरी इंजिन सरकार करते आहे. आज, ज्या वेगाने इथे विकास होतो आहे, तो तुमच्या समोर आहे. आम्ही बोडो-कचारी कल्याण स्वायत्त परिषदेची स्थापना केली आहे, हे तुम्ही पाहाताय. बोडोलँड क्षेत्रात अधिक चांगला विकास व्हावा यासाठी 1500 कोटी रुपयांचे विशेष विकास पॅकेज देण्यात आले. कोकराझारमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू केले. तमुलपूरमध्येही वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. नर्सिंग महाविद्यालय आणि पॅरामेडिकल संस्थांद्वारे तरुणांना नव्या संधी उपलब्ध होत आहेत. गोबरधना, परबतझोरा आणि होरिसांगा सारख्या प्रदेशांमध्ये पॉलीटेक्निक आणि प्रशिक्षण संस्थाही सुरू झाल्या आहेत.
मित्रांनो,
बोडोलँडसाठी स्वतंत्र कल्याण विभाग आणि बोडोलँड प्रशासकीय कर्मचारी महाविद्यालयाचीही स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे बोडो समुदायाच्या कल्याणासाठी आणि चांगल्या धोरण निर्मितीसाठी मदत मिळते आहे.
मित्रांनो,
भाजपच्या सरकारने मनामनांतील दुरावा दूर केला आहे, आसाम आणि दिल्लीतील अंतर मिटवले आहे आणि सुधारित पायाभूत सुविधांद्वारे, आसामच्या प्रदेशांतील अंतर कमी होते आहे. पूर्वी ज्या ठिकाणी पोहोचणे कठीण होते, तिथे आज महामार्ग तयार केले जात आहेत. नव्या रोजगार संधी निर्माण करणारे रस्ते तयार केले जात आहेत. कोकराझारला भूतनाच्या सीमेशी जोडणाऱ्या बिशमुरी-सरालपारा रस्ते प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. कोकराझार ते भूतानच्या गेलेफू पर्यंत प्रस्तावित रेल्वे परियोजना हे देखील एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही विशेष रेल्वे प्रकल्प असल्याची घोषणा आम्ही केली आङे. अॅक्ट ईस्ट धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग म्हणून याकडे पाहिले जाते. ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर व्यापार आणि पर्यटन दोन्हीला प्रोत्साहन मिळणार आहे.
मित्रांनो,
समाज आपल्या मूळांशी जोडलेला राहतो, जेव्हा परस्पर संवाद आणि विश्वास बळकट होतो आणि प्रत्येक वर्गाला समान संधी प्राप्त होतात तेव्हा सकारात्मक बदल दिसून येतात. आसाम आणि बोडोलँड यांचा प्रवास याच दिशेने प्रगतीपथावर आहे. आसामचा आत्मविश्वास, आसामचे सामर्थ्य आणि आसामच्या प्रगतीतून, भारताच्या विकासगाथेला नवे बळ मिळते आहे. आसाम आज वेगाने प्रगती करणाऱ्या राज्यांपैकी एक अशी ओळख बनवत आहे. आसामची अर्थव्यवस्था गतिमान होत आहे. या विकासामध्ये, या बदलामध्ये बोडोलँडचे लोक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मी पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
***
नेहा कुलकर्णी / शैलेश पाटील / सुवर्णा बेडेकर / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215770)
आगंतुक पटल : 6