संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माजी सैनिक हे राष्ट्रीय चेतनेचे जिवंत आधारस्तंभ, सामूहिक धैर्याचे प्रतीक आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत : संरक्षण मंत्री

प्रविष्टि तिथि: 14 JAN 2026 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2026

14 जानेवारी 2026 रोजी 10व्या संरक्षण दल माजी सैनिक दिनाच्या निमित्ताने देशभरात आयोजित कार्यक्रमांच्या मालिकेत माजी सैनिकांच्या रॅली, पुष्पचक्र अर्पण समारंभ, तक्रार निवारण केंद्रे आणि सुविधा मदत कक्ष यांचा समावेश होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथील मानेकशॉ सेंटरमधील मुख्य सोहळ्याला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात दिल्ली/एनसीआरमधील सुमारे 2,500 माजी सैनिकांनी भाग घेतला.

संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात माजी सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि समर्पित सेवेला आदरांजली वाहिली आणि माजी सैनिकांना राष्ट्रीय चेतनेचे जिवंत आधारस्तंभ, सामूहिक धैर्याचे प्रतीक आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत असे संबोधले. संरक्षण मंत्र्यांनी माजी सैनिकांना आपल्या अनुभवातून तरुणांना मार्गदर्शन करण्याचे; अग्निवीर आणि तरुण सैनिकांना योग्य दिशा देण्याचे; आपत्कालीन परिस्थितीत नागरी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहण्याचे; सामाजिक सलोखा वाढवण्याचे; आणि तळाच्या स्तरापर्यंत देशभक्तीची भावना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले, जेणेकरून भविष्यासाठी एका सशक्त भारताचा पाया घातला जाईल.

“आज भारत वेगाने एक मजबूत, आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा वेळी, माजी सैनिकांचा अनुभव, नेतृत्व आणि मूल्ये ही देशासाठी अमूल्य संपत्ती आहेत. आपल्या समाजाला, विशेषतः तरुणांना, तुमच्याकडून शिकण्याची गरज आहे. शिक्षण असो, कौशल्य विकास असो, आपत्ती व्यवस्थापन असो, सामुदायिक नेतृत्व असो किंवा नवोन्मेषाचा मार्ग असो, तुमचा सहभाग भावी पिढ्यांवर सकारात्मक आणि चिरस्थायी प्रभाव टाकू शकतो,” असे राजनाथ सिंह यांनी उपस्थित माजी सैनिकांना सांगितले.

राष्ट्रीय सुरक्षेसाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल, तसेच शिस्त, नेतृत्व आणि धैर्याच्या गुणांनी समाजाला मार्गदर्शन करून राष्ट्र उभारणीत दिलेल्या योगदानाबद्दल आणि विविध क्षेत्रांमध्ये तरुण पिढीला घडवल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी माजी सैनिकांची प्रशंसा केली. “तुम्ही तुमच्या आयुष्यातील सुवर्णकाळ पर्वतांच्या शिखरांवर, रखरखीत वाळवंटात आणि जंगलांमध्ये घालवता. तुमचे कल्याण आणि हित जपणे ही आमची नैतिक आणि भावनिक जबाबदारी आहे,” असेही ते म्हणाले.

“ज्यांनी राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे, त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशी आमची अगदी स्पष्ट भूमिका आहे. आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्या मर्यादित न राहता, त्या गावांपर्यंत आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गरजूंच्या उपचारांसाठी वय किंवा अंतर अडथळा ठरू नये, यासाठी टेलिमेडिसिनद्वारे दूरस्थपणे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा विस्तारली जात आहे,” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2214676) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam