पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व ला केले संबोधित
सोमनाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज हजारो वर्षांनंतरही दिमाखात उंच फडकत आहे, यातून जगाला भारताचे सामर्थ्य आणि शक्ती दिसून येते: पंतप्रधान
सोमनाथ स्वाभिमान पर्व देशाच्या हजार वर्षांच्या प्रवासाला चिन्हांकित करत आहे, हा भारताचे अस्तित्व आणि स्वाभिमानाचा सोहळा आहे- पंतप्रधान
सोमनाथचा इतिहास हा विध्वंस किंवा पराभवाचा इतिहास नव्हे तर विजयश्री आणि पुनर्निमितीचा इतिहास आहे: पंतप्रधान
सोमनाथ मंदिराला उद्ध्वस्त करण्याच्या मनसुब्याने आलेले आज इतिहासाच्या काही पानांपुरते सीमित राहिले आहेत, सोमनाथ मंदिर मात्र या अथांग समुद्राच्या तीरावर डौलाने उभे आहे, श्रद्धेचा हा ध्वज उंचच उंच लहरत आहे- पंतप्रधान
सोमनाथ मंदिराने हे दाखवून दिले आहे की सृजनाचा मार्ग लांबचा असतो मात्र तोच स्थायी असतो. - पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2026 1:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये सोमनाथ स्वाभिमान पर्व सोहळ्याला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा काळ अद्भुत आहे, हे वातावरण अद्भुत आहे आणि हा सोहळा देखील अद्भुत आहे. एका बाजूला स्वतः भगवान शंकर आहेत तर दुसरीकडे हा महासागर, सूर्याच्या हजारो किरणांच्या साक्षीने मंत्रांच्या जयघोषात श्रद्धेची लाट आहे. या अतिशय पवित्र वातावरणात, भगवान सोमनाथांच्या सर्व भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा अधिकच दैवी आणि भव्य अनुभूती देणारा झाला आहे. सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपल्याला सोमनाथ स्वाभिमान पर्व समारंभात सक्रिय सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण अतिशय भाग्यवान आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी 72 तास अखंड चाललेला ओंकाराचा जप आणि 72 तास चाललेले मंत्रांचे अखंड पठण याची दखल घेतली. पंतप्रधान म्हणाले की काल संध्याकाळी वेदिक गुरुकुलातील हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हजारो ड्रोननी सोमनाथच्या हजारो वर्षांची गाथा साकार केली आणि आज 108 अश्वांसह मंदिरात शौर्य यात्रेचे आगमन झाले. मंत्र आणि भजन यांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण हे शब्दातीत असून हा अनुभव केवळ काळच टिपू शकतो.
हा सोहळा अभिमान, सन्मान, प्रतिष्ठा, ज्ञान, भव्यता आणि वारसा, अध्यात्म आणि आत्मज्ञान, अनुभव, आनंद आणि आत्मीयता यांचे प्रतीक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामागे शिव शंकराचा आशीर्वाद आहे. आज या ठिकाणी बोलत असताना आपल्या मनात वारंवार हेच विचार येत आहेत की ज्या ठिकाणी आज लोक बसले आहेत त्याठिकाणी हजार वर्षांपूर्वी कसे काय वातावरण असेल, असे ते म्हणाले. आज उपस्थित असलेल्यांच्या, आपल्या पूर्वजांनी आपल्या श्रद्धेसाठी, आपल्या विश्वासासाठी आणि आपल्या भगवान महादेव यांच्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि त्यांच्याजवळ असलेले सर्व काही अर्पण केले. हजार वर्षांपूर्वी आक्रमणकर्त्यांना वाटले की ते जिंकले आहेत, मात्र आज अगदी हजार वर्षानंतर देखील सोमनाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज डौलाने फडकत संपूर्ण सृष्टीला हिंदुस्तानच्या सामर्थ्याची आणि क्षमतेची जाणीव करुन देत आहे, असे त्यांनी सांगितले. प्रभास पाटन च्या मातीचा प्रत्येक कण सोमनाथचे स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या अगणित शिवभक्तांचे शौर्य, धाडस आणि वीरतेची गाथा सांगत आहे. सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आपण सोमनाथच्या संरक्षणासाठी आणि पुनर्निमितीसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि आपले सर्वस्व श्री महादेवाला अर्पण करणाऱ्या बंधू भगिनींना अभिवादन करतो, असे पंतप्रधान म्हणाले.
प्रभास पाटन हे केवळ भगवान शंकराचेच नव्हे, तर भगवान श्रीकृष्णानेही पवित्र केलेले स्थान आहे, यावर भर देत पंतप्रधान म्हणाले की, महाभारताच्या काळात पांडवांनीही या पवित्र स्थळी तपश्चर्या केली होती. त्यामुळेच हा समारंभ म्हणजे भारतातील अगणित आयामांना अभिवादन करण्यासाठी लाभलेली एक संधी आहे. सोमनाथ स्वाभिमान यात्रेने हजार वर्ष पूर्ण केल्याच्या आणि 1951 मध्ये या मंदिराच्या पुनर्निमितीला पंच्याहत्तर पूर्ण होत असल्याचा भाग्यशाली योग जुळून आला आहे. सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त पंतप्रधानांनी जगभरातील हजारो भक्तांना शुभेच्छा दिल्या. हा समारंभ म्हणजे हजार वर्षांपूर्वी झालेल्या विध्वंसाचे स्मरण नव्हे तर हजार वर्षांच्या प्रवासाचा सोहळा असून भारताचे अस्तित्त्व आणि अभिमानाचा क्षण आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक टप्प्यावर सोमनाथ आणि भारत यांच्यात अद्वितीय साम्य दिसून येते. सोमनाथचा विध्वंस करण्यासाठी ज्याप्रमाणे असंख्य प्रयत्न झाले, तसेच परकीय आक्रमकांनी शतकानुशतके भारताचा नाश करण्याचा प्रयत्न केला. पण ना सोमनाथ नष्ट झाले , ना भारत—कारण भारत आणि त्याची श्रद्धास्थाने एकमेकांशी अविभाज्यपणे जोडलेली आहेत.
मोदी म्हणाले की, आपण हजारो वर्षांपू्र्वीच्या इतिहासाची कल्पना केली पाहिजे, जेव्हा इसवी सन 1026 मध्ये महमूद गझनी ने पहिल्यांदा सोमनाथ मंदिरावर हल्ला करून ते उद्धवस्त करत त्याचे अस्तित्वच नष्ट केले असा विश्वास त्याला वाटला. मात्र काही वर्षांत, सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली आणि बाराव्या शतकात राजा कुमारपालाने मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला, ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने पुन्हा एकदा सोमनाथ मंदिरावर हल्ला करण्याचे दुःसाहस केले मात्र जालोरच्या राजाने खिलजीच्या सैन्याविरूद्ध शौर्याने लढा दिला. पंतप्रधानांनी सांगितले की, चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला जुनागढच्या राजाने मंदिराचे वैभव पुनर्स्थापित केले आणि त्याच शतकात नंतर मुझफ्फर खानने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला, मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. पंधराव्या शतकामध्ये सुलतान अहमद शाहने मंदिराचा विध्वंस कऱण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा नातू सुलतान महमूद बेगाडा यांने मंदिराचे मशिदीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महादेवाच्या भक्तांच्या प्रयत्नांमुळे मंदिर पुन्हा एकदा पुनरुज्जिवित झाले. सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये औरंगजेबाने सोमनाथ मंदिर उद्धवस्त करत पुन्हा एकदा त्याचे मशिदीत रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला, मात्र अहिल्याबाई होळकर यांनी नव्याने मंदिर उभारून सोमनाथ मंदिराला पुनर्जन्म दिला, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराचा इतिहास विनाश आणि पराभवाचा नाही तर तो विजय आणि पुनर्बांधणीचा आहे,' हे अधोरेखित केले. आक्रमणकर्ते येत राहिले, धार्मिक दहशतीचे नवे हल्ले होत राहिले, मात्र प्रत्येक युगात सोमनाथ मंदिराची सातत्याने पुनर्स्थापना होत राहिली यावर त्यांनी भर दिला. शतकानुशतकांचा संघर्ष, दीर्घकाळ सुरू असलेला प्रतिकार, पुनर्बांधणीतील आत्यंतिक सहनशीलता, सर्जनशीलता आणि लवचिकता तसेच संस्कृती आणि श्रद्धा यांच्यावरील अतूट निष्ठा जागतिक इतिहासात निश्चितच अपवादात्मक आहे.
आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारला पाहिजे की, आपल्या पूर्वजांच्या शौर्यांचे स्मरण आपण का करू नये आणि त्यांच्या पराक्रमातून आपण प्रेरणा का घेऊ नये,असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. कोणाही मुलाने, वारसाने त्यांच्या पूर्वजांच्या शौर्यगाथा विस्मरणात गेल्याचे नाटक करू नये, यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या शौर्याचे स्मरण हे आपले केवळ कर्तव्य नाही तर ताकदीचा स्रोत देखील आहे यावर भर देत त्यांनी प्रत्येकाने आपल्या पूर्वजांचा त्याग आणि शौर्य आपल्या जाणीवांमध्ये जागृत राहिल याची खात्री करावी असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा गझनीपासून औरंगजेबापर्यंतच्या आक्रमकांनी सोमनाथवर हल्ला केला तेव्हा त्यांना वाटले की, त्यांच्या तलवारी सनातन सोमनाथ मंदिरावर विजय मिळवत आहेत, मात्र या धर्माधांना याची जाणीव नव्हती की, 'सोम' या नावातच अमृताचे सार आहे, विष प्राशनानंतरही अमर राहण्याची कल्पना आहे. ते म्हणाले की, सोमनाथ मंदिरात सदाशिव महादेवाची चैतन्यशक्ती वास करते जो कल्याणकारी आहेच शिवाय तो 'प्रचंड तांडव शिव'ही आहे.
पंतप्रधान म्हणाले की, सोम नाथ मंदिरामध्ये विराजमान असलेल्या भगवान महादेवाच्या नावांपैकी एक नाव 'मृत्युंजय' आहे, म्हणजे ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे, जो काळाचे प्रतीक आहे. एक श्लोक उद्धरित करून, पंतप्रधानांनी, सृष्टी त्याच्यापासून निर्माण होते आणि त्याच्यातच विलीन होते असे स्पष्ट केले आणि संपूर्ण विश्व शिवाने व्यापले असून, प्रत्येक कणात शंकराचा वास आहे, या विश्वासाची पुष्टी केली. शंकराची अगणित रूपे आहेत, यावर भर देताना, त्या रूपांचा कोणीही नाश करू शकत नाही, कारण सजीवांमध्येही आपण शंकराला पाहतो आणि म्हणूनच कोणत्याही बळामुळे आपली श्रद्धा ढळू शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, सोमनाथ मंदिर उद्धवस्त करू पाहणाऱ्यांना कालचक्राने इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित ठेवले आहे, तर हे मंदिर विशाल महासागराच्या किनाऱ्यावर आजही आपला धर्मध्वज अभिमानाने उंच फडकवत उभे आहे. सोमनाथ मंदिराचा हा कळस, 'मी चंद्र शेखर शिवावर अवलंबून आहे काळही मला काय करू शकेल?'हेच सांगतो आहे.
सोमनाथ स्वाभिमान पर्व हा केवळ ऐतिहासिक अभिमानाचा उत्सव नसल्याचे सांगत मोदींनी भविष्यातही एक शाश्वत प्रवास जिवंत ठेवण्याचे माध्यम आहे, यांवर भर दिला व या प्रसंगाचा उपयोग आपण, आपले अस्तित्व आणि ओळख अधिक बळकट करण्यासाठी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. काही राष्ट्रे जगासमोर काही शतके जुना असलेला वारसा आपली ओळख म्हणून सादर करतात मात्र भारताकडे तर सोमनाथ मंदिरासारखी हजारो वर्षं जुनी , सामर्थ्य, प्रतिकार आणि परंपरा यांचे प्रतीक असलेली पवित्र स्थळे आहेत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर वसाहतवादी मानसिकतेच्या लोकांनी अशा वारशापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि हा इतिहास पुसून टाकण्याचे द्वेषपूर्ण प्रयत्न झाले, अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. सोमनाथच्या संरक्षणासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण करून देताना पंतप्रधानांनी रावळ कान्हरदेव यांच्यासारख्या शासकांच्या प्रयत्नांचा, वीर हमीरजी गोहिल यांच्या शौर्याचा आणि वेगडा भील यांच्या पराक्रमाचा उल्लेख केला. असे अनेक नायक मंदिराच्या इतिहासाशी जोडलेले आहेत, परंतु त्यांना कधीही योग्य सन्मान मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. काही इतिहासकारांनी आणि राजकारण्यांनी आक्रमणांच्या इतिहासावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला, धार्मिक कट्टरतेला केवळ लूट म्हणून भासवले आणि सत्य लपवण्यासाठी पुस्तके लिहिली, अशी टीका त्यांनी केली. सोमनाथवर केवळ एकदाच नाही, तर वारंवार हल्ले झाले, आणि जर हे हल्ले केवळ आर्थिक लुटीसाठी असते तर हजार वर्षांपूर्वीच्या पहिल्या मोठ्या लुटीनंतर ते थांबले असते, पण तसे झाले नाही, यावर त्यांनी भर दिला. सोमनाथच्या पवित्र मूर्ती तोडल्या गेल्या, मंदिराचे स्वरूप वारंवार बदलले गेले, आणि तरीही आपल्याला शिकवले गेले की सोमनाथचा नाश केवळ लुटीसाठी झाला, असे त्यांनी सांगितले. द्वेष, अत्याचार आणि दहशतीचा क्रूर इतिहास आपल्यापासून लपवला गेला, हे त्यांनी अधोरेखित केले.
आपल्या श्रद्धेशी प्रामाणिक असलेली कोणतीही व्यक्ती अशा टोकाच्या विचारसरणीला कधीही पाठिंबा देणार नाही, तरीही तुष्टीकरणाच्या राजकारणाने प्रेरित झालेले लोक नेहमीच त्यासमोर झुकले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. जेव्हा भारत गुलामगिरीच्या बेड्यांमधून मुक्त झाला आणि सरदार पटेलांनी सोमनाथच्या पुनर्बांधणीची प्रतिज्ञा घेतली, तेव्हा त्यांना थांबवण्याचे प्रयत्न झाले, हे त्यांनी अधोरेखित केले. 1951 मध्ये राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आले तेव्हाही आक्षेप घेण्यात आले, अशी आठवण त्यांनी करून दिली. त्यावेळी जाम साहेब महाराजा दिग्विजय सिंह जी यांनी सौराष्ट्रचे शासक म्हणून राष्ट्रीय अभिमानाला सर्वोच्च स्थान दिले, सोमनाथ मंदिरासाठी एक लाख रुपयांचे योगदान दिले आणि मोठ्या जबाबदारीने विश्वस्त मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले, याचीही त्यांनी आठवण करून दिली.
दुर्दैवाने, आजही देशात सोमनाथच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या शक्ती सक्रिय आहेत, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की, आता तलवारींऐवजी इतर द्वेषपूर्ण मार्गांनी भारताच्या विरोधात कट रचले जात आहेत. पंतप्रधानांनी सतर्क राहण्याचे, सामर्थ्य, एकता राखण्याचे आणि आपल्याला विभाजित करू पाहणाऱ्या प्रत्येक शक्तीला पराभूत करण्याचे आवाहन केले.
जेव्हा आपण आपल्या श्रद्धेशी, आपल्या मुळांशी जोडलेले राहतो आणि आपला वारसा पूर्ण अभिमानाने जपतो, तेव्हा आपल्या संस्कृतीचा पाया अधिक मजबूत होतो, हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, हजार वर्षांचा हा प्रवास आपल्याला भविष्यातील हजार वर्षांसाठी सज्ज होण्याची प्रेरणा देतो. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक प्रसंगी, पंतप्रधान मोदी यांनी भारतासाठी एक हजार वर्षांची भव्य दूरदृष्टी मांडली होती, याची आठवण करून देत, त्यांनी ‘देव ते देश’ या दृष्टिकोनातून पुढे जाण्याबद्दल सांगितले. आज भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानामुळे कोट्यवधी नागरिकांमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण झाला आहे, प्रत्येक भारतीय विकसित भारतासाठी कटिबद्ध आहे आणि 140 कोटी लोक भविष्यातील ध्येयांप्रति दृढनिश्चयी आहेत, असे त्यांनी सांगितले. सोमनाथ मंदिराच्या ऊर्जेने या संकल्पांना आशीर्वाद दिला असून, भारत आपला गौरव नवीन उंचीवर नेईल, गरिबीविरुद्धची लढाई जिंकेल आणि जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या आणि त्याही पुढे जाण्याच्या ध्येयाने विकासाची नवीन पातळी गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजचा भारत ‘वारसा ते विकास’ या प्रेरणेने पुढे जात आहे आणि सोमनाथ हे या दोन्हीचे प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यांनी मंदिराचा सांस्कृतिक विस्तार, सोमनाथ संस्कृत विद्यापीठाची स्थापना, माधवपूर यात्रेची वाढती लोकप्रियता आणि गिर सिंहांचे संवर्धन यामुळे वारसा मजबूत होत असल्याचे नमूद केले, तर प्रभास पाटन विकासाचे नवीन आयाम निर्माण करत आहे, असेही त्यांनी सांगितले. केशोद विमानतळाच्या विस्तारामुळे देश-विदेशातील भाविकांना थेट प्रवेश मिळत आहे, अहमदाबाद-वेरावळ वंदे भारत ट्रेन सुरू झाल्याने प्रवासाचा वेळ कमी झाल्याचे आणि या प्रदेशात तीर्थक्षेत्र सर्किट विकसित केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आज भारत आपल्या श्रद्धेचे स्मरण करतो , त्याचबरोबर पायाभूत सुविधा, संपर्क सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यासाठी तिला सशक्त देखील करत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
भारताचा सभ्यतेचा संदेश कधीही इतरांचा पराभव करण्याचा नसून जीवनात समतोल राखण्याचा राहिला आहे, हे अधोरेखित करताना मोदी म्हणाले की, श्रद्धा द्वेषाकडे नेत नाही आणि सामर्थ्य विनाशाचा अहंकार देत नाही. त्यांनी सांगितले की, सोमनाथ आपल्याला शिकवतो की सृजनाचा मार्ग लांबचा असतो पण तोच स्थायी असतो, तलवारीच्या धारेवर मने जिंकता येत नाहीत, आणि ज्या संस्कृती इतरांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्या स्वतःच काळाच्या ओघात हरवून जातात. भारताने जगाला इतरांना हरवून कसे जिंकावे हे नव्हे, तर मने जिंकून कसे जगावे हे शिकवले आहे, आणि आज जगाला या विचाराची नितांत गरज आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सांगितले की, सोमनाथची हजार वर्षांची गाथा मानवतेला हा संदेश देते. भूतकाळ व वारशाशी जोडलेले राहून विकास व भविष्याकडे वाटचाल करण्याची शपथ घेण्याचे, आधुनिकतेचा स्वीकार करताना चेतना जपण्याचे, तसेच सोमनाथ स्वाभिमान पर्वातून प्रेरणा घेऊन प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जाण्याचे, प्रत्येक आव्हानावर मात करून उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास इतर मान्यवरांसह गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.
पार्श्वभूमी
8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान सोमनाथ येथे आयोजित करण्यात येणारे सोमनाथ स्वाभिमान पर्व मंदिराच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या भारतातील असंख्य नागरिकांच्या स्मरणार्थ साजरे केले जात आहे. त्यांचे त्याग भविष्यातील पिढ्यांच्या सांस्कृतिक चेतनेला सतत प्रेरणा देत राहतात.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1026 मध्ये महमूद गझनीने केलेल्या सोमनाथ मंदिरावरील आक्रमणाला 1,000 वर्षे पूर्ण झाल्याची आठवण करून दिली जाते. शतकानुशतके वारंवार विध्वंसाचे प्रयत्न होऊनही, सोमनाथ मंदिर आजही आपल्या प्राचीन वैभवाच्या पुनर्स्थापनेसाठी झालेल्या सामूहिक संकल्प व प्रयत्नांमुळे, सहनशीलता, श्रद्धा आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रभावी प्रतीक म्हणून उभे आहे.
स्वातंत्र्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीचे कार्य सरदार पटेल यांनी हाती घेतले. या पुनरुज्जीवन प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा 1951 मध्ये गाठण्यात आला, जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत पुनर्स्थापित सोमनाथ मंदिर भक्तांसाठी औपचारिकरीत्या खुले करण्यात आले. 2026 मध्ये या ऐतिहासिक पुनर्स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने सोमनाथ स्वाभिमान पर्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या उत्सवात देशभरातील शेकडो संतांचा सहभाग राहणार असून मंदिर परिसरात 72 तास अखंड ‘ॐ’ जप केला जाणार आहे.
सोमनाथ स्वाभिमान पर्वातील पंतप्रधानांचा सहभाग भारताच्या सभ्यतेच्या चिरंतन आत्म्याचे दर्शन घडवतो आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे जतन व उत्सव साजरा करण्याबाबत त्यांच्या कटिबद्धतेची पुनःपुष्टी करतो.
***
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/विजयालक्ष्मी साळवी साने/श्रद्धा मुखेडकर/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2213414)
आगंतुक पटल : 26
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Nepali
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada