पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

​पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 जानेवारी रोजी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 च्या समारोप सत्रात सहभागी होणार


​देशभरातील सुमारे 3,000 युवा नेत्यांशी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी पंतप्रधान साधणार संवाद

​निवड झालेले सहभागी युवा प्रतिनिधी राष्ट्रीय महत्त्वाच्या 10 विविध विषयांवर पंतप्रधानांसमोर आपले सादरीकरण करणार

​विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 मध्ये देशभरातील 50 लाखांपेक्षा जास्त युवा प्रतिनिधींचा सहभाग

प्रविष्टि तिथि: 10 JAN 2026 10:00AM by PIB Mumbai

 

​स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे दुपारी 4:30 च्या सुमारास विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 च्या समारोप सत्रात सहभागी होणार आहेत.

​यावेळी पंतप्रधान देशभरातील तसेच जगभरात वसलेल्या भारतीय समुदायाचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून आलेल्या सुमारे 3,000 युवा प्रतिनिधींशी संवाद साधतील. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमधून निवडलेले युवा प्रतिनिधी राष्ट्रीय महत्त्वाच्या 10 विविध विषयांवर पंतप्रधानांसमोर त्यांचे अंतिम सादरीकरण करतील. या माध्यमातून युवा नेतृत्वाचा दृष्टिकोन आणि राष्ट्र उभारणीसाठीच्या त्यांच्या कल्पना पंतप्रधानांसमोर मांडल्या जाणार आहेत.

​या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026 च्या निबंध संग्रहाचे प्रकाशनही करतील. यात भारताच्या विकासाचे प्राधान्यक्रम आणि दीर्घकालीन राष्ट्र उभारणीच्या उद्दिष्टांवर युवा प्रतिनिधींनी लिहिलेले निवडक निबंध असणार आहेत.

​विकसित भारत यंग लीडर्स डायलॉगची ही दुसरी आवृत्ती आहे. भारतातील युवा वर्ग आणि राष्ट्रीय नेतृत्वात थेट संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. राजकारणाशी संबंध नसलेल्या एक लाख युवा प्रतिनिधींना राजकारणात जोडून घेण्याचे आणि विकसित भारताविषयीच्या त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाला केले होते, त्याला अनुसरूनच हा उपक्रम राबवला जात आहे.

यंदा हा संवाद उपक्रम 9 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यात देशभरातील विविध स्तरांतील 50 लाखांपेक्षा जास्त तरुणांनी सहभाग घेतला आहे. देशव्यापी डिजिटल प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा आणि राज्यस्तरीय सादरीकरण अशा तीन कठोर गुणवत्तेचा कस पाहणाऱ्या टप्प्यांनंतर या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत असलेल्या युवा नेत्यांची निवड करण्यात आली आहे.

​या संवादाची पहिल्या आवृत्तीच्या यशाच्या  पार्श्वभूमीवरच यंदाच्या या दुसर्‍या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या आवृत्तीत काही महत्त्वाच्या नवीन घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यात डिझाइन फॉर भारत, टेक फॉर विकसित भारत - हॅक फॉर अ सोशल कॉज, अशा विषयांवरील चर्चात्मक उपक्रमांचा तसेच, पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सहभागाचा समावेश केला गेला आहे. यामुळे या उपक्रमाची व्याप्ती आणि प्रभाव अधिक वाढला आहे.

***

नितीन फुल्लुके / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2213176) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam