रेल्वे मंत्रालय
अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते 100 रेल्वे अधिकाऱ्यांना 70 वे अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2025 प्रदान, विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागांना 26 ढाली प्रदान
2047 पर्यंत विकसित भारत, विकसित रेल्वेचे ध्येय साकारण्यासाठी भारतीय रेल्वेने नव्या उंचीवर पोहोचले पाहिजे: अश्विनी वैष्णव
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 10:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
केंद्रीय रेल्वे, माहिती व प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीतील द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (यशोभूमी) येथे 100 रेल्वे अधिकाऱ्यांना 70 वे अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार प्रदान केले आणि विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना 26 ढाली देऊन सन्मानित केले.
अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की, 2047 पर्यंत विकसित भारत, विकसित रेल्वेची संकल्पना साकार करण्यासाठी भारतीय रेल्वेने पूर्णपणे नवीन स्तरावर पोहोचले पाहिजे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पणाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे रेल्वेला दीर्घकाळच्या आव्हानांवर मात करणे, क्षमता विस्तारणे, कार्यक्षमता सुधारणे आणि पायाभूत सुविधा व कामकाजाच्या बाबतीत महत्त्वाचे टप्पे गाठणे शक्य झाले आहे.
वैष्णव यांनी पुढे सांगितले की मोठ्या प्रमाणावर झालेल्या रेल्वे मार्गांच्या बांधकामामुळे रेल्वेची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यांनी नमूद केले की, दिवाळी-छठ, ख्रिसमस आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसारख्या सर्व प्रमुख गर्दीच्या हंगामात विशेष गाड्या चालवण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ झाला आणि गेल्या वर्षी एक नवीन मापदंड प्रस्थापित झाला.
केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेने '52 आठवडे, 52 सुधारणा' नावाचा एक महत्त्वाकांक्षी सुधारणा आराखडा 2026 साठी हाती घेतला आहे, ज्या अंतर्गत ग्राहक सेवा, देखभाल, उत्पादन, गुणवत्ता व्यवस्थापन, आरोग्य प्रणाली आणि कामकाज यांसारख्या प्रमुख कार्यात्मक क्षेत्रांमध्ये दर आठवड्याला एक मोठी सुधारणा लागू केली जाईल. ते म्हणाले की, मानके पुनर्परिभाषित करण्यासाठी, अडचणी ओळखण्यासाठी आणि स्पष्ट, वेळेनुसार कृती योजना निश्चित करण्यासाठी विविध विभागांतील अधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने संरचित कार्यशाळांची मालिका आयोजित केली जात आहे.
त्यांनी सहा मुख्य संकल्पांची रूपरेषा मांडली, जे आगामी टप्प्यात भारतीय रेल्वेसाठी मार्गदर्शक ठरतील:
सर्वप्रथम ग्राहक सेवा, देखभाल, उत्पादन, दर्जा आणि आरोग्य व्यवस्थेत ठरावीक वेळेत बदल करून जबाबदारी आणि अंमलबजावणीवर भर देणारी प्रणाली अद्ययावत करण्याचा ठोस प्रयत्न केला जात आहे.
दुसरे म्हणजे तंत्रज्ञान, नवकल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा व्यापक वापर केला जात आहे. यात नव्या प्रकारचे डबे, रूळांची प्रगत प्रणाली, आधुनिक सिग्नलिंग आणि स्मार्ट देखभाल पद्धतींचा समावेश आहे. त्यामुळे विश्वासार्हता आणि उत्पादकता वाढेल.
तिसरे म्हणजे देखभाल मानकांमध्ये मूलभूत सुधारणा केली जात आहे. जुन्या पद्धती सोडताना थोडा त्रास होऊ शकतो, पण सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी ते गरजेचे आहे.
चौथे म्हणजे सुरक्षिततेवर भर दिला जात आहे. चांगले प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर, शिस्तबद्ध कामकाज आणि नेतृत्वाच्या सर्व स्तरांवर दररोज देखरेख करून अपघात कमी करण्याचा उद्देश आहे.
पाचवे म्हणजे प्रशिक्षण आणि कौशल्य विकासात बदल केला जात आहे. सातत्याने कौशल्य विकसित करणे बंधनकारक केले जात आहे, प्रशिक्षणाला पदोन्नतीशी जोडले जात आहे. सिम्युलेटर व डिजिटल साधनांचा वापर करून सक्षम कर्मचारी तयार केले जात आहेत.
सहावे म्हणजे वसाहतवादी मानसिकता पूर्णपणे दूर करण्यावर भर दिला जात आहे. अधिकाऱ्यांनी नवीन कल्पना खुलेपणाने आत्मसात करायला हव्यात. त्यांनी तरुण अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रोत्साहन देत भारतीय उपाययोजनांना प्राधान्य दिले पाहिजे. जागतिक स्तरावर मान्यता असलेल्या मेड इन इंडिया कामगिरीचा या अधिकाऱ्यांना अभिमान वाटला पाहिजे.
70व्या अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार (एव्हीआरएसपी)– 2025 साठी निवडलेल्या अधिकाऱ्यांची यादी
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213118)
आगंतुक पटल : 16