अणुऊर्जा विभाग
अणुऊर्जा विभागाचा वर्षअखेर आढावा 2025
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची अणुऊर्जा निर्मिती सर्वकालीन उच्चांकावर; न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 56,681 दशलक्ष युनिट्स वीज निर्मितीचा टप्पा ओलांडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये 4-युनिटच्या माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली.
पंतप्रधानांच्या हस्ते मुझफ्फरपूर येथील150 खाटांच्या होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.
भारताने दुर्मिळ मूलद्रव्यांसाठी प्रथमच प्रमाणित संदर्भ सामग्री जारी केली.
अणुऊर्जा विभागाला ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’प्रदान; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ला ‘संस्थात्मक उत्कृष्टतेसाठी स्कोप एमिनन्स पुरस्कार’ प्राप्त.
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 11:45AM by PIB Mumbai
अणुउर्जा विभागाने अणुऊर्जा निर्मिती, अणुऊर्जानिर्मितीसाठी क्षमता उभारणी, रेडिओ-आयसोटोप आणि रेडिओ-फार्मास्युटिकल उत्पादनासाठी संशोधन अणुभट्ट्यांची निर्मिती आणि संचालन आणि आरोग्यसेवा, अन्न सुरक्षा, पाणी आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांतील सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी किरणोत्सर्ग तंत्रज्ञान उपायांचा वापर करणे, यांसारख्या आपल्या उद्दिष्टांची पूर्तता करणे सुरूच ठेवले आहे. हा विभाग राष्ट्रीय सुरक्षेमध्येही योगदान देतो.

-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर 2025 रोजी राजस्थानमधील बंसवाडा येथे 4-युनिटच्या माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी झाली; हा प्रकल्प एनपीसीआयएल-एनटीपीसी संयुक्त उपक्रमाद्वारे उभारला जाणार असून त्याचे नाव अश्विनी आहे.
-
राजस्थानमधील युनिट 7 (आरएपीपी-7) हे नॉर्दर्न ग्रिडशी जोडले गेले असून, त्याने व्यावसायिक कामकाज सुरू केले आहे.
-
एनपीसीआयएलने आपल्या संपूर्ण कार्यकाळात प्रथमच एका आर्थिक वर्षात 50 अब्ज युनिट्स (बीयू) वीज निर्मितीचा टप्पा पार केला आहे.
-
अणुऊर्जा आयोगाने 700 मेगावॅट विद्युत क्षमतेच्या प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्सच्या अतिरिक्त 10 युनिट्ससाठी प्रकल्पपूर्व उपक्रमांना मंजुरी दिली आहे. ही मंजुरी 2032 पर्यंत नियोजित असलेल्या 22.5 गिगावॅट क्षमतेव्यतिरिक्त आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधील मुझफ्फरपूर, येथे 150 खाटांचे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
-
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था - आयएईएने टाटा मेमोरियल हॉस्पिटलला 'रेझ ऑफ होप' अँकर सेंटर म्हणून मान्यता दिली आहे.
-
कृषी विकिरण प्रक्रिया सुविधा यांनी स्वदेशी विकसित 10 मेगा-इलेक्ट्रॉन-व्होल्ट (MeV), 6 किलोवॅट (kW) क्षमतेच्या लिनिअर अॅक्सेलरेटर (Linac)चा वापर करून इलेक्ट्रॉन बीम निर्जंतुकीकरणाद्वारे एक कोटी (10 दशलक्ष) वैद्यकीय उपकरणांचे निर्जंतुकीकरण पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.
-
फेरोकार्बोनेटाइट (FC) – (भाभा अणुसंशोधन केंद्र B1401)’ नावाचे स्वदेशी विकसित प्रमाणित संदर्भ साहित्य औपचारिकरीत्या प्रकाशित करण्यात आले असून, भारतातील असे पहिले आणि जगातील चौथे प्रमाणित संदर्भ साहित्य ठरले आहे. हे प्रमाणित संदर्भ साहित्य दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या (REEs) धातू खाणकामासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
-
अणुऊर्जा विभागाने तालचेर येथे अर्धसंवाहक (सेमिकंडक्टर) अनुप्रयोगांसाठी उपयुक्त अशा इलेक्ट्रॉनिक्स-ग्रेड (99.8% शुद्धता) बोरोन-11 समृद्धीकरण सुविधेची (Boron-11 Enrichment Facility) देशातील पहिली सुविधा स्थापन केली आहे.
-
अणुऊर्जा विभागाने ऑगस्ट 2025 मध्ये 18 वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड (IOAA 2025) यजमान म्हणून यशस्वीपणे आयोजित केले. या स्पर्धेत 64 देशांमधील 300 हून अधिक विद्यार्थी आणि 140 सदस्य सहभागी झाले.
या वर्षात अणुऊर्जा विभागाच्या कामगिरीत विविध उल्लेखनीय उपलब्धींचा समावेश आहे. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण कामगिरी खालीलप्रमाणे आहे.
भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाने साध्य केलेली कामगिरी
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 सप्टेंबर 2025 रोजी राजस्थानमधील बंसवाडा येथे 4-युनिटच्या माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी झाली; या प्रकल्पात 700 मेगावॅट क्षमतेचे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर प्रकारातील चार युनिट्स असतील. हा प्रकल्प एनपीसीआयएल–एनटीपीएस संयुक्त उपक्रमाद्वारे राबवण्यात येणार असून या संयुक्त उपक्रमाचे नाव ‘अश्विनी’ आहे.
-
गुजरातच्या काकरापार येथील स्वदेशी 700 मेगावॅट पीएचडब्ल्यूआरचे पहिले दोन युनिट (केएपीएस – 3 आणि 3) यांना नियमित कार्यान्वयनासाठी एईआरबी परवाना मिळाला आहे. रावतभाटा अणुऊर्जा प्रकल्पाचे युनिट 7 – मंजूर 16 अणुभट्ट्यांच्या मालिकेतील तिसरी स्वदेशी 700 मेगावॅट पीएचडब्ल्यूआर अणुभट्टी – 15 एप्रिल 2025 रोजी व्यावसायिकरित्या कार्यान्वित झाली आहे.
-
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 56,681 दशलक्ष युनिट्स वीज निर्मितीचा टप्पा ओलांडल्याने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताची अणुऊर्जा निर्मिती सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. आतापर्यंत 53 वेळा एक वर्षाहून अधिक कालावधीची अखंड (सातत्यपूर्ण) कार्यवाही नोंदविण्यात आली आहे. यामध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्र–3 ने आपल्या आधीच्या 521 दिवसांच्या विक्रमालाही मागे टाकले असून, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प–2 नेही एक वर्षाहून अधिक कालावधीसाठी सातत्यपूर्ण कार्यरत राहण्याची कामगिरी साध्य केली आहे.
आरोग्य सेवा क्षेत्रातील उपलब्धी:
-
अणुऊर्जा विभाग उपचारात्मक आणि निदानासाठी वापरल्या जाणार्या रेडिओफार्मास्युटिकल्सच्या स्वदेशी विकास, व्यापारीकरण आणि पुरवठ्यामध्ये तसेच कर्करोग उपचारांमध्ये योगदान देत आहे.
-
पंतप्रधानांच्या हस्ते 22.08.2025 रोजी बिहार मधील मुझफ्फरपूर येथे 150 खाटांच्या होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे, उद्घाटन करण्यात आले.
-
अणुऊर्जा विभागाच्या टाटा मेमोरियल सेंटर मध्ये आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 1.3 लाख रुग्णांची नोंदणी झाली आहे. वाराणसी, सांगरूर, मुल्लानपूर आणि गुवाहाटी येथील सुमारे 5 लाख महिलांची मुखाची, स्तनाची(Breast) आणि गर्भाशयातील (Cervical) कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे.
-
कोलकाता येथील 30 मेगा-इलेक्ट्रॉन-व्होल्ट वैद्यकीय सायक्लोट्रॉन सुविधा, फ्लुरोडिओक्सीग्लुकोज आणि इतर रेडियोफार्मास्युटिकल्सचे व्यावसायिक उत्पादन सुरू आहे. या वर्षी 371 क्यूरी (Ci) समतुल्य रेडियोफार्मास्युटिकल्स कर्करोग निदानासाठी रुग्णालयांना वितरीत करण्यात आल्या.
-
एक नवीन उपचारात्मक पद्धत, 177Lu-DOTA-FAPI-2286 थेरपी, तसेच अधिक अचूकतेसह पाच नवीन निदानात्मक पद्धती रुग्णालयीन दैनंदिन उपचारात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे रुग्णसेवेच्या क्षेत्रात मोठी सुधारणा झाली आहे. 176 Lu या समस्थानिकाचे पृथक्करण आणि समृद्धीकरण करण्यासाठीचे तंत्रज्ञान स्वदेशी इलेक्ट्रोमॅग्नेटिक समस्थानिक पृथक्करण सुविधा (Electromagnetic Isotope Separation Facility) मध्ये यशस्वीपणे सादर करण्यात आले आहे.
-
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये असलेली इलेक्ट्रॉन बीम-आधारित (e-beam) निर्जंतुकीकरण सुविधा ISO मानकांचे पालन करत वैद्यकीय उपकरण उत्पादकांना सातत्यपूर्ण e-beam निर्जंतुकीकरण सेवा प्रदान करत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये या सुविधेने एकत्रितपणे 1.53 कोटी वैद्यकीय उपकरणांचे निर्जंतुकीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले. इथून निर्जंतुकीकृत केलेली वैद्यकीय उपकरणे जर्मनी, यूके, स्पेन, फ्रान्स, बेल्जियम, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, साऊथ आफ्रिका, इंडोनेशिया, पोर्तुगाल, चेक, रशियन फेडरेशन यांसह 35 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत.
-
कॅटेगरी II प्रकाराच्या डिझाइनसह असलेला उच्च-तीव्रतेचा गॅमा इरॅडिएटर ISOMED 2, मे 2025 मध्ये पूर्ण झाला. हा आरोग्य सेवा उद्योगासाठी वैद्यकीय उत्पादनांचे अंतिम निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरला जाईल. ISOMED 2.0 आज जगातील एकमेव उच्च-तीव्रतेचा स्थिरगामी गॅमा इरॅडिएटर आहे.
उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील उपलबध्दता (कण त्वरक, लेझर, प्लाझ्मा, क्रायोजेनिक, क्वांटम, अंतराळ अनुप्रयोग, संयुगात्मक अणुशक्ती, आंतरिक तसेच सायबर सुरक्षा)
-
‘फेरोकार्बोनेटाइट (FC) – (BARC B1401)’ नावाचे स्वदेशी बनावटीचे प्रमाणित संदर्भ साहित्य औपचारिकपणे जारी करण्यात आले. हे प्रमाणित संदर्भ साहित्य दुर्मिळ पृथ्वी घटकांच्या खाणींमध्ये संशोधन, उत्खनन आणि प्रक्रिया नियंत्रणासाठी तसेच संबंधित उत्पादन उद्योगांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. विकसित केलेले FC-CRM तेर (13) REEs (Ce, Dy, Er, Eu, Gd, La, Nd, Pr, Sc, Sm, Tb, Y आणि Yb) तसेच सहा (06) प्रमुख घटक (अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅन्गनीज आणि फॉस्फरस) यांची प्रमाणित खात्री करते. ही ऐतिहासिक उपलब्धी म्हणजे भारतातील पहिले आणि जगातील चौथे प्रमाणित संदर्भ साहित्य ठरते.
-
एनएफसीने उच्च अवशिष्ट प्रतिरोधकता गुणोत्तर असलेल्या नायोबियमच्या लगडी आणि पत्र्यांच्या उत्पादनासाठीचे तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित केले आहे. हे साहित्य विविध प्रगत प्रवेगक कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे साहित्य आहे आणि गंभीर उपयोगांसाठी साहित्य संशोधनातील भारताची क्षमता मजबूत करण्याच्या उद्देशाने हे विकसित करण्यात आले आहे.
-
अंतर्गत सुरक्षेच्या दिशेने, ईसीआयएलने महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवरील धोक्यांपासून संरक्षणासाठी रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक (CBRN) प्रणाली यशस्वीरित्या विकसित, एकत्रित आणि स्थापित केली आहे. तसेच, शत्रूच्या विमाने/ड्रोनद्वारे होणाऱ्या बहु-दिशात्मक हल्ल्यांना 360º कोनातून प्रत्युत्तर देण्यास सक्षम असलेल्या आकाश-प्राइम प्रणालीचे पहिले उत्पादन मॉड्युल एकत्रित करण्यात आले आहे.
-
राष्ट्रीय सुरक्षा दिशेने, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अग्नी क्षेपणास्त्र प्रक्षेपण प्रणालीसाठी एकात्मिक पॉवर आणि पायरो रिले युनिट्स आणि लॉन्चर इंटरफेस युनिट यशस्वीपणे विकसित आणि उत्पादन केले आहे. तसेच, अस्त्र क्षेपणास्त्र साठीचे वेपन कंट्रोल सिस्टिम यशस्वीपणे चाचणी केले गेले आणि ते भारतीय नौदलाच्या जहाजावरील इतर ऑन-बोर्ड प्रणालींसोबत इंटरफेस केले गेले.
-
किनाराभिमुख जहाज विरोधी क्षेपणास्त्र प्रणाली साठी कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर्स आणि इंटेलिजन्स (C4I) प्रणालींचे एकत्रीकरण करून त्या मेसर्स ब्रह्मोस एअरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडकडे मित्रदेशाला निर्यातीसाठी पुरविण्यात आल्या आहेत. याशिवाय, वाहनावर बसवलेल्या रडारचे (Vehicle Mounted Radar) एकत्रीकरण प्रथमच यशस्वीरीत्या करण्यात आले आहे.
-
नायोबियम थर्मिट उत्पादन सुविधा, जी न्यूक्लियर फ्यूजन कॉर्पोरेशनने विक्रम साराभाई स्पेस सेंटर, अंतराळ विभाग यांच्यासोबतच्या सहकार्य कराराअंतर्गत स्थापिली आहे, ही अंतराळ कार्यक्रमांसाठीआवश्यक नायोबियम पुरवठ्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या सुविधेतून नायोबियम ऑक्साईडची (Niobium Oxide) पहिली बॅच यशस्वीरीत्या तयार करण्यात आली आणि अंतराळ विभागाचे सचिव आणि अंतराळ आयोगाच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात आले.
पायाभूत आणि निर्देशित संशोधनातील यश:
-
हाय-व्होल्टेज बॉरोन वर्क्सने एचडब्ल्यूबीएफ-तालचेर येथील बोरॉन एक्सचेंज डिस्टिलेशन सुविधेमध्ये 99.8% पेक्षा जास्त शुद्धतेच्या (सेमीकंडक्टर ग्रेड) बोरॉन-11 च्या संवर्धनामध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. या संवर्धित उत्पादनाचे यशस्वीरित्या शुद्ध संवर्धित बोरिक ॲसिडमध्ये रूपांतर करण्यात आले आहे, जे पुढील प्रक्रियेद्वारे संवर्धित BF3 वायूमध्ये रूपांतरित केले जाईल.
-
इंटरनॅशनल मास्टर्स इन सायन्स रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी नवजात बाळाचे वजन भाकीत करण्यासाठी गोम्पर्ट्झ सूत्राचा वापर करून एक सोपे, सहज समजण्यासारखे आणि अत्यंत अचूक वाढीचे मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेलसाठी फक्त चार मानक भ्रूण माप आणि कमीतकमी तीन नियमित अल्ट्रासाऊंड स्कॅन्सची आवश्यकता आहे. हा प्रगतीशील शोध भ्रूण वजनातील विचलने, ज्यामुळे नवजात बाळांमध्ये गुंतागुंत किंवा मृतजन्म होण्याचा धोका असतो, लवकर ओळखण्यास मदत करतो आणि वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप शक्य होतो.
-
डार्क मॅटरच्या कमी वस्तुमानाच्या क्षेत्राचा शोध घेण्यासाठी, साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स (SINP) ने जादुगुडा भूमिगत विज्ञान प्रयोगशाळेत इंडियन डार्क मॅटर सर्च एक्सपेरिमेंट (InDEx) या डार्क मॅटर थेट शोध प्रयोगाची पहिली चाचणी सुरू केली आहे. डार्क मॅटरच्या कमी वस्तुमान क्षेत्राचा शोध घेणे हा या प्रयोगाचा उद्देश आहे.
कृषी आणि अन्न परिरक्षणासाठी किरणोत्सर्ग-आधारित तंत्रज्ञानाच्या उपयोजनांमधील यश आणि अणुऊर्जेच्या गैर-ऊर्जा उपयोगांमधून सामाजिक फायद्यांसाठी मिळालेले उप-उत्पादने आणि तंत्रज्ञान हस्तांतरण.
-
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, तिरुचिरापल्ली यांच्यासह सहकार्याने लवकर पिकणारी उत्परिवर्तित (Mutant) केळीची प्रजाती – TBM-9 विकसित करून अधिसूचित केली गेली आहे. याचबरोबर, 15-20% जास्त धान्यउत्पादन देणारी लवकर पिकणारी ज्वारी उत्परिवर्तित प्रजाती RTS-43 देखील अधिसूचित झाली आहे. या सोबत, भाभा अणुसंशोधन केंद्राद्वारे प्रकाशित झालेल्या प्रजातींची संख्या आता 72 वर पोहोचली आहे. याशिवाय, यापूर्वी भाभा अणुसंशोधन केंद्राने प्रकाशित केलेल्या 6 तेलबिया (Oilseed) प्रजाती आता अतिरिक्त राज्यांमध्ये लागवडीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
-
खाजगी आणि राज्य सरकारी क्षेत्रांमध्ये गॅमा किरणोत्सर्ग प्रक्रिया सुविधा स्थापन करण्यासाठी 17 सामंजस्य करार करण्यात आले आणि या काळात अशा 6 सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या, ज्यामुळे देशात कार्यरत असलेल्या अशा सुविधांची एकूण संख्या 40 झाली आहे. BRIT या सुविधांना Co-60 स्रोत पुरवून आणि प्रकल्पाचे परिचालन मापदंड स्थापित करून सहाय्य करत आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली ओळख:
-
टीआयएफआर (TIFR) च्या मार्गदर्शनाखालील भारतीय विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र गणित, भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या पाच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ठळक कामगिरी खालीलप्रमाणे आहे: संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई येथे झालेल्या 57 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (IChO) 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके; फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (IPhO) 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके; फिलिपिन्समधील क्वेझोन येथे झालेल्या 36 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (IBO) 2 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके; ऑस्ट्रेलियातील सनशाईन कोस्ट येथे आयोजित 66 व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये (IMO) 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक; आणि भारतात झालेल्या 18 व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये (IOAA)4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक.
-
इंडियन रॅडिओन्यूक्लाइडस लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांना अनुक्रमे “संस्थात्मक उत्कृष्टता आणि “इतर नफा/अतिरिक्त उत्पन्न निर्माण करणारे सार्वजनिक उपक्रम” या श्रेणीत 2022-23 वर्षी प्रतिष्ठित ‘SCOPE एमिनन्स पुरस्कार’ मिळाला आहे. हा पुरस्कार 29 ऑगस्ट 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला गेला.
-
14 सप्टेंबर रोजी हिंदी दिनानिमित्त, अणुऊर्जा विभागाला सलग दुसऱ्या वर्षी राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
-
मुंबईच्या एईसीएस-2 शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिया कपूर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 2025 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, हा सन्मान आपल्या शिक्षक वर्गाच्या उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.
-
राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 2025 रँकिंगमध्ये होमी भाभा राष्ट्रीय विद्यापीठाला संशोधन संस्था श्रेणीत भारतात 7वा, विद्यापीठ श्रेणीत 12 वा आणि एकूण श्रेणीत 20 वे स्थान प्राप्त झाले आहे. तसेच, Nature Index 2024-25 मध्ये होमी भाभा राष्ट्रीय विद्यापीठाला भौतिक शास्त्र प्रकाशनांसाठी भारतातील पहिले स्थान आणि एकूण प्रकाशनांसाठी तिसरे स्थान मिळाले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी राजस्थानमध्ये 4-युनिटच्या माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली.

पंतप्रधानांच्या हस्ते 22.08.2025 रोजी मुझफ्फरपूर येथील150 खाटांच्या होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ला वर्ष 2022-23 साठी ‘संस्थात्मक उत्कृष्टता श्रेणीत SCOPE एमिनन्स पुरस्कार’ प्राप्त.

अणुऊर्जा विभागाला सलग दुसऱ्या वर्षी ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’ प्रदान;
मुंबईच्या एईसीएस-2 शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिया कपूर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 2025 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212754)
आगंतुक पटल : 21