वस्त्रोद्योग मंत्रालय
राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद गुवाहाटी येथे सुरू
वस्त्रोद्योग क्षेत्र मजबूत करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करणे आणि भारताला जागतिक वस्त्रोद्योग केंद्र म्हणून पुढे नेणे हा परिषदेचा उद्देश : गिरीराज सिंह
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
दोन दिवसीय राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांची परिषद आज आसाममधील गुवाहाटी येथे औपचारिकरित्या सुरू झाली. या परिषदेत देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वस्त्रोद्योग मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले असून, भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राच्या भविष्यातील दिशा आणि कृती आराखड्यावर चर्चा केली जाणार आहे.

वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित ही परिषद “इंडियाज टेक्सटाइल्स: विव्हिंग ग्रोथ, हेरिटेज ॲण्ड इनोव्हेशन” या संकल्पनेवर आधारित आहे. वस्त्रोद्योग, वस्त्रनिर्मिती, परिधान आणि तांत्रिक वस्त्र क्षेत्रात भारताला जागतिक केंद्र म्हणून पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय, संयुक्त प्रयत्न आणि सहकारी संघराज्यभावना बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, वस्त्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सत्रात बोलताना केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले की, भारत सरकार वस्त्रोद्योग क्षेत्रात उत्पादन, निर्यात आणि शाश्वतता यांचा समतोल राखत स्थिर आणि सुनियोजित पद्धतीने काम करत आहे. या परिषदेमार्फत विचारमंथन, नवकल्पना आणि धोरणात्मक सूचना यांची देवाण-घेवाण करून भारताच्या वस्त्रोद्योगाला अधिक सक्षम करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गुंतवणूक-पूरक आणि उद्योग-स्नेही धोरणे तयार करावीत, तसेच राज्यस्तरावर वस्त्रोद्योगात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याची आवश्यकता आहे, यावर त्यांनी भर दिला.
वस्त्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रतिनिधींमधील संवाद आणि समन्वयामुळे भारतीय वस्त्रोद्योगाला जागतिक बाजारपेठेत आपली उपस्थिती अधिक व्यापक करण्यासाठी बळ मिळेल.

दिवसभरात पायाभूत सुविधा, गुंतवणूक, कच्चा माल आणि तंतू या विषयांवर केंद्रित विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कापूस, रेशीम, ताग, लोकरी, तांत्रिक वस्त्र आणि न्यू एज फायबर्स या घटकांवर विशेष चर्चा झाली.
या परिषदेत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सर्वोत्तम कार्यपद्धती, गुंतवणूक संधी, आव्हाने आणि धोरणात्मक सूचना मांडल्या, ज्यामुळे हे क्षेत्र अधिक मजबूत करता येईल.
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212648)
आगंतुक पटल : 20